वाचनसंस्कृती यावी जीवनाच्या केंद्रस्थानी

sanjay joshi
sanjay joshi

वाचनसंस्कृतीची एक व्याख्या अशीही करता येईल, की ज्या समाजात कायदा आणि सुव्यवस्थेची बाह्य साधने कमीत कमी प्रमाणात लागतात, त्या समाजाची संस्कृती म्हणजे उन्नत वाचनसंस्कृती. वाचणारा समाज बेताल होण्याची शक्‍यता कमी असते, याचे साधे कारण म्हणजे आपल्या चिमुकल्या आयुष्यात आणि अनुभवविश्वात नसणारे अनेक पर्याय या जगात असू शकतात, याचे भान वाचन देते. साक्षरता ते सुशिक्षितता ते सुसंस्कृतता हा प्रवास सुकर करणे हे वाचनाचे खरे काम. अधिकाधिक गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या होत चाललेल्या भवतालाला पेलण्यासाठी वाचनाचे खंदक हवेतच.

आपल्या समाजात वाचनसंस्कृती पूर्वीपासून नेहमीच कमी होती की ती सध्याच लयाला जात आहे, या वादात जाण्यापेक्षा वाचनसंस्कृती उन्नत करण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करणे अधिक सकारात्मक वाटते, अगत्याचेही वाटते. वाचक म्हणून गेली चाळीस, लेखक म्हणून गेली वीस-पंचवीस आणि पुस्तक विक्रेता म्हणून दोन वर्षांच्या माझ्या अनुभवांतून यासाठी सहज अमलात आणता येईल अशी त्रिसूत्री दिसते.

पहिले म्हणजे सरकारने किंवा साहित्यिक संस्थांनी काय करावे याचा विचार करण्यापेक्षा मला यात काय करता येईल हा विचार सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मी माझ्या उत्पन्नातील ठराविक भाग वापरून अधिकाधिक पुस्तके विकत घेऊन, वाचून माझ्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलत राहणे हा सर्वांत सोपा वाटणारा; पण सर्वांत परिणामकारक उपाय आहे. त्यातही वाचन केवळ मनोरंजक आणि सवंग पुस्तकांकडून अधिकाधिक उन्नत अभिरुचीच्या पुस्तकांकडे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे मोलाचे. वाचनाची सुरवात कुटुंबापासूनच व्हायला हवी हे महत्त्वाचे. दुसरे म्हणजे लेखक, प्रकाशक आणि विक्रेते यांनी एकत्र येऊन एखाद्या विशिष्ट पुस्तकाची जाहिरात करण्यापेक्षा वाचन या जीवनोपयोगी सवयीची अत्यंत अभिनव; पण आक्रमक आणि प्रभावी पद्धतीने जाहिरात करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी समाजातील प्रभावी व्यक्तिमत्त्वे आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची मदत घेणे जरुरीचे आहे. यात सरकारी किंवा संस्थात्मक मदत मिळाली तर फारच छान; पण त्यावाचून हे काम अडता कामा नये. तिसरे म्हणजे लेखक, पुस्तके आणि वाचन यांना आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानाकडे ढकलत राहाण्याचे प्रयत्न अविरतपणे करत राहायला हवे. त्यासाठी जमेल त्या व्यासपीठावर या गोष्टींचा गौरव करणे, उदात्तीकरण करणे, उदाहरणार्थ एखाद्या अभिजात पुस्तकाची आवृत्ती लवकर संपली तर त्याचा जाहीर गौरव आणि प्रचार करणे वगैरे गोष्टी सातत्याने करायला हव्यात. टीव्ही चॅनेल, वृत्तपत्रे वगैरे प्रसारमाध्यमे आणि ‘फेसबुक’सारखी समाजमाध्यमे आणि सेलिब्रिटी यांचा खरे तर यात अत्यंत परिणामकारक सहभाग होऊ शकतो.

अशी पंचसूत्री, सप्तसूत्री, दशसूत्री वगैरे देता येऊ शकेलही, पण यात महत्त्वाचे आहे ते आपल्याला अगदी आतून ‘वाचाल, तर समृद्ध व्हाल’ हे पटलेले असणे. भवतालातली असहिष्णुता, असंस्कृतता आणि अगतिकता कमी करण्यासाठी वाचन हा रामबाण उपाय आहे, हे समजून घ्यायला हवे आणि ते आंतरिक उमाळ्याने इतरांना समजावून सांगायला हवे. पुस्तकांच्या तुलनेने तरुण असणाऱ्या क्रिकेट आणि चित्रपट या गोष्टी आपल्या समाजजीवनाच्या केंद्रस्थानाकडे इतक्‍या वेगाने कूच करू शकतात, तर आपल्या प्रयत्नाने वाचन आणि पुस्तकांना ते स्थान देणे अशक्‍य नाही. ‘परेटो’चा नियम वळवून असे म्हणता येईल की भल्याचे प्रमाण वाइटाच्या तुलनेत नेहमीच कमी असते; पण तरी समाजाचा तोल सांभाळला जातो, कारण भल्याची ‘शक्ती’ अधिक असते. वाचनसंस्कृती ही या अशा ‘भल्या’ गोष्टींपैकी एक आहे याची खात्री पटली, तर सुरवातीला म्हटलेली ‘उन्नत वाचनसंस्कृती’ हे केवळ दिवास्वप्न राहू नये. शेवटचे एक म्हणजे अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकल्पाचे यश मुलांचा, तरुणांचा सहभाग या घटकांवर अवलंबून असते, कारण असले प्रकल्प भविष्याकडे वाटचाल करणारे असतात. तेव्हा उन्नत वाचनसंस्कृतीच्या दिशेने पावले टाकणारी कोणतीही योजना आखताना त्यात तरुणांचा अधिकाधिक सहभाग राहील, याची काळजी घ्यायला हवी आणि एक लक्षात घ्या, आजचे तरुण तुमच्या वैचारिक पठडीला भले धक्के देत असतील, पण ते तुमच्यापेक्षा स्मार्ट आहेत. तेव्हा वाचनसंस्कृतीच्या उन्नतीच्या योजना तरुणांमार्फत अमलात आणायच्या असतील, तर त्या त्यांना समजतील, पटतील आणि आवडतील अशा भाषेत आणि शैलीत हव्यात. त्यासाठी तुमच्या मनाच्या अँटेना तरुणांच्या कळपात टांगायला हव्यात. श्रेयसाभिमुख सुसंस्कृत समाज हवा असेल तर हे एवढे करायलाच हवे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com