हौस ऑफ बांबू : नाना-नानी आणि संज्या-छाया...!

नअस्कार! मराठी रंगभूमीवर सुध्द मनाचा एकच दिग्दर्शक आहे, आमचे मित्र चंद्रकांत कुलकर्णी. या माणसाचं मन सुध्द, तर त्यांचे (आणि आमचे) कॉमन परममित्र परशांत दळवी यांचं मन एकदमच विसुध्द.
hous of bamboo
hous of bamboosakal
Summary

नअस्कार! मराठी रंगभूमीवर सुध्द मनाचा एकच दिग्दर्शक आहे, आमचे मित्र चंद्रकांत कुलकर्णी. या माणसाचं मन सुध्द, तर त्यांचे (आणि आमचे) कॉमन परममित्र परशांत दळवी यांचं मन एकदमच विसुध्द.

नअस्कार! मराठी रंगभूमीवर सुध्द मनाचा एकच दिग्दर्शक आहे, आमचे मित्र चंद्रकांत कुलकर्णी. या माणसाचं मन सुध्द, तर त्यांचे (आणि आमचे) कॉमन परममित्र परशांत दळवी यांचं मन एकदमच विसुध्द. एकदम, म्हणजे शतप्रतिशत विशुध्द. सुध्द आणि विसुध्दाची ही ‘चंद्या-परशा’ची अभिन्न जोडी मराठी रंगदेवतेच्या पालखीचे बिनीचे भोई आहेत. बऱ्याच काळानंतर त्यांनी दळवींचं एक छानदार नाटक आणलंय असं कळलं. जाम आनंद झाला. चंद्रकांत कुलकर्णींच्या हातात जुनं नाटक द्यावं. कोरंकरकरीत करुन आणतात! मध्यंतरी तर त्यांनी साडेतीनशे वर्षांचा हॅम्लेटच आणून रंगभूमीवर उभा केला होता. (‘बघावं की न बघावं?’ असा प्रश्नच पडण्याची सोय ठेवली नाही.) कोराकरकरीत हॅम्लेट. डिट्टो सुमीत राघवनसारखा दिसणारा! नव्वदीच्या दशकात चंदूरायांनी महेश एलकुंचवारांचं ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ अशी तीन नाटकं लागोपाठ केली. त्याकाळात ओटीटी, वेबसीरिज वगैरे प्रकार नव्हते, (म्हणून) धारावाही नाटक त्यांनी आणलं. कमाल आहे की नाही? एलकुंचवारांनी ‘वाडा चिरेबंदी‘ लिहिलं तेच जुनं म्हणून!! डायरेक्ट जुनं नाटक लिहिण्याची प्रतिभा एलकुंचवारांकडेच आहे. असो. त्यात आता चंदू कुलकर्णींनी दळवींचं नाटक आणल्याचं कळलं. जाहिरात वाचली.- जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित - संज्याछाया!! जाहिरात वाचून मी आधी च्याटच पडले. म्हटलं. इश्श, काय बाई तरी प्रिटिंग मिस्टेक! तडक चंदूरायांना फोन केला.

‘अरे, काय म्हणतेयस सरे, कशी आहेस, आली नाहीस नाटकाला! ये ना, कमालच झाली, अजून कसं नाही पाहिलंस? अरे, अरे अरे...बरं, पुण्याला मंगळवारी शो आहे, काल ठाण्यात होता, येणारेस का? आधी कळवून मग ये! नाही...मी नसेन नाटकाला, पण तू (तिकिट काढून) ये! मी एका वेबसीरिजवर काम करतोय...’’ चंदूरायाची औरंगाबाद सुपरफास्ट फोनवरुन धाडधाड सुरु झाली की मधली स्टेशनं घेत नाही. शिवाय फोन अश्शा आपुलकीनं उचलतात की समोरच्याला वाटावं की जन्मभर हा मनुष्य आपल्या फोनची वाऽऽट पाहात बसला आहे! पण तसं काही नसतं हं. सगळ्याच फोनवर चंदू कुलकर्णी आत्मीयतेनं बोलतात. सगळ्यात शेवटी ‘भेटू या नक्की’ असं म्हणायला अजिबात विसरत नाहीत. (आणि अजिबात भेटत नाहीत. असो!)

‘राया, नाटकाच्या जाहिरातीत प्रिंटिंग मिस्टेक आहे. मुळेकाकांचं लक्ष नाही का?,’’ फोनवरुन मी. पलिकडून भलभलते आवाज आले. थोड्यावेळाने चंदूरायाचा आवाज उमटला. ‘‘स्पीकर फोन चालू होता. मुळेकाकांनी ऐकलं!’’ पलिकडून घाबऱ्याघुबऱ्या दिग्दर्शक म्हणाला, ‘‘त्यांचं म्हणणं पहिल्यापास्नंच नाटकाचं नाव चुकलंय, असंच आहे!’’

‘संज्या-छाया काय, संध्याछाया पाहिजे नं? दळवींचं ओरिजिनल मी पाहिलंय...,’’ मी.

‘ते दळवी वेगळे, आमच्या नाटकाचे लेखक दळवी वेगळे! हे प्रशांत दळवी आहेत...आणि नाटकाचं नाव संज्या-छाया असंच आहे...,’’ चंदूरायांनी घाईघाईने खुलासा केला. मागल्या बाजूला बहुधा मुळेकाका असणार!!

अच्छा! म्हणजे अशी भानगड आहे तर...जयवंत दळवींच्या ‘संध्याछाया’मध्ये विजयाबाई मेहता आणि माधवराव वाटवे होते. त्यांचा नाना-नानीचा रोल मस्तच होता. प्रशांत दळवींच्या ‘संज्या-छाया’मध्ये संजय पाटील आणि छाया पाटील या दाम्पत्याची कहाणी आहे. नाना-नानींच्या वार्धक्यातल्या संध्याछाया हृदयाला भिववणाऱ्या होत्या, संज्या-छाया हे जोडपं वार्धक्य मस्त एन्जॉय करणारं आहे. काळ बदलला, तर नाना-नानींना नको का बदलायला?

मराठी रसिकांना वैधानिक इशारा : ‘संध्याछाया’ असं चुकीचं वाचून ‘संज्या छाया’ नाटकाला डझनभर रुमाल घेऊन जाल, आणि हसून हसून परत याल! चंद्या-परशाचा हिरमोड कराल. तेवढी काळजी घ्या म्हंजे झालं...बराय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com