हौस ऑफ बांबू : ...पेरण्या खोळंबल्या आहेत!

हवामानखात्याच्या आदेशानुसार आमच्या पुण्यात नाही म्हणायला दोन-चारदा पाऊस पडला. पण तेवढाच.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

हवामानखात्याच्या आदेशानुसार आमच्या पुण्यात नाही म्हणायला दोन-चारदा पाऊस पडला. पण तेवढाच.

नअस्कार! पर्जन्यकाळ आला की दोन प्रकारची माणसं आभाळाकडे डोळे लावून बसतात. एक शेतकरी आणि दुसरे कवी!! (दोघेही कायम बांधावर!) पावसाचा काळ हा कवितांचा हंगाम असतो. पाऊस अंदमान साइडनं येतो असं ऐकून आहे, पण कविता चहू दिशांनी येतात. कारण काव्यप्रतिभेला कसला आलाय दिशामार्ग आणि एलनिनो वगैरे? काहीही असो, यंदा पावसानं थोडी ओढ दिल्यानं कविलोकही हवालदिल झाले आहेत, हे खरं. पावसाळी काव्याचं उत्पादन कसं घ्यायचं? अशानं दुष्काळ येईल, असं मला किमान डझनभर कविमंडळींनी सांगितलं.

हवामानखात्याच्या आदेशानुसार आमच्या पुण्यात नाही म्हणायला दोन-चारदा पाऊस पडला. पण तेवढाच. शेतकरीबांधवांना निदान प्याकेज तरी मिळतं, कविंना कोण देणार प्याकेज? हवामान खात्यानंही यंदा पाऊस लौकर येणार अशी बातमी दिली. ती फेक न्यूज निघाली. आम्ही कविलोक बसलो कागद-पेन घेऊन! पण कसलं काय...

सात जूनपास्नं मी हातात कागदांचा गठ्ठा घेऊन आणि ओठांमध्ये लेखणी चावत पावसाची वाट पाहात्ये आहे. पण आज पंधरा दिवस झाले, फक्त अडीच-तीन पावसाच्या कविता झाल्या. घाम पुसता पुसता पावसाच्या कविता कशा करणार? सांगा ना... खूप वर्षापूर्वी कविवर्य मंगेशण्णा पाडगावकरांनी मुंबईच्या बसमध्ये बसून भर उकाड्यात घाम पुसत ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ हे गाणं लिहिलं होतं, अशी आख्यायिका आहे. आपण काही पाडगावकरांसारखे प्रतिभावान कवी नाही, तरीही मी मस्तपैकी मेट्रोतून (अर्थात पुणे) हिंडून आले. एक ओळ मनात उमटली नाही. आता काय करायचं? कधी येणार पाऊस? कशी फिटणार हौस? (घ्या, दोन ओळी आपोआप झाल्या...) मान्सून वेळेत आला असता तर एवढ्या वेळात डझनावारी कविता झाल्या असत्या. आणि अचानक काय झालं कुणास ठाऊक, गडगडाट झाल्यासारखा ‘घुमड घुमड’ असा आवाज उमटला. पावसाच्या ओढीनं पहिल्यांदा कागद पुढ्यात ओढला, तेव्हा झरझर ओळी उमटल्या :

आभाळात कापूस, भिजरे मन

भिजऱ्या मनात, काळे घन

काळ्या घनात थेंबांची कूस

थेंबाच्या कुशीत आभाळभर कापूस!

...कशा वाटल्या ओळी? माझी मीच खुशालले. किती सुंदर ओळी नै? जणू काही युवतीच्या केशसंभारामध्ये अडकलेले पावसाचे स्फटीकसमान थेंबच जणू!! शब्द नि शब्द कर्दळीच्या पानावर (कमळाच्या पानावर म्हणणार होत्ये, पण हल्ली कमळ टाळत्येच मी!) घरंगळणारे पावसाचे थेंबच जणू! ही कवितांची अचानक आलेली ‘सर’ कुणाला तरी दाखवावी, ऐकवावी असं भारी वाटू लागलं. कुणाला ऐकवू? प्रश्नच पडला...

त्याच दिवशी नेमकं जंगली महाराज रोडवर जाणं झालं, पाहाते तो काय! तिथं गर्दीतून लपतछपत आमचे लाडके पुण्याचे विल्यम वर्डस्वर्थ ऊर्फ देखणे आणि तरुण कविराज संदीप खरे चालले होते. त्यांना हटकलं :

कविराज, लपून छपून कुठं दौरा?’’

‘लोक एकेकटं गाठून पावसाच्या कविता ऐकवून अभिप्राय विचारतात, म्हणून लपत छपत!’ घाम पुसत त्यांनी खरेखरे सांगितले. तरीही त्यांना मी या चार ओळी जबरदस्तीनं ऐकवल्याच. विचारलं, ‘कशा आहेत ओळी?’

‘वैभव जोशींना गाठा, ते सांगतील! सध्या ते जोरात आहेत...,’ अशी सूचना करुन ते गर्दीत पसार झाले.

वैभव जोशी हे हमखास अप्रतिम गाणी-गझला-कविता रचणारे लोकप्रिय कवी आहेत. त्यांना फोनवर गाठलं. तर ते घाईघाईनं म्हणाले की, ‘मला कशाला? थेट गुरु ठाकुरांनाच गाठा ना, सगळाच फैसला होऊन जाईल. गुरु ठाकूर इज लास्ट वर्ड!’ जाऊ दे! पाऊस येवो, म्हंजे मिळवली. आमच्याही पेरण्या खोळंबल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com