हौस ऑफ बांबू : एम. एल. ओ. साहेबांची नस्ती उठाठेव!

नअस्कार! उकाडा वाढत चालला आहे. डोळ्याला डोळा लागत नाही. लागलाच तर नाही, नाही ती स्वप्न पडतात. परवा स्वप्नात मी सरकारी कार्यालयात गेले होते.
हौस ऑफ बांबू : एम. एल. ओ. साहेबांची नस्ती उठाठेव!
Summary

नअस्कार! उकाडा वाढत चालला आहे. डोळ्याला डोळा लागत नाही. लागलाच तर नाही, नाही ती स्वप्न पडतात. परवा स्वप्नात मी सरकारी कार्यालयात गेले होते.

नअस्कार! उकाडा वाढत चालला आहे. डोळ्याला डोळा लागत नाही. लागलाच तर नाही, नाही ती स्वप्न पडतात. परवा स्वप्नात मी सरकारी कार्यालयात गेले होते. आता सरकारी कार्यालय ही काय स्वप्नात येण्याची (किंवा जाण्याची) जागा आहे का? लोक किती छान छान ठिकाणी जातात. आमच्या स्वप्नात मात्र सरकारी कचेरी. जाऊ दे, झालं. एखाद्याचं नशीब म्हणायचं आणि सोडून द्यायचं.

स्थळ : एक कचेरी. वेळ : दुपारची. सरकारी भिंतीवर पाटी होती.- ‘मराठीत व्यवहार न केलेस दंड आकारणेत येईल!’ पुढ्यात एक सरकारी अधिकारी बसला होता. आपण प्रचंड कामात आहो, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. हा चेहरा एकेकाळी चांगली गुर्मी बाळगून असावा, असेही वाटून गेले. त्याअर्थी तो कारकूनच असावा!!

‘एक्सक्यूज मी…,’ मी.

‘बाई, मराठीत बोला!,’ कारकून करडेपणाने करवादला.

‘क्षमा करा, हे अफिडेविट अटेस्ट करुन हवं होतं. अर्जंट आहे थोडं…,’ मी म्हणाल्ये आणि ठेवणीतलं स्मित केलं. या एका स्मिताच्या जोरावर मी साहित्य संमेलनाचे मांडवच्या मांडव आडवे करते, असा माझा लौकिक! एका प्रथितयश कविनं केवळ या स्मिताने घायाळ होऊन आख्खा एक काव्यसंग्रह मला अर्पण केला होता…असो. एकेक जुन्या आठवणी. पण या स्वर्गीय स्मिताचा त्या सरकारी गृहस्थावर काडीचा परिणाम झाला नाही.

‘अफिडेविट नाही, शपथपत्र, अटेस्ट नाही, साक्षांकित…अर्जंट नाही, तातडीचे!’ कारकून (मेला!) करडेपणाने म्हणाला, आणि भिंतीवरल्या पाटीकडे त्याने पेनाने, सॉरी, लेखणीने निर्देश केला. मी सर्द झाल्ये!

‘सॉरी हं..!’’ मी वरमले तरी सुंदर दिसत्ये, असं एकदा विभागीय साहित्य संमेलनातल्या परिसंवादाच्या वेळी चहा पिताना एका प्रथितयश लेखकानं...मरु दे.

‘सॉरी नाही, क्षमस्व! मराठीत बोलला नाहीत तर दंड होईल. प्रति ‘सॉरी’स ११ रुपये तेहेतीस पैसे फक्त इतका आकार पडेल! दंडाची रक्कम कक्ष क्र. ३ मधील गवाक्षात जमा करावी!’ त्याने रेटकार्डच पुढ्यात टाकले.

‘हे कसलं रेटकार्ड?,’ मी.

‘अहो, दरपत्रक, दरपत्रक म्हणा!,’ तो घाईघाईने इकडे तिकडे पाहात ओरडला.

‘आपण येथले ज्येष्ठ लिपिक आहात का?’ काळजीत पडून मी विचारले.

‘आयम धी एमएलओ टु धी एमसीसर!’ सरकारी आवाजात अचानक चढेलपणा आला.

एमएलओ म्हंजे? हा माझ्या मनातला प्रश्न मनातच राहिला.

‘मराठी लँग्वेज ऑफिसर!,’ तो म्हणाला.

‘ओह, म्हंजे मराठी भाषा अधिकारी!! अभिनंदन हं…या ना एकदा आमच्या साहित्य संमेलनाला!’ मी निमंत्रण देऊन टाकले. शेवटी मराठी भाषा याच मंडळींमुळे वाढणार आहे.त्यांना साहित्याच्या प्रांगणी बोलवायला नको का? ‘अहो, काय करणार? इथं मराठीवर फार लक्ष ठेवावं लागतं. कोण कधी चुकून हिंदी- इंग्रजीत नोट पुटप करायचा, आणि आमची नोकरी जायची…तसं हे एक पूर्णकालिक अवैतनिक (पक्षी : फुलटाइम नॉटपेड) काम आहे म्हणा,’ कपाळावरचा घाम पुसत एमएलओसाहेब म्हणाले. अनुकंपा तत्त्वावर मी त्यांच्याकडे बघून पुन्हा स्वर्गीय स्मित केले. परंतु त्याच वेळी अनुज्ञप्ती, नस्ती, उपरिर्निर्दिष्ट, अधिग्रहित, अवसायन, निर्लेखित, निर्देशित, आवक, जावक, अत्यंत निकडीच्या प्रवर्गाखाली, व्यपगत करणे…असले अनेक सरकारी मराठीतले शब्द फेर धरुन माझ्या भोवती नांचू लागले. दात विचकून हांसू लागले, आणि मला भोवळच आली. …जाग आली तेव्हा पहाटेचे सातसाडेसात झाले होते. एमएलओसाहेबांकडे जायची कधीही आपल्यावर वेळ येऊ नये, या विचाराने पुन्हा झोपच आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com