हौस ऑफ बांबू : वसंतराव, पसंतराव आणि उसंतराव!

नअस्कार! सर्वप्रथम माझ्या लाखो चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! तुम्हा सर्वांच्या मुखी बारोमास श्रीखंड पडो, हीच मनोकामना.
Hous Of Bamboo
Hous Of BambooSakal
Summary

नअस्कार! सर्वप्रथम माझ्या लाखो चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! तुम्हा सर्वांच्या मुखी बारोमास श्रीखंड पडो, हीच मनोकामना.

नअस्कार! सर्वप्रथम माझ्या लाखो चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! तुम्हा सर्वांच्या मुखी बारोमास श्रीखंड पडो, हीच मनोकामना. माझं (मेलं) आणि श्रीखंडाचं राहू दे, त्याच्यापेक्षाही गोड मेजवानी निवडक रसिकांना आज मिळणार आहे. हे निवडक रसिक म्हंजे ज्यांनी ‘मी... वसंतराव’ हा चित्रपट पाहण्यासाठी आजचा दिवस आणि तिकिट राखून ठेवला असेल ते!! मी तरी जाणार आहेच...

आपल्या मराठी संस्कृतीचे (पक्षी : पुणे) साडेतीन खंदे आधारस्तंभ आहेत. आधारस्तंभ म्हटलं की पर्वतीला किंवा कमला नेहरु उद्यानाकडे निघालेले कानटोपीधारी ज्येष्ठ नागरिक डोळ्यासमोर येतात. पण इथं तसं नाही! हे आधारस्तंभ तरुण आहेत. पहिला आधारस्तंभ महाराष्ट्राचे आधुनिक वसंतराव ऊर्फ राहुलजी देशपांडे! त्यांचा ‘मी...वसंतराव’ हा चित्रपट गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला रसिकांच्या दरबारी रुजू झालाय. गेल्या वर्षीच व्हायला हवा होता, पण कोरोनामुळे मुहूर्त टळला. तोवर आम्ही केवळ राहुलसाठी ‘यूट्यूब’ला चिकटून होतो. तिथं हे वसंतराव फिल्मी गाण्यांच्या मैफलीही जबरी रंगवतात. किशोरकुमार काय, महम्मद रफी काय...विचारु नका! कीबोर्डच्या साथीनं आमचे पंडितजी गायला बसले की, कान तृप्त!!

मराठी-हिंदीत गाणी म्हणायची आणि मग फक्त लॉकॉलेजवरच्या कॅफेत ऐकायला मिळतं तश्शा पुणेरी इंग्रजीत कॉमेंटरी सुरु!! (वी कॉल इट निरुपण यु नो!) हे ‘अनप्लग्ड’ काँबिनेशन भन्नाटच आहे. ‘आय स्टिल रिमेंबर...व्हेन आय वॉज एक किड...’ असं राहुलजी पोक्तपणे सांगायला लागले की आपलं मन गाण्यामुळे तृप्त झालंय की राहुलजींच्या बोलण्यामुळे, हेच कळेनासं होतं! ‘मी...वसंतराव’मध्ये ते वसंतरावांच्याच भूमिकेत आहेत. ‘आमच्यापासूनच सुरु होतं आमचं घराणं...’ हा डायलॉग भविष्यात गाजणार आहे, लिहून ठेवा!!

दुसरे पसंतराव! म्हणजे आमचा मनपसंत मित्र अमेय वाघ... फा. फेणेपासून मा. दीनानाथांपर्यंत कुठल्याही भूमिका वाघाच्या आवेशात करणारा ‘नाटक कंपनी’वाला! ‘मी...वसंतराव’मध्ये मा. दीनानाथांची व्यक्तिरेखा साकारताना अमेय ऊर्फ पसंतराव, राहुल ऊर्फ वसंतरावांना विचारतात, ‘‘गाणं कुठं शिकलात?’’ तर वसंतराव म्हणतात, ‘‘तुमच्याकडेच!’’ तेव्हा अमेय ऊर्फ पसंतराव सर्द होतात, तो अभिनय अगदी नैसर्गिक जमलाय म्हणे!

तिसरे आमचे उसंतराव ऊर्फ निपुण धर्माधिकारी! नाटकांमधून अधूनमधून उसंत मिळताच पुन्हा नाटक करणाऱ्या निपुणचं नैपुण्य पुण्यात बहरलं, कारण त्याच्या नावातच निपुणं आहे! (विनोद भिकार असला तरी राहू दे. चालतो एखादवेळी...) दोन-अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट. वसंतराव ऊर्फ राहुल, पसंतराव ऊर्फ अमेय आणि उसंतराव ऊर्फ निपुण यांना नळ स्टॉपला एकत्र बघून पुन्हा काही ‘नाटक कंपनी’ची भानगड नाही ना, असं सुरवातीला वाटलं होतं. कारण नळस्टॉप (खुलासा : हा पुण्यातील एक एवंगुणविशिष्ट भाग आहे.) हा वसंतराव, पसंतराव आणि उसंतरावांच्या करिअरमधला एक केंद्रबिंदू आहे! तिघांच्याही मुक्कामाचे रस्ते शेवटी नळस्टॉप आणि पुढे सुलभा ब्रह्मे यांच्या ‘लोकायत’शी मिळायचे. हे तिघेही दबकत दबकत नळस्टॉपला भेटून पुढे ‘मी...वसंतराव’ची चर्चा करत. चर्चा करता करता उसंत मिळाल्याने उसंतरावांनी तीन महिन्यात पटकथाच लिहून काढली म्हणे.

सांप्रतकाळी सगळी दुनिया हलगीबाज गाणी पुढे रेटत असताना या तिघा-चौघा पुणेकरांनी ‘मी...वसंतराव’च्या रुपानं अभिजाताचं एक लडिवाळ रुप पुढे आणण्याचं धाडस केलं, हे कौतुकास्पद आहे. चित्रपट कसा झालाय, हे रसिक ठरवतीलच, पण केवळ या धाडसासाठी मी तिघांनाही ‘दुर्गा’मध्ये कॉफी देईन. हल्लीच्या ‘फायलीं’च्या जमान्यात, या ‘झुंड’शाहीत एक सुरेल गुढी पडद्यावर उभी राहाते आहे, तिचं स्वागतच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com