हौस ऑफ बांबू : मराठीचे (लक्षाधीश) मानकरी!

नअस्कार! गेले दोन दिवस जीव घाबराघुबरा होत होता. घशात वारंवार आवंढा येत होता. थोडी कणकणही वाटत होती. डोकं दुखल्यासारखं आणि पित्त झाल्यासारखं वाटत होतं.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

नअस्कार! गेले दोन दिवस जीव घाबराघुबरा होत होता. घशात वारंवार आवंढा येत होता. थोडी कणकणही वाटत होती. डोकं दुखल्यासारखं आणि पित्त झाल्यासारखं वाटत होतं.

नअस्कार! गेले दोन दिवस जीव घाबराघुबरा होत होता. घशात वारंवार आवंढा येत होता. थोडी कणकणही वाटत होती. डोकं दुखल्यासारखं आणि पित्त झाल्यासारखं वाटत होतं. डॉक्टरांना दाखवायला गेले तर ते म्हणाले, ‘वासबिस येतोय का? भूकबिक लागतीये का? चवबिव कळतेय का?’ हल्ली भूक मंदावलीये हे तेव्हा लक्षात आलं. एकेकाळी एका बैठकीला बेडेकरांची दोन प्लेट मिसळ सहज खाणारी मी, हल्ली एक्सट्रा सँपलसुध्दा मागेनाशी झाली आहे. गंभीर चेहरा करुन डॉक्टर म्हणाले, ‘आर्टीपीसीआर करुन घ्या! कधीपासून ही सिम्पटम्स जाणवतायत?’ म्हटलं, ‘अहो, परवाच मराठी भाषा राज्य पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी वाचत होत्ये!

आमच्या लेखकांना लाखा-लाखाची बक्षिसं मिळाल्याचं वाचलं आणि…एकदम कसंसंच झालं, बघा!’ ‘तरीच!’ स्टेथास्कोप पुन्हा गळ्यात अडकवत डॉ. म्हणाले. त्यांनी त्रिफळाचूर्णाची बाटली हातात दिली, आणि मी घरी आल्ये! देनेवाला जब भी देता है, पूरा छप्पर फाड के देता है! उदाहरणार्थ आमचे मराठीचे नवे प्रांताधिकारी रा. भारत सासणेसाहेब!! उदगीरचं साहित्य संमेलाध्यक्षपद त्यांच्या घरी चालत आलं, त्याला महिना जेमतेम उलटला असेल, पाठोपाठ विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही दारात हजर!! हे म्हंजे एकाच महिन्यात जिल्हाधिकाऱ्याची सूत्रं स्वीकारल्यानंतर थेट मंत्रालयात सचिवपदी बढती मिळाल्यासारखंच!! साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हा एक प्रकारे जीवन गौरवच असतो म्हणा. ‘आजवर बरंच लिहिलंत, आता नाही लिहिलंत तरी चालेल’ असा एक छुपा संदेश त्यात असतोच. गेल्याच महिन्यात राज्य सरकारनं दुकानांच्या पाट्या मराठीतच लावण्याची सक्ती केली होती. त्याचं सासणेसाहेबांनी भरघोस समर्थन केलं होतं. दुकानाच्या पाट्या मराठी केल्यामुळे मराठी माणसाच्या मनातला न्यूनगंड जाईल, असं त्यांचं म्हणणं! (जाऊ दे, जाऊ दे!) त्यालाही पंधरवडा उलटत नाही तोच सुभाषामंत्री रा. सुभाषजी देसाई यांनी त्यांना थेट जीवनगौरवच जाहीर केला.

आमचे कविमित्र राजू देसले यांच्या ‘अवघाचि उच्चार’ या काव्यसंग्रहालाही बहिणाबाई चौधरी पुरस्कार मिळाला. (पन्नास हजारांचा!) काव्यसंग्रहाला बरे दिवस आले या कल्पनेनं मी मोहोरलेच. आमच्या नाशिकच्या डॉ. मृदुला बेळेंनाही लाखाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचं ‘कोरोनासोबत जगायला शिका’ हे पुस्तक मी तर हल्ली उशाशी ठेवूनच झोपत्ये.

पहिल्या लॉकडाऊनच्या काळात अवघ्या दीड महिन्यात मृदुलाताईंनी दणक्यात हे पुस्तक लिहून काढलं. कोरोनाची लस जशी संशोधकांनी विक्रमी वेळेत शोधून काढली, तसलाच हा प्रकार! इतकंच नव्हे, तर कुठलीही ह्यूमन ट्रायल वगैरे न घेता आमच्या ‘राजहंस’राव माजगावकरांनी ते झटक्यात बाजारातदेखील आणलं. (मला भेट म्हणून पाठवलं हं!) मृदुलाताई या औषधशास्त्रातल्या पारंगत आहेत. आता पुरस्काराचे लाखभर रुपयेही आले!

कोरोनाकाळात काही डॉ. मंडळींनी उखळ पांढरं करुन घेतलं, असा लाडका आरोप केला जातो, हे खरं. पण मृदुलाताई ‘त्यातल्या’ डॉ. नाहीत, बरं का! बाकी बऱ्याच जणांना पुरस्कार मिळाले आहेत. सगळेच आमचे स्नेही, मार्गदर्शक आणि लाडके लेखक! नावं तरी किती घेऊ? या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन! बाय द वे, बसल्या बसल्या मी पुरस्काराच्या रकमांची टोटल मारली. (मराठी स्वभाव…जित्याची खोड जाणार कशी?) सगळे मिळून ४८ लाख रुपये भरले!! साहित्य संमेलनाला २५ लाखाचं सरकारी अनुदान आणि वर ही ४८ लाखांची सरकारी बक्षिसं! मराठी अभिजात भाषा होईल तेव्हा होईल, संपन्न होण्याकडे वाटचाल मात्र नक्कीच सुरु आहे. हो की नै?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com