आत्मविश्‍वास वाढला, आता दबदबा वाढावा 

hockey
hockey

भारतीय महिला हॉकीचे हे विजेतेपद सुखद धक्काच आहे. आपण तगड्या चीनला हरवले. चीनविरुद्ध या स्पर्धेपूर्वीच्या 44 पैकी केवळ सहा लढती भारताने जिंकल्या होत्या, यावरून या विजयाचे महत्त्व लक्षात येते. आम्ही खेळत होतो, त्या वेळी चीनने हॉकीस नुकतीच कुठे सुरवात केली होती. आपले मार्गदर्शक तिथे शिकवायला जात होते. आज तोच चीन तुल्यबळ झाला आहे. कोरिया संघही महिला हॉकी ऑलिंपिकमध्ये आला, त्या वेळी कुठे अग्रगण्य संघात गणला जात होता? पण सराव शिबिरे सुरू करून चार वर्षात त्यांनी रौप्यपदक जिंकले. हा धडाका सलग चार स्पर्धात कायम ठेवला. खेळातील प्रगतीसाठी काय करावे लागते, किती प्रगती करता येते, किती कष्ट घेतले जातात, हे या दोन संघांच्या कामगिरीवरून दिसून येते. 

जसे पराभवातून खूप काही शिकायचे असते, तसेच विजयातूनही शिकायचे असते. आपण त्यादृष्टीने मंथन घडविण्याची आवश्‍यकता आहे. गेल्याच महिन्यात भारतीय महिला हॉकी संघाचे मार्गदर्शक बदलण्यात आले. प्रशिक्षकांमध्ये वारंवार बदल व्हायला नकोत. मार्गदर्शक तसेच खेळाडूंना एकमेकांना समजून घ्यायला पुरेसा वेळ द्यायला हवा, या मतावर मी ठाम आहे. खेळाडूंनाही मार्गदर्शकांना काय हवे ते समजून घ्यायला लागते. त्यांचा भर आक्रमणावर आहे की बचावावर, त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, हेही समजावे लागते. आणखी एक सूचना म्हणजे भारतीय महिला हॉकी संघासाठी भारतीय मार्गदर्शकच हवेत. भारतीय महिला हॉकीपटूंना परदेशी मार्गदर्शकांबरोबर संवाद साधता येत नाही. त्यांचे दडपण त्यांच्यावर येते. आता 2004 आणि 2017 च्या आशिया करंडक महिला विजेतेपदात एक गोष्ट समान असेल, तर ती म्हणजे या दोन्ही संघांचे मार्गदर्शक भारतीयच होते. या निमित्ताने याही प्रश्‍नावर चर्चा व्हायला हवी. आपण आपल्या मार्गदर्शकांना कमी का लेखतो? भारतीय वंशाचे अनेकजण जगातील अनेक कंपन्यात मोठ्या पदावर आहेत, तरीही आपल्याला परदेशी मार्गदर्शक का हवेत? परदेशी मार्गदर्शक असले की प्रश्न सुटतात असे नव्हे, तर ते वाढूही शकतात. आता हरेंद्र सिंग यांनी एका महिन्यात फार बदल नक्कीच केले नसणार. हरेंद्र हे कठोर मेहनतीस प्राधान्य देणारे, खेळाडूंना खेळात झोकून देण्यास भाग पाडणारे, शिस्तप्रिय मार्गदर्शक आहेत. त्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढवला आहे. पण आता गरज आहे ती महिला हॉकीत आपला दबदबा वाढण्याची. या विजेतेपदाने भारतीय संघ विश्‍वकरंडक स्पर्धेस थेट पात्र ठरला. खरे तर दक्षिण आफ्रिकेने आंतरखंडीय स्पर्धा जिंकल्यावर भारतीय महिला संघाचे विश्‍वकरंडक तिकीट पक्के झाले होते; पण, भारतीय महिला हॉकीपटूंना याप्रकारे वेटिंग लीस्टद्वारे नव्हे, तर पुरुष संघाप्रमाणे आशिया करंडक जिंकून विश्‍वकरंडकाचे तिकीट हवे होते. तसे ते आपण मिळविले. 

गेल्या काही वर्षांत भारतीय महिला खेळाडूंच्या उणिवा सातत्याने समोर येत होत्या. अगदी रिओ ऑलिंपिकमधील कामगिरी बघितली तरी ते जाणवेल. यातील मुख्य कारण म्हणजे दडपण. दडपणाखाली खेळात विस्कळितपणा येतो. गोलक्षेत्रात आपल्या खेळाडूंकडून चुका होतात. फिनिशिंग टचची उणीव असतेच. आशिया करंडक स्पर्धेत काही प्रमाणात या उणिवांवर नक्कीच मात केली. आपण पंचवीस एक गोल करताना केवळ पाचच स्वीकारले. चांगला सांघिक खेळ झाला, तर चित्र बदलू शकते हा विश्वास त्यातून आपल्याला आला. 

महिला हॉकीच्या आणखी प्रगतीसाठी बरेच काही करण्यासारखे आहे. आम्ही खेळत होतो, त्या वेळी देशभरात आठ ते दहा महिला हॉकीच्या अखिल भारतीय स्पर्धा होत असत. आता या स्पर्धा नाहीत. राष्ट्रीय संघातील खेळाडू खूप कमी वयातच येतात. त्यांना अन्य फार स्पर्धाच नसतात. किशोरी, युवक आणि वरिष्ठ गटात एकच खेळाडू दिसतात. गोलरक्षिका सविता जेमेतम 26 - 27 ची आहे; पण तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धातील दहा वर्षे झाली आहेत. आपल्याला हे यश खरेच साजरे करायचे असेल, तर महिला हॉकीच्या स्पर्धा वाढायला हव्यात. खेळाडूंची संख्या वाढायला हवी. हे घडले तर खऱ्या अर्थाने "चक दे' म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com