विखाराचे भीषण उद्रेक (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

फ्रान्समधील हल्लेखोरांचे भांडण स्वातंत्र्यवादी विचारांशीच आहे, असे दिसते. दहशतवादविरोधी रणनीतीचा नव्याने विचार करण्याची निकड या हल्ल्याने समोर आणली आहे. 

 

फ्रान्समधील हल्लेखोरांचे भांडण स्वातंत्र्यवादी विचारांशीच आहे, असे दिसते. दहशतवादविरोधी रणनीतीचा नव्याने विचार करण्याची निकड या हल्ल्याने समोर आणली आहे. 

 

युरोपातील प्रबोधन आणि पुनरुत्थान पर्वातील फ्रेंच राज्यक्रांतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, याचे कारण ही घटना केवळ फ्रान्समधील राजाच्या उच्चाटनापुरती सीमित नव्हती, तर एकूणच ‘मानवी स्वातंत्र्य‘ या मूल्याचा उद्‌घोष करणारी घटना होती. प्रस्थापितांच्या सर्वंकष अधिकारांचे प्रतीक बनलेला बास्तीलचा तुरुंग फोडणे, ही या क्रांतीतील एक महत्त्वाची घटना. चौदा जुलैला त्या दिवसाचे स्मरण होत असतानाच फ्रान्समधील नीस शहरात भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्लेखोराने निरपराध माणसांना तर चिरडलेच; पण त्यामागची वृत्ती फ्रेंच राज्यक्रांतीने पुरस्कारिलेल्या आधुनिक मूल्यांनाच चिरडण्याची आहे, हे लक्षात घ्यावे लागते. फ्रेंच राज्यक्रांतीने ज्या प्रस्थापितांच्या विरोधात एल्गार पुकारला होता, त्यात धर्मपीठही होते. मानवी मन त्यापासून मुक्त करण्याची ही चळवळ होती. इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांना आता 21 व्या शतकात घड्याळाचे काटे उलटे फिरवायचे आहेत. गेल्याच वर्षी ‘शार्ली हेब्दो‘ या नियतकालिकातील व्यंग्यचित्राचा सूड म्हणून त्याच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला, तर त्याच वर्षी फ्रान्समध्ये विविध ठिकाणी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांत 130 निरपराध नागरिकांना ठार मारण्यात आले. एकूणच दहशतवाद्यांनी फ्रान्सला लक्ष्य केले आहे, हे उघड दिसते. 

गुरुवारचे कृत्य कोण्या माथेफिरूने वेडाच्या भरात केलेले कृत्य नव्हते. थंड डोक्‍याने आणि योजनापूर्वक केलेला हा हल्ला होता. त्याच्या ट्रकमध्ये स्फोटकेही सापडली आहेत, यावरून त्याची स्पष्ट कल्पना येते. फ्रान्समधील हल्ल्यांची जबाबदारी यापूर्वी ‘इसिस‘ने स्वीकारली होती. ‘इसिस‘ ज्या प्रकारच्या हल्ल्यांचा सध्या पुरस्कार करीत आहे, त्याच्याशी या हल्ल्याचे साधर्म्य आहे. कमीत कमी व्यक्ती आणि साधनसामग्री वापरून जास्तीत जास्त जीवितहानी आणि विध्वंस घडवून आणायचा, असे हे तंत्र आहे. निरपराध लोकांना कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी मारून सरकार तुमचे संरक्षण करू शकत नाही, हे दाखवून देण्याचा प्रयत्न दहशतवादी करीत असतात. ट्रकचालक निरपराध व्यक्तींना चिरडत होता, त्याच वेळी फ्रान्समध्ये लष्करी संचलन चालू होते, हे वास्तवही एका अंतर्विरोधाकडे निर्देश करते. तो म्हणजे बलाढ्य लष्करी ताकद असली, तरी असे हल्ले थोपविता येत नाहीत. मागच्या हल्ल्याच्या वेळीही फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी देश युद्धस्थितीत असल्याची गर्जना केली होती. परंतु, शत्रूचे कोणतेही एक असे विशिष्ट केंद्र नाही, की ज्यावर हल्ला करून फ्रान्सला किंवा कोणत्याही देशाला दहशतवादविरोधी युद्ध केल्याचे समाधान मिळेल. उदाहरणार्थ, इस्लामी मूलतत्त्ववादी; विशेषतः ‘इसिस‘सारखी संघटना ज्या प्रकारे धार्मिक विखार पसरवीत आहे, त्याचा सामना कसा करणार, हा खरे म्हणजे आधुनिक जगापुढील प्रश्‍न आहे. पण त्याबाबत अद्यापही गांभीर्याने विचार सुरू आहे, असे दिसत नाही. दहशतवादाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या मुकाबल्याची योजना ठरवायला हवी. इराकवर खोटी कारणे दाखवून ज्या प्रकारे युद्ध लादले गेले, त्यामुळे अमेरिका व तिच्या मित्रदेशांविषयी मुस्लिमांमध्ये राग खदखदतो आहे. ‘इसिस‘त्याचा पुरेपूर फायदा तर उठवीत आहेच; पण त्याचबरोबर प्रतिगामी, मध्ययुगीन आणि विखारी तत्त्वज्ञानही पसरवू पाहत आहे. केवळ अल्पशिक्षित, गरीब किंवा बेरोजगार तरुणच त्याच्या सापळ्यात अडकत आहेत, असे नाही, तर उच्चशिक्षित आणि आर्थिक स्थिती उत्तम असलेल्यांनाही त्याची भूल पडत आहे, या वास्तवाची दखल घ्यायला हवी. म्हणजेच हा लढा द्वेषमूलक विचारसरणीच्या विरोधातील असायला हवा. ज्या इस्लामधर्मीयांसाठी आपण काम करीत आहोत, असे ‘इसिस‘सारख्या संघटना दाखवीत आहेत, त्यांच्याच हितावर त्या गंडांतर आणत आहेत. पश्‍चिम आशियातील अस्थिर परिस्थितीला कंटाळून हजारो नागरिक युरोपात स्थलांतर करीत आहेत, ते जगण्याच्या आशेने. परंतु, अशा हल्ल्यांमुळे त्यांच्या आशा-आकांक्षा धुळीला मिळण्याचा धोका आहे. स्थलांतरितांविषयी अधिकाधिक कठोर निर्बंध लादावेत, असा दबाव आता वाढत जाईल. अमेरिकेत आधीच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे अध्यक्षीय उमेदवार प्रचारात मुस्लिमांना लक्ष्य करीत आहेत. त्यांच्या या प्रचारात हवा भरण्याचे काम कोण करीत असेल तर हे दहशतवादीच करताहेत. व्यक्तिस्वातंत्र्य, उदारमतवाद, परस्परसहकार्यातून विकास या मूल्यांकडून धर्म आणि वंशाधारित संकुचित राष्ट्रवादाकडे विविध देशांची वाटचाल होणे हे अंतिमतः कोणाच्याच हिताचे नाही. त्यामुळेच दहशतवादविरोधी रणनीतीचा नव्याने विचार करायला लावणारा हा हल्ला आहे, हे लक्षात घ्यायला हवे.