शहाणपण दे गा देवा

शहाणपण दे गा देवा

गणेश मठात जायचा, तेथील गंध लावल्यामुळे पीडा दूर होते, असे ज्येष्ठ साधकांकडून ऐकल्याने ऍलर्जी असूनदेखील, तो गंध कपाळी लावायचा. त्यामुळे त्याला त्वचारोगाला सामोरे जावे लागायचे. त्यावर वेळोवेळी औषधोपचार करून घेणारा गणेश डॉक्‍टरांनी सांगूनदेखील गंध लावणे सोडायला तयार नव्हता. आश्रमात गुरुमंत्राची दीक्षा घेतलेली केतकी रात्रंदिवस जप करायची. यामुळे तिला नैराश्‍याला सामोरे जावे लागले होते. घरचे तिच्या या विक्षिप्त वागण्याला त्रासले होते. तिचा सततचा जप हा चर्चेचा विषय झाला होता. मुक्ती हेच आयुष्याचे उद्दिष्ट मानणारा विनय घरातील अनेक गोष्टींना दूर लोटून घरातून पलायन करत होता. त्यामुळे त्याचा संसार विस्कटला होता. पगार अत्यल्प असतानादेखील राजू गुरूच्या आज्ञेनुसार नाईलाजाने 20 टक्के रक्कम मठात दान द्यावयाचा. त्यामुळे महिनाअखेरीला तो कर्जबाजारी असायचा. पित्तप्रधान प्रकृतीच्या आदित्यने तरुणपणीच गुरुजींकडून एका वेळीच जेवायचे व्रत स्वीकारले. याचा त्याच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला होता. दहा वर्षे साधना करूनदेखील स्वतःत काहीच बदल नाही झाला, हे मान्य करणारा नागेश न चुकता रोज गुरूकुलात हजेरी लावायचा... अशी अनेक उदाहरणे पाहिली असता माणसे आपली आपणच निर्माण केलेली चौकट सोडायला तयार नसतात असे दिसून येते. 

एक छोटीशी कथा वाचण्यात आली होती. 

एका मानसशास्त्रज्ञाने आपल्या कोठडीत पाच लहान खोल्या तयार केल्या व पाचव्या खोलीत मिठाई ठेवून एक उंदीर सोडला. त्या उंदराने पाचव्या खोलीत जाऊन मिठाई फस्त केली. तीन दिवसांनंतर त्याने मिठाई तिसऱ्या खोलीत ठेवली. उंदीर नेहमीप्रमाणे पाचव्या खोलीत गेला. तेथे त्याला काहीही न मिळाल्यामुळे तो चौथ्या खोलीतून जाऊन बाहेर आला. मग तिसऱ्या खोलीत त्याला मिठाई सापडली. ती त्याने फस्त केली. उंदराला पाचव्या खोलीतील मिठाई न दिसल्याने तो इतर खोल्यांत शोधत फिरला. माणसाला मात्र प्रज्ञा असून तो चौकट का सोडत नाही हे मोठे कोडेच आहे. भीतीपोटी माणूस चौकट मोडायला तयार होत नाही. इंग्रजीत एक वाक्‍य आहे, "फियर इज अ डार्करूम व्हेअर ओनली निगेटिव्हज्‌ आर डेव्हलपड‘. भीतीपोटी नेहमी नकारात्मक भावनेचा विकास होतो. लहानपणापासून आपण मुलांना देवाची भीती दाखवतो, जिथे भीती तेथे उच्चतम प्रीती कशी नांदेल याचा कोणी विचारच करत नाही. भीतीपोटी शरण गेलेले साधक हे स्वतंत्र विचार करू शकत नाहीत. मग ऐकीव गोष्टींचे प्राबल्य वाढते.

काही लोक ‘जीवन एकदाच मिळते, कसले पाप व कसले पुण्य‘ म्हणून अनिष्ट गोष्टीकडे वळतात, तर काही भयाने अविचाराने पापभिरू होतात म्हणून गौतम बुद्धांचा मध्यम मार्ग ही काळाची गरज असल्याचे जाणवते. अध्यात्म हे नुसते मंदिर-कर्मकांड-आश्रम-मठ-गुरूकूल यातच नसते, तर ते जीवनशैलीचा एक भाग असते. एखाद्या महात्म्याने कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी जीवन अर्पण केलेले असते. ज्यांनी तहान, भूक, निद्रा, सुख-संपत्ती, विसरून नानाविध शोध लावून जनतेचे कल्याण केलेले असते, त्यांच्या प्रयत्नांचे मोल हे एकप्रकारे ऋषीमुनींचे तपच असते. समस्त मानवजातीचे हित व स्वहित ज्यांच्या कार्यामुळे होते, तेच खरे अध्यात्म असते. म्हणून अंधश्रद्धाळू न बनता, चौकटीतील गुलामगिरीत न अडकता, अंतर्मन व बुद्धीला पटेल व जे स्वहित व परहित करेल अशा गोष्टींचे पाईक व्हायला शिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com