किती तरी दिवसांत...

शेषराव मोहिते
बुधवार, 18 जानेवारी 2017

शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या, तेव्हापासून आपलं गाव सोडून नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं लहान-मोठ्या शहरांत स्थलांतर होण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलं. ते जेवढ्या प्रमाणात वाढायला हवं होतं, तेवढ्या प्रमाणात मात्र वाढलं नाही. एका नित्यपरिचयाच्या सुरक्षित परिघातून निघून दुसऱ्या अनोळखी जगात प्रवेश करण्याची ती प्रक्रिया विलक्षण व्यामिश्र स्वरूपाची असते.

शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या, तेव्हापासून आपलं गाव सोडून नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं लहान-मोठ्या शहरांत स्थलांतर होण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलं. ते जेवढ्या प्रमाणात वाढायला हवं होतं, तेवढ्या प्रमाणात मात्र वाढलं नाही. एका नित्यपरिचयाच्या सुरक्षित परिघातून निघून दुसऱ्या अनोळखी जगात प्रवेश करण्याची ती प्रक्रिया विलक्षण व्यामिश्र स्वरूपाची असते. जे जे खेड्यातून बाहेर पडले, त्यांना खेड्यात तरी भाग्यवान मानलं जातं; पण वयाच्या पंधरा-सोळा वर्षांपर्यंत ज्या गावात, घरात आपण वाढलो, वावरलो, ते अबोध मन घेऊन नव्या जगात प्रवेश करतानाचं बावरलेपण नव्या जगाची ओळख करून घेताना, त्याच्याशी जुळवून घेतानाचं अवघडलेपण आपण अनुभवलेलं असतं. कुणाला कोणत्या कारणासाठी गाव सोडावं लागलं, याची कारणे वेगवेगळी असतील. एखादा गावगाड्यातील एकेकाळी सर्वोच्च स्थानी असेल; पण काळाच्या ओघात त्याचे ते सर्वोच्च स्थान धोक्‍यात आलं, म्हणून त्याला गाव सोडावं वाटलं असेल. एखाद्याचा पारंपरिक व्यवसाय धोक्‍यात आला, म्हणून गाव सोडावं लागलं असेल. कुणाची उपजीविका ज्या शेतीवर अवलंबून आहे, ती शेती परवडत नाही, म्हणून गाव सोडावा लागला असेल, तर एखाद्याला गावातील जातीव्यवस्थेत सर्वांत खालचे स्थान असल्यानं, त्या अवहेलनेच्या जगातून बाहेर पडायचं, म्हणून गाव सोडून शहरात जावं लागलं असेल. ते काही असो. गेल्या साठ-सत्तर वर्षांत हे स्थलांतराचं प्रमाण वाढलं आहे, हे खरं.

ज्या गावात जन्म झाला आणि जिथे बालपण गेलं, त्या गावाची ओढ काही सुटत नाही आणि ज्या शहरात येऊन स्थायिक व्हायची वेळ आली, तिथे अजूनही जीव पुरेसा रमत नाही, अशा द्विधा अवस्थेत जगणारी किती तरी माणसं आणि त्यांच्या पिढ्या आपल्या सभोवताली वावरत असतात. मृगाचा पहिला पाऊस पडला म्हणजे गावाकडं पेरणीसाठी सुरू झालेली लगबग आठवली म्हणजे इथं जीवाची उगीचच तगमग होते. रानातून डगवून आलेली पिकं पाहिली की गावाचा सारा शिवार डोळ्यांपुढे उभा राहतो. पा गावाकडून चांगलं काही ऐकायला येईल, याची सूतराम शक्‍यता नसतानाही तिकडून काही तरी चांगली बातमी येईल, याची आशाळभूतपणे वाट पाहत असतो. प्रत्यक्षात जे काही चांगलं किंवा वाईट घडत असतं, ते शहरांसाठी आणि खेड्यांसाठी दोन्हींसाठी सारखंच असायला हवं; पण बहुतेक वेळा ते तसं नसतं. एकाच स्थळकाळात आपण वावरत असूनही जणू काय दोन जग परस्परांपासून कोसोगणती दूर असल्याचं प्रत्ययास येतं. तरीही शहरातील त्याच त्या चक्रात गरगरत राहावं लागलेल्या जगातून थोडा वेळ का होईना बाहेर पडून मोकळा श्‍वास घेण्यासाठी गावाचाच आधार घ्यावा लागतो. बा. सी. मर्ढेकरांनी तर कितीपूर्वी लिहिलं आहे.

किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो;
किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो.
खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच; 
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच.