केवळ एकच टाळी

sheshrao-mohite
sheshrao-mohite

परवा शिवजयंतीनिमित्त एका कृषी महाविद्यालयात व्याख्यानासाठी गेलो होतो. इतर महाविद्यालयांत जसे नेहमी साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात, तसे उपक्रम कृषी महाविद्यालयातून सहसा राबविले जात नाहीत. मी बोलण्याआधी दोन-चार विद्यार्थी बोलले. एक मुलगी बोलायला उभी राहिली, तेव्हा मुलांनी काही कॉमेंट्‌स केल्या अन्‌ वातावरण क्षणभर गंभीर झाले; पण लगेच निवळले. ते पाहून मला आमच्या कॉलेजच्या दिवसांतील एक प्रसंग आठवला. आमचं परभणीचं कृषी महाविद्यालय म्हणजे आधीच सर्वत्र डंका वाजलेला. तिथं होणारी नेहमीची आंदोलनं, अधूनमधून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत होणारी भांडणं, याचीच चर्चा पसरलेली; पण आम्हालाही वाटायचं मोठे साहित्यिक, विचारवंत, कलावंत महाविद्यालयात यावेत; पण आमचा लौकिक ऐकून कुणी यायला उत्सुक नसायचं; पण तरीही सेतू माधवराव पगडी, शिवाजीराव भोसले अशा सारख्यांची सलग तीन-तीन दिवसांची व्याख्यानं अत्यंत शांतपणे पार पडायची. सी. रामचंद्र यांच्याशी प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम तर किती तरी अप्रतिम झाला. शिवाजी सावंतांचे व्याख्यान तर सभागृहात जागा पुरेना म्हणून बाहेर मैदानावर ठेवावे लागले. 

नरहर कुरुंदकर म्हणजे तेव्हाचे आमचे दैवत. काही झाले तरी कुरुंदकर आपल्या महाविद्यालयात आले पाहिजेत म्हणून अट्टहासानं त्यांचं व्याख्यान आम्ही ऑडिटोरियममध्ये ठेवलं. जी व्यक्ती आपणास वंदनीय वाटते, ती आपल्या परिसरात आली म्हणजे आपणास किती अवर्णनीय आनंद होतो! पांढरे शुभ्र धोतर, सदरा, फिक्कट बदामी रंगाचे जाकीट अन्‌ गळ्यात खादीची शबनम. रुबाबदार पावलं टाकत कुरुंदकर सभागृहात आले, तेव्हा तुडुंब भरलेल्या सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. खूप दिवसांचे स्वप्न साकार झाल्याच्या आनंदात आम्ही त्यांचे भाषण ऐकायला आतूर होतो. तोवर बाहेरगावी कितीतरी ठिकाणी त्यांची भाषणं ऐकलेली; पण आज आमच्या स्वतःच्या कॉलेजमध्ये ऐकण्याचा योग!

कोणत्याही कालखंडात स्वच्छ दृष्टिकोन, स्वच्छ पवित्रा आणि चांगली अभिरुची असलेली बुद्धिमान माणसे थोडीच असतात. उत्कृष्ट विचार आणि दुसरीकडे कालबाह्य, अन्याय्य विचारांवर आघात करण्याचे काम ते हयातभर करीत राहतात. ही माणसं अगदी आपल्या जीवाभावाची अन्‌ नित्य परिचयाची असण्याचीही गरज नसते; पण आपल्या अवती-भवतीचा त्यांचा वावरदेखील खूप सुखावह, दिलासा देणारा असतो. आमच्यासाठी कुरुंदकर असे होते. त्यांचे व्याख्यान ऐन रंगात आले होते. आम्ही सर्वजण तल्लिन होऊन ऐकत होतो; पण कशी, कुणास ठाऊक पाठीमागे बसलेल्या एका आगाऊ मुलाने एकच टाळी वाजवली. त्याच क्षणी कुरुंदकरांनी उजव्या हाताची तर्जनी खाट्‌कन्‌ डायसवर आपटली अन्‌ ते थांबले. आपण तिथं असण्याची अतिशय लाजिरवाणी जाणीव तेव्हा झाली; पण त्या घटनेचा परिणाम म्हणून आम्ही तिथे असे वातावरण निर्माण केले, की आम्ही तिथे विद्यार्थी म्हणून असेपर्यंत तरी पुन्हा अशी घटना कधी घडली नाही. त्या मूर्ख मुलाने वाजवलेल्या टाळीने खूप काही उलथापालथ घडवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com