मायेची पाखर

शेषराव मोहिते
बुधवार, 29 मार्च 2017

काही माणसं अडाणी असतात; अशिक्षित असतात, पण ती मनानं किती मोठी आणि सुसंस्कृत असतात याचा अनुभव अनेकदा येतो. ती कितीही विपन्नावस्थेत असोत किंवा शारीरिकदृष्ट्या कमकुवत असोत; त्यांच्या मनाची श्रीमंती हेवा वाटावा अशीच असते.  आपण संकटात असू, तर अशी माणसं आपणास भक्कम मानसिक आधार देतात.

काही माणसं अडाणी असतात; अशिक्षित असतात, पण ती मनानं किती मोठी आणि सुसंस्कृत असतात याचा अनुभव अनेकदा येतो. ती कितीही विपन्नावस्थेत असोत किंवा शारीरिकदृष्ट्या कमकुवत असोत; त्यांच्या मनाची श्रीमंती हेवा वाटावा अशीच असते.  आपण संकटात असू, तर अशी माणसं आपणास भक्कम मानसिक आधार देतात.

परभणीला रेल्वेलाइनला लागून शंकरनगर ही झोपडपट्टी आहे. तेथे अनेक घरगुती मेस चालविल्या जात. हॉस्टेलची मेस बंद पडल्यानंतर बहुसंख्य मुलं या झोपडपट्टीतील घरगुती मेसमध्ये जेवायला जात. यातील लंगड्या मावशीची मेस आमची.  इथे एकमेकांच्या सोबत मांडीला मांडी लावून जेवलेला एखादा मुलगा ‘एमपीएससी’ची परीक्षा पास होऊन डेप्युटी कलेक्‍टर झाला, की त्या दिवशी मावशीच्या आनंदाला पारावार नसायचा. उन्हाळ्याचे दिवस असतील तर त्या दिवशी सर्वांसाठी आमरस असे. एरवी काहीतरी गोडधोड. घरापासून दूर राहणाऱ्या आम्हाला घराची आठवणही येऊ नये, इतका लळा या मावशीने लावलेला. एखादा महिना मेसचे पैसे भरायला उशीर झाला, तर मावशी कधी तगादा लावायची नाही. पण एम.एस्सी. (ॲग्री) झालं, तरी नोकरी करणार नाही आणि शेतकरी संघटनेचं काम करणार आहे, म्हणून मी घरच्यांना सांगितलं. तेव्हा घरचे म्हणाले, ‘‘ठीक आहे. तुला जे करायचंय ते कर. पण यापुढे आमच्याकडे पैसे मागू नको.’’ स्वतः ओढवून घेतलेले हे संकट निभावणं तर आवश्‍यक होतं. राहायला होस्टेल होतं; पण जेवणाचं काय? मी मावशीला काहीच कळू दिलं नव्हतं. एक महिना गेला. दुसरा सुरू झाला. मावशीनं एके दिवशी सहज हटकलं. ‘उद्या पैसे घेऊन या’ म्हणाली. मी मेसमध्ये जेवायला जायचंच बंद केलं. तीन-चार दिवस झाले. एके दिवशी दुपारी मावशीचा मुलगा रूमवर आला. म्हणाला, ‘‘चला, तुम्हाला मावशीनं लगेच बोलावलंय.’’ मला वाटलं पैशांसाठी असेल. मन घट्ट करून गेलो. मला बघून दारात असलेली मावशी गर्रकन वळून आत गेली. आत गेल्यावर भिंतीपलीकडून भरल्या आवाजात म्हणाली, ‘‘सायेब, तुमी वळिखलं नाही या मावशीला! लई वाईट वाटलं तुमच्या या वागण्याचं. तुमाला जवा बनतील, तवा तुमी पैसे द्या. पण पुन्ना असा येडेपणा करायचा न्हाई.’’

पुढे काही दिवसांनी मला पीएच.डी.ची फेलोशिप मिळाली, तेव्हा आधी मावशीचे सहा-सात महिन्यांचे पैसे एकदम दिले. पण त्यानंतर काही दिवसांनी मावशीची एकुलती एक मुलगी कर्करोगाने गेली अन्‌ पुढे एक-दोन वर्षांत मावशीलाही कर्करोग झाल्याचे निदान झाले. तोवर माझे लग्न झाले होते. लग्नातील सोन्याची साखळी होती गळ्यात. मावशी औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये होती. भेटायला जायचं. पण रिकामं कसं जावं म्हणून सोन्याची साखळी बॅंकेत ठेवली अन्‌ दोन हजार रुपये गुपचूप मावशीच्या हातात ठेवले. बोलण्यासारखी तिची अवस्था नव्हती. नंतर थोड्या दिवसांत मावशी गेली. एका सत्त्वशील, प्रामाणिक, स्वाभिमानी माणसाला मी त्या दिवशी मुकलो.

Web Title: sheshrao-mohite articles