आपणच मोठं झालं पाहिजे

आपणच मोठं झालं पाहिजे

आपलं बालपण वेगळ्या वातावरणात गेलेलं असतं. औपचारिक शिक्षणाचा संबंध आलेली आपली केवळ पहिली-दुसरीच पिढी असते. अवतीभवतीच्या समाजजीवनातील मोठेपणाच्या संकल्पनाही वेगळ्याच असतात. दोन वेळा खायला-प्यायला मिळालं, गावात राहायला घर अन्‌ शिवारात शेत झालं म्हणजे बस्स झालं. पण शिक्षणाचा संपर्क आला आणि मोठेपणाच्या संकल्पनाही बदलत गेल्या. केवळ खाऊन-पिऊन सुखी राहणं म्हणजेच जगणं नाही, त्यापेक्षाही आणखी किती तरी गोष्टी माणसाला मोठं करण्यासाठी आणि सुखी बनविण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत; हे उमजायला लागतं. पण ज्या काळात आपण जन्मलेले, वाढलेले असतो, तो भूतकाळ आणि तिथल्या समाजधारणा आपल्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. वयाची पन्नाशी उलटली, तरी आपणास अजून मोठं व्हायचं म्हणजे काय व्हायचं हेच समजेनासं होतं. गावाकडे जमीन-जुमला वाढविला, शहरात घर बांधलं, भूखंड घेतले म्हणजे आपण मोठे झालो काय, हा प्रश्‍न छळू लागतो. मग आपण आपला मोर्चा  मुलाबाळांकडे वळवितो.

आजवरच्या अनुभवांनी जे काही शिकवलं आहे, त्यातून आपण शहाणे झालो आहोत, असं वाटायला लागतं. हा शहाणपणा मुलाबाळांना शिकवणं हीच सर्वांत मोठी जबाबदारी आहे, अशी समजूत आपण करून घेतो. आजवर इतके टक्केटोणपे खाऊन तर आपण इतके शहाणे झालो. आपल्याकडे प्रगल्भता आली. त्यातून तर इतक्‍या जबाबदारीनं आपण आपल्या लोकांच्या भवितव्याचा विचार करतो. पण इथेच गफलत होते. मुलंही स्वतःच्या अनुभवांनीच शहाणी होत असतात, हे आपण विसरतो. आजच्या वर्तमानात त्यांना उपलब्ध झालेला भोवताल आणि त्याचे आकलन त्यांना जेवढे अवगत होते, तेवढे आपणास होण्याची शक्‍यता कमी असते.

अनेकदा मुलं आपल्या धाकात वाढलेली आहेत, याचाही वृथा अभिमान आपण बाळगतो. पण यातून मुलांच्या मनात असुरक्षिततेच्या भावनेचे बीजारोपण करीत आहोत, हेही आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा कधी कधी वाटते, आपल्यापेक्षा खेड्यातील अशिक्षित, कष्टकरी आई-वडील परवडले, किमान ते उठता-बसता मुलांना ‘तू हे कर, ते करू नको,’ असे सल्ले तरी देत नाहीत. मुलं मोठी झाली, शिकली, त्यांचे त्यांना बरे-वाईट कळतच असणार, असं समजून ते निवांत राहतात. आज अकरावी-बारावीच्या मुलांचे समुपदेशन केले जाते. खरं म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचे समुपदेशन आधी करण्याची गरज आहे. श्‍याम मनोहर यांच्या ‘कळ’ कादंबरीतील झाडबुके हे पात्र म्हणते, ‘‘चाळिशीनंतर काही करता येत नाही, हे कुणी उठवलंय कुणास ठाऊक! किती वाईट आहे हे! चाळिशीनंतर नवरा-बायको आपली मुलं मोठ्ठी करायची इच्छा धरून बसतात. मग! मुलं मोठ्ठी होण्याची इच्छा धरून राहणं चांगलं नाही वाटतं. आपणच मोठं झालं पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com