लोकप्रिय वक्ते! (पहाटपावलं)

शेषराव मोहिते
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सर्वधर्मसमभावासारखे यांना सर्व राजकीय पक्ष अन्‌ त्यांची विचारसरणी यांच्याशी काही देणं-घेणं नसतं. यांचं जे काही मानधन अन्‌ अटी यांची पूर्तता जो करेल, तिथं जाऊन ते आपली सेवा रुजू करतात. शक्‍यतो प्रचलित रूढी- परंपरा, समाजधारणा यांना कोणत्याही प्रकारे आपणाकडून ढळ पोचणार नाही, याची हे काळजी घेतात

दहा हजारांत एखादा वक्ता असतो; असं म्हटलं जातं. महाराष्ट्राला प्रबोधनाची नाही म्हटलं तरी मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात तर तेव्हाच्या निर्जीव बनलेल्या समाजजीवनात अनेक नेत्यांच्या वक्तृत्वाने प्राण फुंकला. स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जनतेच्या मनात चेतविले. पण त्या वक्तृत्वाच्या पाठीशी होता, त्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांचा असीम त्याग. त्यांनी समाजमनात जागविलेल्या उद्याच्या आकांक्षा. शतकांचा अंधकार सरून स्वातंत्र्याची पहाट दृष्टिपथात आलेली. त्यामुळे तेव्हा त्या बोलणाऱ्यांचे शब्द लोक कानात प्राण आणून ऐकत असत.
स्वातंत्र्य मिळालं. शंभर-सव्वाशे वर्षे अविश्रांत परिश्रम करून, अनेकांनी बलिदान देऊन मिळविलेल्या स्वातंत्र्याचं, सर्वांना विकासाच्या समान संधी मिळून, त्याचं रूपांतर सुराज्यात व्हावं म्हणून स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनेक लोकलढे उभे राहिले. अजूनही राहत आहेत. त्यात वक्तृत्वाची भूमिका मोठी आहे. आतापर्यंत नगण्य असलेल्या, खेड्यात शेती करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या माणसांच्या मनात तूही या देशातील सन्माननीय नागरिक आहेस, लोकशाही व्यवस्थेत तुलाही तेवढंच महत्त्व आहे; जेवढं एखाद्या सुखी, संपन्न घरातील व्यक्तीला आहे, ही भावना बिंबविणं सोपी गोष्ट नाही; नव्हती. पण महाराष्ट्रातील अनेक चळवळींतून असे नेते घडले; वक्ते घडले.

येथे परंपरेने चालत आलेला दैववाद, करोडो लोकांनी केलेला, आहे त्या परिस्थितीचा मूक स्वीकार; नंतर समाजजीवनात झपाट्याने होणारे बदल; त्या बदलांच्या प्रकाशात अधिकच उठून दिसणारी आपली अगतिकता शब्दावाटे व्यक्त होऊ लागली, तेव्हा एखाद्या अग्निज्वाळेची धग त्या शब्दांना प्राप्त झाली. या असंतोषाच्या भडक्‍यातून एखाद्या दलित कवीच्या तोंडून निघालेल्या शिवीलाही कालांतराने ओवीचे स्थान प्राप्त झाले. महत्प्रयासाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे निकोप लोकशाही राष्ट्रात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही, हे तर आपण अनुभवतच आहोत.

पण अलीकडे "लोकप्रिय वक्ता' नावाची नवीनच जमात उदयास आली आहे. हे लोक कृतिशून्य असतात, त्यामुळे त्यांचं जगाचं आकलन वरवरचं असतं. हे लोक सर्वसामान्यांना यशाचे मंत्र सांगतात. यांना अवतीभोवतीच्या समाजजीवनात प्रायः घडणाऱ्या घडामोडींशी देणे-घेणे नसते. कुठल्यातरी चार-दोन इंग्रजी "बेस्ट सेलर' पुस्तकातील सुभाषितवजा दहा-वीस अवतरणं अन्‌ ओघवती वाणी यांच्या बळावर ही माणसं शब्दांचं असं काही गारूड निर्माण करतात, की समोरची माणसं संमोहित होऊन जावीत.

सर्वधर्मसमभावासारखे यांना सर्व राजकीय पक्ष अन्‌ त्यांची विचारसरणी यांच्याशी काही देणं-घेणं नसतं. यांचं जे काही मानधन अन्‌ अटी यांची पूर्तता जो करेल, तिथं जाऊन ते आपली सेवा रुजू करतात. शक्‍यतो प्रचलित रूढी- परंपरा, समाजधारणा यांना कोणत्याही प्रकारे आपणाकडून ढळ पोचणार नाही, याची हे काळजी घेतात. बुवाबाजी केवळ धार्मिक अन्‌ आध्यात्मिक क्षेत्रातच चालते असं नाही. आजवर वक्तृत्व हे बुद्धिवंतांचं, कर्तृत्ववानांचं क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं, त्याही क्षेत्रात "बुवाबाजी'चा शिरकाव बऱ्यापैकी झाला आहे.