दगडावरचं पाणी

शेषराव मोहिते
बुधवार, 28 जून 2017

"तू नांगरफाळ्या, तुझ्या नावावर कितीक विक्रम जमा झालेत
साऱ्या पंचवार्षिकांचे अनुदान खाऊन टाकल्याचे
तुझ्या वाट्याला जिलेबी तर सोड,
पुड्याचा दोरा आणि खरकटा कागद पण आला नाही.
तुझी वेळोवेळीची व्याजमाफी अन्‌ कर्जमाफी
तुला भिकारपणाकडे घेऊन गेली.''

तुमच्याविषयी आदर असणारी एखादी व्यक्ती तुमच्या घरी आली अन्‌ म्हणाली, ""घरात तुम्ही दोघंच? मुलं कुठं गेली?'' अन्‌ तुम्ही काही बोलायच्या आत तीच व्यक्ती म्हणाली, ""अरे हो! गावाकडं असतील नाही का? म्हणजे तुम्ही शेतकरी चळवळीत, ग्रामीण साहित्यिक, तेव्हा मुलं गावाकडंच असणार ना! शेतीत.'' त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाबडे भाव पाहून काहीच बोलता येत नाही. मनातून तुम्ही तडफडता. त्याला जे वाटलं, त्याचं सुख तुम्ही त्याला भोगू देता. पण तुमच्या मनात खळबळ माजते.

मागे एक-दोनदा बॅंकेत पीकविमा घ्यायला गेलो, तेव्हा एक-दोघांनी विचारलं, ""मुलं आली नाहीत?'' त्या बॅंकेसमोरचं चित्र पाहिल्यावर तुमच्या मनात येतं, बरं झालं हे आपल्यापर्यंतच पोचलंय ते. दहा-वीस हजारांसाठी आपल्या मुलांनी बॅंकेच्या दारात ताटकळत बसणं आपणास सहन तरी झालं असतं काय?

गावाकडचं विश्‍व तुम्ही जवळून अनुभवलेलं असतं. म्हणून शेतीची आवड तुम्ही तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवलेली असते. एखाद दुसऱ्या वेळी आंधळ्या शेतीप्रेमापोटी तुम्ही स्वतःसोबत मुलांना घेऊन गेलेले असता अन्‌ धुवाधार पाऊस, कडाडणाऱ्या विजांपासून संरक्षण व्हावं म्हणून गोठ्यात बसता, पण तुमचं काही तरी शेतात विसरलेलं, पावसात भिजू नये म्हणून मुलं ते घेऊन यायला धावतात, तेव्हा तुमच्या जिवाचा थरकाप उडतो. अन्‌ तेव्हापासून तुम्ही कानाला खडा लावून ठरवता की यापुढं मुलांना शेतात घेऊन यायचं नाही.

तुम्ही लहानपणापासून शेतीतले टक्केटोपणे खाल्लेले असल्याने, त्या शेतीची आज काय अवस्था आहे, हे तुम्ही चांगले जाणता. ती वडिलोपार्जित तुमच्या पिढीपर्यंत चालत आलेली असली, तरी आपल्या मुलांनी त्यात अडकू नये म्हणून तुम्ही आटोकाट प्रयत्न केलेले असतात. ज्या क्षेत्राचे भविष्य निराशाजनक आहे, त्या क्षेत्रात जाणूनबुजून आपल्या पुढील पिढीला जाण्यासाठी, प्रोत्साहन द्यायला फार मोठे धाडस लागत नाही. दगडावर पडलेलं पाणी जसं आपोआप वाहून जातं, तसं आज ज्याला बाहेरचं जग सामावून घेऊ शकत नाही, ती मुलं शेतीत जात आहेत. पण ज्यांनी काही काळ आपलं गाव सोडून शिक्षणाच्या निमित्तानं शहराचं जीवन पाहिलं आहे, त्यांची मनःस्थिती द्विधा होऊन जाते. शेतीतलं प्रचंड स्रोतासारखं दुःख तर त्यानं जन्मल्यापासूनच अनुभवलेलं असतं. त्यातून सुटका व्हावी म्हणून तर तो शाळेत जातो; महाविद्यालयात जातो. तिथं तो यशस्वी झाला हे आपण केव्हा मानतो? तर तो शेतीतून बाहेर पडला तरच! तेव्हाच तो आपल्या कॉलेजपर्यंतच्या जीवनाबद्दल "नॉस्टेल्जिया' बाळगून लिहू शकतो, बोलू शकतो. अन्यथा आपल्यावरही कर्जमाफी अन्‌ व्याजमाफीची वाट बघत दिवस कंठायची वेळ आली नसती कशावरून? पण तुमच्यासारख्याच बुद्धिमत्तेच्या कित्येकांना अन्‌ त्यांच्या मुलांना कोणत्या परिस्थितीत जगावं लागत आहे? या स्थितीचं वर्णन करणाऱ्या एका कवितेत आजचा आघाडीचा कवी संतोष पद्माकर पवार म्हणतो,

"तू नांगरफाळ्या, तुझ्या नावावर कितीक विक्रम जमा झालेत
साऱ्या पंचवार्षिकांचे अनुदान खाऊन टाकल्याचे
तुझ्या वाट्याला जिलेबी तर सोड,
पुड्याचा दोरा आणि खरकटा कागद पण आला नाही.
तुझी वेळोवेळीची व्याजमाफी अन्‌ कर्जमाफी
तुला भिकारपणाकडे घेऊन गेली.''