शिवसेनेपुढे  नवा चक्रव्यूह! (अग्रलेख)

शिवसेनेपुढे  नवा चक्रव्यूह! (अग्रलेख)

अखेर अपेक्षेप्रमाणेच मुंबईच्या सुप्रतिष्ठित महापौरपदावरून शिवसेनेशी ‘राडा’ करण्याचे भारतीय जनता पक्षाने टाळले! महापालिकांच्या निवडणुकांत झालेल्या प्रचंड अकटोविकट आरोप-प्रत्यारोपांनंतर मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकूनही हा असा माघारीचा निर्णय घेणे, भाजपला भाग पडले असले तरी, तो घेताना देवेंद्र फडणवीस यांनी असे काही डाव टाकले आहेत की त्यामुळे हे महापौरपद मिळाल्यानंतरही अनेक पेच उभे राहिले आहेत ते शिवसेनेपुढेच! भाजपने केवळ मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेला ‘केकवॉक’ दिला, असे नाही, तर ते करताना मुंबई महापालिकेतील सत्तेत सहभागी होण्याच्या ‘अर्थपूर्ण’ राजकारणालाही तिलांजली देत आपण मुंबई महापालिकेत कोणतेही पद -अगदी विरोधी पक्षनेतेपदही- न स्वीकारण्याची भूमिका घेऊन शिवसेनेसह भल्या भल्या राजकीय पंडितांनाही कात्रजचा घाट दाखवला. भाजपच्या या चालीत भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक नवी वळणे देण्याची बीजे तर आहेतच; शिवाय त्यामुळेच प्रचारमोहिमेतील आपल्या ‘पारदर्शक’ ब्रीदाला भाजप जागला आणि त्यासाठी सत्तेच्या मोहावरही पाणी सोडले, असेच चित्र उभे राहिले आहे. खरे तर भाजपला मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक शिवसेनेच्या विरोधात लढवणे आणि जिंकणेही तितकेसे कठीण होते काय? गेल्या चार दिवसांत भाजपचे सर्व प्रयत्न त्यासाठीच सुरू होते आणि त्यासाठी आता नैतिकतेचा आव आणू पाहत असलेल्या आणि ‘चाल-चलन-चारित्र्य’ यांच्या गप्पा मारणाऱ्या या पक्षाने अगदी अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनाही स्थायी समिती सदस्यत्व बहाल करण्याचे आश्‍वासन देण्यापर्यंत मजल गाठली होती. शिवाय, निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी टाळी देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही, ‘आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत!’, असे जाहीर करून भाजपच्या आशांना खतपाणी घातले होते. तरीही भाजपने हा नवा डाव टाकत, शिवसेनेपुढे अनेक नवे प्रश्‍न आणि कटकटी उभ्या केल्या आहेत. 

शिवसेनेपुढे भाजपने उभा केलेला पहिला पेच हा मुंबईसाठी स्वतंत्र उप-लोकायुक्‍त नेमण्याचा आहे. त्याशिवाय, एकूणच कारभारावर नजर ठेवण्यासाठी तीन माजी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची एक समितीही नेमली आहे. त्यामुळे केवळ महापौरपदच नव्हे, तर मुंबई पालिकेतील सत्ता एकहाती मिळाल्यानंतरही शिवसेनेच्या पोटात गोळा आला असणार! त्यापलीकडची आणखी एक बाब म्हणजे भाजपचे ८२ नगरसेवक हे शिवसेनेच्या कारभारावर करडी नजर ठेवणार आहेत. त्यामुळेच मुंबईतील ‘माफियाराज’ मोडून काढण्याचे प्रचारात दिलेले आश्‍वासन पाळण्याबरोबर मुंबईकरांनी शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक दिलेल्या कौलाचा आपण आदर करीत आहोत, असेही दाखवून देण्याची संधी भाजपने साधली. अर्थात, हे सर्व भाजपला करणे भाग पडले त्यामागे अन्य अनेक कारणेही आहेत. शिवसेनेशी पंगा घेतला असता तर महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होण्याचा धोका होता आणि कसेबसे सरकार टिकले असते, तरी पुढची दोन-अडीच वर्षे कारभार करता येणे कठीण झाले असते. त्याच वेळी तोंडावर येऊन ठेपलेली राष्ट्रपतिपदाची निवडणूक हे त्यामागील आणखी एक कारण आहे. उत्तर प्रदेशात काय होणार, ते नक्‍की सांगता येत नसल्यामुळेच सध्या भाजपला शिवसेनेला नाराज करून चालणारे नव्हते. शिवाय, राज ठाकरे यांचा पाठिंबा घेणे, हे उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानात भाजपला परवडणारे नव्हते. त्याचबरोबर मुंबई तुम्ही घेऊन टाका, बाकी राज्य आम्ही सांभाळतो, असाही विचार गेली दोन-अडीच दशके काँग्रेसने केलेल्या राजकारणाच्या धर्तीवर भाजपने केला असणारच. या सर्व पेच-डावपेचांच्या राजकारणात खरे हसू झाले ते राज ठाकरे यांचेच! त्यांची अवस्था शिवसेना आणि भाजप यांच्या या खेळीत आता अगदीच केविलवाणी होऊन गेली आहे.

अर्थात, शिवसेनाही कच्च्या दमाची खेळाडू नाही आणि त्यांच्या नेत्यांना उपलोकायुक्‍त वगैरे नेमण्याचे स्वागत करणे भाग पडले असले तरी, आता राज्य सरकारातही असाच ‘पारदर्शक’ कारभार व्हावा म्हणून दबावाचे राजकारण शिवसेना करणारच. त्याची चुणूक गेल्या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत बघावयास मिळाली होतीच. आता शिवसेना त्यासाठी अधिक आक्रमक होऊ शकते. मात्र, भाजपने चेंडू ‘मातोश्री’च्या अंगणात नेऊन टाकला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना भाजपबरोबर जाते का, तेथे अडवणुकीची खेळी करते, हेही बघावयास लागेल. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज सुरू होत आहे. तेथे हा खेळ कसा रंगतो, त्याची प्रचीती बघावयास मिळू शकते. एकूणातच, या शह-काटशहाच्या राजकारणात भाजपने शिवसेनेवर तूर्तास तरी मात केल्याचेच चित्र उभे राहिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याही मनातले सरकार कोसळण्याचे मांडे मनातच राहिले आहेत. खरे तर आपल्या या एका निर्णयाच्या फटक्याने मुख्यमंत्र्यांनी एकाचवेळी अनेकांना घायाळ केले आहे, यात शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com