दिलखुलास हसा; हसण्यावर ‘जीएसटी’ नाही

दिलखुलास हसा; हसण्यावर ‘जीएसटी’ नाही

‘वन नेशन, वन टॅक्‍स, वन मार्केट’ची घोषणा देत ‘गुडस्‌ अँड सर्व्हिसेस ॲक्‍ट’ म्हणजे जीएसटी शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्‍याला लागू झाला. करप्रणालीतली स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी सुधारणा असं या नव्या कराचं वर्णन केलं जातंय. असं काही थोडंसं जरी वेगळं काही घडलं की आपल्या उत्सवप्रिय देशात सणावाराचं वातावरण असतं. हा प्रसंग तर प्रत्येकाचा संबंध असलेल्या कराच्या अंमलबजावणीचा. त्यात सरकारही उत्सवप्रिय. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळालाही त्याचा उत्सव साजरा करावा वाटला. स्वातंत्र्याचं स्वागत करण्यासाठी १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीसारखं वातावरण तयार केलं गेलं. स्वातंत्र्याच्या रजत महोत्सवावेळी १९७२ मध्ये अन्‌ सुवर्ण महोत्सवावेळी १९९७ मध्येही संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये असेच सारे जमले होते. काँग्रेस व अन्य काही विरोधी पक्ष वगळता ‘जीएसटी’चं स्वागत करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसह सारे असेच एकत्र आले. काँग्रेसचं म्हणणं असं, की ‘जीएसटी’ हे आपलंच बाळ आहे, पण ते जन्माला येत होतं तेव्हा नतद्रष्ट भाजपनं विरोध केला. त्यामुळं त्याचं संसदेच्या अंगणात रांगणं-बागडणं लांबलं. आपल्या विनोद तावडेंनी त्यावर मग ‘बाळाच्या नामकरणाला का आला नाहीत’, असं काँग्रेसला विचारलंय म्हणे. 

सोशल मीडियानं हा जीएसटीचा प्रारंभ आपल्या शैलीत दणक्‍यात साजरा केला. जीएसटी हा या माध्यमाच्या सगळ्या मंचावरचा गेल्या आठ-दहा दिवसांतला सर्वाधिक वापरलेला शब्द ठरला. सगळ्या ‘टॉप ट्रेंडस’मध्ये जीएसटी होता. त्यावरच्या पोस्ट, टिप्पणी, व्हिडिओ अन्‌ व्यंग्यचित्र व्हायरल झाली. हलकेफुलके विनोद झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात हा ‘गुड अँड सिंपल टॅक्‍स’ आहे, असा विस्तार सांगितला. त्याआधीच ‘ट्‌विटर’वर त्याची ‘ग्रेट स्टुपिड टॅक्‍स’ अशी खिल्ली उडवली जात होती. आणखी कुणीतरी त्याचं ‘घनो सारो टॅक्‍स’ असंही वर्णन केलं. भगवद्‌गीतेतही अठरा अध्याय अन्‌ जीएसटी कौन्सिलच्या बैठकीही अठरा, या मोदींच्या तुलनेवरही टीकाटिप्पणी झाली. ‘अरे भाई कहना क्‍या चाहते हो?’, अशी विचारणा झाली. 

राजकीय वर्तुळाबाहेच्या काही मिश्‍किली गमतीदार होत्या. ‘३० जूननंतर जन्मलेल्या बाळाचं पालनपोषण स्वस्त असेल की महाग’, अशी एकानं विचारणा केली. ‘वातानुकूलित रेस्टॉरंटला १८ अन्‌ बिगर वातानुकूलितसाठी १२ टक्‍के टॅक्‍स असेल तर घाम पुसायला ‘तंदुरीनान’ हातात घेऊन तयार राहा’, अशी सूचना कुणीतरी केली. ‘हसण्यावर जीएसटी नाही, तेव्हा दिलखुलास हसा, आनंदानं जगा’, असं ‘व्हॉटस्‌ॲप’वर सूचवलं गेलं. एका पोस्टमध्ये ‘तुमचं माझ्यावर शंभर टक्‍के प्रेम आहे ना’, या पत्नीच्या प्रश्‍नावर पती उत्तरतो, ‘७२ टक्‍केच. कारण उरलेले २८ टक्‍के जीएसटीत जाणार’. ‘जीएसटीवरचे जोक टाकू नका. कारण त्यामुळं मोबाईलची बॅटरी २८ टक्‍क्‍यांनी उतरते’, अशी आणखी एक पोस्ट होती. पण, या पलीकडे दोन ट्विट सुपर शॉट होते. पहिले ट्विट - गांगुली, सेहवाग व तेंडुलकर यांच्या फोटोसह - आमच्याकडे क्रिकेटमध्ये आधीच जीएसटी आहे. दुसरे - मुबारक हो, जीएसटी हुआ है।

बालपणीचा काळ सुखाचा...
‘इंग्रजी माध्यमाच्या नादात बालपण कोमेजू देऊ नका’, असं आवाहन करणारा एका इंग्रजी शाळेतल्या शिक्षक-विद्यार्थिनीच्या संवादाचा व्हिडिओ फेसबुकवर प्रचंड व्हायरल आहे. कदाचित ही गंमतही असू शकेल. तपस्या नावाची तीनेक वर्षांची चिमुकली व तिच्या शिक्षिकेतील संवादाचा हा व्हिडिओ कुठला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, ‘व्हाय आर यू क्राइंग’, ‘पुट युवर हॅंडस्‌ बॅक’, ‘टॉक इन इंग्लिश’, ‘वाइप यूवर टिअर्स’ वगैरे वाक्‍ये अजिबात न कळालेली ती गोड चिमुरडी रडकुंडीला येते.

मला आई पाहिजे, घरी जायचंय, भूक लागलीय, दूध प्यायजंय, असं काकुळतीला येऊन सांगत राहते. डोळे डबडबलेले व हुंदका कसाबसा आवरलेला. ‘थांब आईला मारते, बाळालाही मारते’, असं टिचर म्हणताच, ‘नको नको’ असं आर्जव करते. बाळाचं नाव त्रिशा तर डॉगचं नाव बघिरा सांगतानाच तिचा गोड, लोभस चेहरा बघतच राहावं वाटतं. हा व्हिडिओ व्हॉटस्‌ॲपवरही प्रचंड पाहिला जातोय. फेसबुकवरील केवळ ‘बिइंग मराठी’ या एका पेजवर रविवारी दुपारपर्यंत पाच दिवसांत तो एकवीस लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. जवळपास ५५ हजारांनी तो शेअर केला व त्यावर हजारो प्रतिक्रिया आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com