सेव्हिअर ऑफ  द वर्ल्ड 

सेव्हिअर ऑफ  द वर्ल्ड 

फातेमा आबेद म्हणजे यादवी  युद्धात होरपळणाऱ्या सीरियाच  नव्हे, तर जगभरातल्या निरपराध बालकांच्या वेदनेचा हुंकार बनलेल्या बाना अल आबेदची आई. स्वत:चं तसेच आठ वर्षांच्या मुलीचं ‘ट्विटर हॅंडल’ सांभाळणाऱ्या फातेमा या पेशानं शिक्षिका. गेल्या वर्षी बानाच्या ट्विटस्‌नी जग हादरलं. बाँबवर्षावात चिणून गेलेल्या सीरियन मुलांच्या वेदना जगभर पोचल्या. त्यातून समझोता व बचावकार्य मार्गी लागलं. परवा फातेमा आबेद यांनी एक ट्विट केलं - ‘द वर्ल्ड राइट नाऊ इन टू केसेस : १. ॲन ओल्ड पेंटिंग इज सोल्ड विथ ४५० मिलियन यूएसडी. २. समव्हेअर इन येमेन अ किड इज डाईंग फ्रॉम हंगर, सॅड!’ एखादं दुर्मिळ चित्र लिलावात ४५ कोटी अमेरिकी डॉलरना विकलं जाणं अन्‌ येमेनमध्ये शेकडो मुलं भूकेनं तडफडून मरणं ही सुख-दु:खाचं दर्शन घडविणाऱ्या दोन अवस्था, दोन ध्रुव जणू. 

फातेमांच्या ट्विटमुळंच ऐतिहासिक लिलाव जगापुढं आला असं अजिबात नाही. मुळात त्या लिलावात जवळपास तीन हजार कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या लिओनार्डो द विन्सीच्या पाचशे वर्षे जुन्या चित्राचा विषय अलौकिक असाच आहे. लिओनार्डो हा थोर इटालियन चित्रकार. त्याच्या मूळ चित्राचं नाव ‘साल्वेटर मुंडी’ म्हणजे इंग्रजीत ‘सेव्हिअर ऑफ द वर्ल्ड’; जगाचा रक्षणकर्ता! ते चित्र आहे, डाव्या हातात पृथ्वीचा गोल धरून आशीर्वादासाठी उजवा हात उंचावलेल्या येशू ख्रिस्ताचं. ते विकलं गेलं, ४५ कोटी ३ लाख १२ हजार ५०० डॉलरना. लिलावानं इतिहास घडवला. आतापर्यंत एखाद्या चित्रकृतीला मिळालेली ही सर्वोच्च रक्‍कम आहे. ‘ख्रिस्ती’ या अमेरिकेतल्या लिलावकर्त्या संस्थेलाही अंदाज नव्हता. म्हणूनच मूळ रक्‍कम १० कोटी डॉलर एवढीच ठेवण्यात आली होती. एखाद्या चित्राला मिळालेली यापूर्वीची सर्वाधिक रक्‍कम होती, ती पिकासोच्या ‘वूमेन ऑफ अल्जिअर्स’ला मिळालेली १७ कोटी ९३ लाख ६४ हजार ९९२ डॉलर; तर लिआनार्डोचं याआधी सर्वाधिक किमतीला विकलं गेलेलं चित्र आहे, ‘हॉर्स अँड रायडर’, अवघ्या १कोटी १५ लाख डॉलरचं. 

‘सेव्हिअर ऑफ द वर्ल्ड’ खरंच लिओनार्डोचं आहे की नाही, यावर बराच ऊहापोह होऊन गेलाय. पंधराव्या शतकातलं हे चित्र इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्सच्या संग्रही होतं. १७६३ मध्ये ते गायब झालं अन्‌ थेट १९०० मध्ये जगासमोर आलं. यादरम्यान, त्याच्या किमान वीस नकला उतरवल्या गेल्या. तरीही मूळ चित्राचं महत्त्व कमी झालं नाही. १९५८ ला एका लिलावात ते केवळ ४५ पौंडात विकलं गेलं. पन्नास वर्षांनंतर त्याचा पुन्हा एकदा लिलाव झाला. तेव्हा त्याची विक्री झाली दहा हजार डॉलरना. गूढ हास्यासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या ‘मोनालिसा’सह लिओनार्डोची जगात आता केवळ १६ चित्रं अस्तित्वात आहेत अन्‌ ‘सेव्हिअर ऑफ द वर्ल्ड’ हे त्यापैकीच हे एक असल्याचं २०११ मध्ये सिद्ध झालं. गुरुवारी, १६ नोव्हेंबरला लिलावात चार जणांनी बोली लावली. पुढं दोनच खरेदीदार टिकले व अवघ्या वीस मिनिटांत साठ वर्षांपूर्वीचं पंचेचाळीस पौंडांचं चित्र ४५ कोटी डॉलरला विकलं गेलं. 

 येमेनी बालकांचे रक्षणकर्ते कोण? 
लिओनार्डोच्या चित्राशी येमेनमधल्या भूकबळींचा विरोधाभास जोडणारं केवळ ट्‌विट करून फातेमा आबेद थांबलेल्या नाहीत. जसं ‘पोटस्‌’ म्हणजे प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेटस; तसं ‘फ्लोटस’ म्हणजे ‘फर्स्ट लेडी ऑफ द युनायटेड स्टेट्‌स’ म्हणजेच मेलानिया ट्रम्प. येमेनमधल्या बालकांचा संहार थांबवण्याचं आवाहन फातेमा व बाना या दोघींनी ‘फ्लोटस’ना केलंय. येमेन हा सीरियापाठोपाठ पश्‍चिम आशियातील नवा रक्‍तरंजित टापू बनू पाहतोय. अमेरिकेत लिओनार्डोच्या चित्राचा लिलाव झाला, त्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ संघटना, तसंच जागतिक अन्न कार्यक्रमाचे अधिकारी येमेनमध्ये परिस्थितीची पाहणी करीत होते. अन्नपाण्याविना तडफडून रोज तिथं किमान १३० बालकं मृत्युमुखी पडत असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी तिथूनच जगाला दिला. २०१७ मध्ये यादवी व रक्‍तपातामुळं व्यवस्था खिळखिळी झाल्यानं येमेनमध्ये जवळपास पन्नास हजार मुलांचे बळी गेल्याची भीती आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला तिथल्या शिया बंडखोरांनी रियाधजवळ क्षेपणास्त्राचा मारा केल्यानं चिडलेल्या सौदी अरेबियानं येमेनमधल्या बंदरांवर कब्जा केलाय. जवळपास दोन कोटी येमेनी संकटात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com