गुज ओठांनी पडद्याला सांगायचं!

scoial media
scoial media

पूर्वेकडच्या जपान व ऑस्ट्रेलियापासून पश्‍चिमेकडील एकेक देश काल क्रमाने नव्या वर्षाचे स्वागत करत गेला. आकाश व्यापणारी रंगीबेरंगी आतषबाजी, स्वागत सोहळे, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम, युवावर्गाचं नाचगाणं-जल्लोष हे दरवर्षीसारखंच होतं. सिडनी हार्बर, बुर्ज खलिफा अशा जगभरातल्या नामांकित स्थळांवर नव्या वर्षाच्या पहिल्या सेकंदाच्या स्वागतासाठी जत्रा भरली होती; पण या सप्तरंगी स्वागताला तुर्कस्तानमधील इस्तंबूलमध्ये रक्‍तरंजित गालबोट लागलं. सांताक्‍लॉजच्या वेशातल्या दहशतवाद्यांनी नाइट क्‍लबमध्ये बेछूट गोळीबार केला. त्यात जवळपास ३९ निरपराधांचे जीव गेले.

मावळत्या वर्षाचा आढावा घेताना जग ‘बिझी’ आहे, ते नव्या वर्षात नवं काय, याचा शोध घेण्यात. विशेषत: आभासी वास्तव म्हणजे ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ व संवर्धित किंवा वाढीव वास्तव म्हणजे ‘ऑगमेंटेड रिॲलिटी’ यांचा थोडा स्पर्धेच्या अंगाने जाणारा प्रवास अनुभवणाऱ्या, २०१६ मधील ‘पोकेमॉन गो’च्या आगमनाने सुखावलेल्या, सोशल मीडियाशी सख्य असलेल्या पिढीला उत्सुकता आहे - तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यंदा नवं काय असेल? 

विषय किचकट न बनवता सांगायचं, तर गर्दीतही एकटा पडलेला माणूस नव्या वर्षात आणखी आहारी म्हणता येईल इतका मोबाईलच्या जवळ जाईल. फोन हा सर्वांत जवळचा सखा अन्‌ महत्त्वाचं म्हणजे मोबाईल म्हणजे बोटांना व्यायाम, ही संकल्पनाही गळून पडलेली असेल. ‘गुज ओठांनी पडद्याला सांगायचं’, हे संवादक्रांतीतलं नवं पर्व आहे. तसेही आयफोनमधील सिरी, मायक्रोसॉफ्टच्या विंडोज १० मोबाईलमधील कोरटाना, गुगल असिस्टंट किंवा ॲमेझॉन अलेक्‍साच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारणारे, तुम्हाला पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरं, हवी ती माहिती मिळवून देणारे किंवा तोंडी सूचनेवर विरंगुळ्यासाठी गाणी वाजविणारे मदतनीस उपलब्ध आहेत. ‘चॅटबोट’मधील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आता या स्तरावर पोचलाय. ज्यांची मनं सांभाळावी लागतात, अशा हाडामांसाच्या माणसांशी बोलण्यापेक्षा, रुसवेफुगवे-हेव्यादाव्यांच्या मनस्तापापेक्षा ही यंत्रातली माणसं बरी. ती आपलंच सारं काही सांभाळतात.  

सोशल मीडियाचा पसारा, त्याची आकडेवारी मोठी रंजक आहे. अमेरिकेच्या जनगणना विभागाने काल लोकसंख्येचे नवे आकडे जाहीर केले. त्यानुसार, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी, पहिल्या क्षणाला जगाची लोकसंख्या आहे, सात अब्ज ३६ कोटी, २३ लाख, ५० हजार १०८. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची वाढ आहे, सात कोटी, ७८ लाख, ४९ हजार ३७५ म्हणजे १.०७ टक्‍के. ‘गुगल’वर रोज साडेतीन अब्जांहून अधिक ‘सर्च’ होतात. त्या खालोखाल ‘फेसबुक’ वापरणारे लोक आहेत १७१ कोटी. ‘यूट्यूब’ व ‘व्हॉट्‌सॲप’ वापरणाऱ्यांची संख्या प्रत्येकी एक अब्जापेक्षा अधिक. ‘व्हॉट्‌सॲप’ भारतात प्रचंड लोकप्रिय. सोळा कोटींहून अधिक भारतीय ते वापरतात. जगभरातले पन्नास कोटी लोक ‘इन्स्टाग्राम’ वापरतात. ‘ट्विटर’चा मासिक वापर आहे ३१ कोटी ७० लाख, तर ‘स्नॅपचॅट’च्या ‘ॲक्‍टिव्ह यूजर्स’ची संख्या १५ कोटींहून अधिक. ‘ट्विटर’ला मावळत्या वर्षात केवळ तीन टक्‍के वाढ मिळाली. हे सगळे ‘प्लॅटफॉर्म’ ग्राहक टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी रोज काही तरी नवं आणतात. काही टिकतं, काहींचा अपमृत्यू होतो. ‘मीरकॅट’ नावाच्या मोबाईलवरील ‘लाइव्ह स्ट्रिमिंग’नं फेब्रुवारी २०१५ ते ऑक्‍टोबर २०१६ असा अवघ्या एकोणीस महिन्यांचा उदयास्त अनुभवला. कारण, ‘ट्विटर’नं ‘मीरकॅट’ दूर करून ‘पेरीस्कोप’ जवळ केलं. त्यानंतर ‘फेसबुक लाइव्ह’ आलं. ते अल्पावधीत लोकप्रिय झालं.

‘यूजर्स’ फेसबुकवर खिळून राहू लागले. अमेरिकेतल्या मिनिसोटा राज्यात डायमंड रेनॉल्ड्‌स नावाची महिला चार वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन मित्रासोबत फेरफटका मारत असताना पोलिसांनी तिच्या मित्रावर गोळ्या झाडल्या. तो जिवंत प्रसंग तिनं ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे जगभर पोचवला. लोकांचा आक्रोश उभा राहिला. सोबतच ‘फेसबुक लाइव्ह’ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं. या पृष्ठभूमीवर ‘यूट्यूब’च्या प्रेमात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोणत्याही क्षणी ‘यूट्यूब लाइव्ह लाँच’ होईल. सोशल मीडियाचा हा पसारा पाहिला, की जगाची सगळी लोकसंख्या सोशल मीडियाने व्यापली असं वाटतं; पण वास्तवात तसं नाही. नव्या वर्षाचं स्वागत करताना इस्तंबूलच्या नाइट क्‍लबमध्ये मारल्या गेलेल्या अभागींचा, निर्घृणपणे त्यांचे जीव घेणाऱ्यांचाही अन्‌ रक्‍ताची थारोळी पाहून हळहळणाऱ्या माणसांचा वर्ग या आभासी जगापलीकडे आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com