बुरा न मानो, 'मोदी' है!

श्रीमंत माने
सोमवार, 13 मार्च 2017

क्‍या हाल है? ...ठीक बा!
उत्तर प्रदेशातल्या विराट विजयामुळं बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या आनंदाला अर्थातच पारावार राहिला नाही. त्या खुशीत त्यांनी लालूप्रसाद यादव यांना "क्‍या हाल है?' अशी "ट्विटर'वर विचारणा केली. लालूप्रसाद हे अखेर लालूप्रसादच. त्यांनी काही क्षणांत जे उत्तर दिलं, ते कदाचित, शनिवारचं सर्वांत व्हायरल ट्विट ठरावं.

"भूतो न भविष्यति' अशा उत्तर प्रदेशातल्या चारपंचमांश बहुमतांमुळं देशभरातले भारतीय जनता पक्षाचे समर्थक, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते प्रचंड खूश आहेत. जोडीला उत्तराखंडमधले यश आहेच. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यातला हा विजय ऐन होळीच्या आदल्या दिवशी नोंदला गेला. परिणामी, यंदाची होळी "केशरिया' बनली. मग, पंजाब, मणिपूर व गोव्यात कॉंग्रेसनं भाजपपेक्षा अधिक जागा जिंकल्याचा मुद्दा नजरेआड करून उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधल्या यशाची धुळवड साजरी करायला "सोशल मीडिया'पेक्षा अधिक चांगलं मैदान ते कोणतं! शनिवारी सकाळी निकालाचे सुरवातीचे कल यायला सुरवात होताच "सोशल मीडिया'वर जल्लोष सुरू झाला.

"फोटोशॉपी' तेजीत आली. त्यातून सायकलदुरुस्तीचे दुकान उघडलेले अखिलेश यादव व डिंपल यादव हे दांपत्य "स्मार्टफोन'च्या पडद्यावर अवतरलं. "गुजरात के गधे भारी पड गए' असं म्हणत गुजरातमधल्या गाढवांनी लाथाडलेल्या अखिलेश, राहुल गांधी व मायावतींची व्यंग्यचित्रं समोर येऊ लागली. गुरमेहेर कौर हिच्या "व्हिडिओ'तल्या दृश्‍यासारखे हातात पराभवाचे फलक घेतलेले अखिलेश-राहुल, असे प्रकार ट्विटर व फेसबुकच्या "वॉल्स'वर, "व्हॉट्‌सऍप'च्या "स्क्रीन'वर झळकू लागले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोदीसमर्थकांचा खास लोभ आहे. त्यांना ठोकायची एकही संधी ते सोडत नाहीत. पंजाबमध्ये अकाली दल, भाजप हरण्यापेक्षा व कॅप्टन अमरिंदरसिंग जिंकल्यापेक्षा केजरीवालांचा आम आदमी पक्ष हरल्याचाच आनंद भक्‍तांना झाल्याचं दिसून आलं.

"ग्राफिक इंटरचेंज फॉरमॅट' म्हणजे "जीआयएफ' हा अशा मनोरंजनातला खूप लोकप्रिय प्रकार आहे. तेही "वॉल्स'वर येऊन पडायला लागले. मैत्रिणीला सोबत घेऊन जाताना सायकलवर टांग टाकताना मागं कॅरिअरवर बसलेली मैत्रीण नाल्यात पडतानाच्या एका जुन्या "जीआयएफ'मध्ये राहुल, अखिलेशचे चेहरे टाकलेला "जीआयएफ' व्हायरल होता. त्याला जोडून "यूपी को ये साथ पसंद नहीं' अशी मल्लिनाथी होती. "पराभवानंतर दोघेही स्वत:ला कोटांमध्ये लपवून भिंतीवर टांगून घेतात' अशा आणखी एका "जीआयएफ'मधून दोघांची खिल्ली उडवली गेली.

भाजप समर्थकांनी विजय साजरा करताना होळीच्या नाचगाण्यांच्या जुन्या "व्हिडिओ'मध्ये मोदी-शहांचे मुखवटे चढवले. "त्सुनामी'ऐवजी त्सु"नमो' असे लक्ष्यवेधी शब्दप्रयोग केले गेले. "हाथी गिर गई धम से, साईकिल हो गई अगवा; चप्पा खिल गया कमल, यूपी हो गई भगवा' असा काव्यप्रतिभेला बहर आला. आपल्या कुर्त्याचा खिसा कसा फाटलेला असतो, हे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी एका जाहीर सभेत मतदारांना दाखवलं होतं. तोच फोटो पुन्हा वापरून, "राहुल गांधी लुकिंग फॉर सम मोअर सीट्‌स इन हिज पॉकेट' अशी टिप्पणी करण्यात आली.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मागच्या टप्प्यावेळी केवळ आसाममध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. केरळमध्ये टक्‍केवारी वाढली असली तरी मोठं यश नसल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थकांना जल्लोषाची मनासारखी संधी मिळाली नव्हती. याहीवेळी पंजाब, गोव्यातली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरकारं पडली. मणिपूरमध्ये भाजपनं मुसंडी मारली असली तरी गोव्याप्रमाणेच तिथंही विधानसभेचं चित्र त्रिशंकू आहे. परिणामी, उत्तर प्रदेशातल्या यशानं होळीसोबत दिवाळी साजरी करण्याची संधी पक्ष कार्यकर्ते, मोदी समर्थकांना सापडली व त्यांनी अक्षरश: तिचं सोनं केलं.

क्‍या हाल है? ...ठीक बा!
उत्तर प्रदेशातल्या विराट विजयामुळं बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या आनंदाला अर्थातच पारावार राहिला नाही. त्या खुशीत त्यांनी लालूप्रसाद यादव यांना "क्‍या हाल है?' अशी "ट्विटर'वर विचारणा केली. लालूप्रसाद हे अखेर लालूप्रसादच. त्यांनी काही क्षणांत जे उत्तर दिलं, ते कदाचित, शनिवारचं सर्वांत व्हायरल ट्विट ठरावं. लालू म्हणाले, "ठीक बा! देखा ना, बीजेपीने तुम्हे यूपी में घुसने नहीं दिया तो फायदा हुआ'. बिहारमधल्या मोदींची पुन्हा त्यावर उत्तर देण्याची हिंमत झाली नाही. पण, मोदीभक्‍तांनी लालूप्रसाद यांची पार उतरवली. असंख्य लोक त्यांच्यावर तुटून पडले. त्यांचा चारा, कमी शिकलेली मुलं वगैरे सारं काही काढलं.