ट्रोल्सच्या उपद्‌व्यापाच्या झळा पंतप्रधानांपर्यंत 

Narendra Modi
Narendra Modi

बंगळूरच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर डाव्या-उजव्यांमध्ये सुरू झालेलं सोशल मीडियावरचं युद्ध थांबण्याची चिन्हं नाहीत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परस्परांना त्या हत्येसाठी दोषी धरण्याची स्पर्धा सुरू आहे. दोन्ही बाजूंनी त्यासाठी आवश्‍यक असलेलं वातावरण तयार झालंय.

गौरी लंकेश यांचं सातत्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य नेत्यांविरूद्ध लिखाण, त्यावरून झालेले कोर्टकज्जे, धमक्‍या आदी पार्श्‍वभूमी जोडून पोलिस तपासाआधीच या खुनासाठी संघ-भाजपला दोषी ठरवण्यात आलं. त्याचप्रमाणं अलीकडं माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न त्या करीत होत्या, त्यासाठी सिद्धरामय्या सरकारला मदत करीत होत्या, या माहितीच्या आधारे, गृहमंत्र्यांच्या न केलेल्या विधानाचा आधार घेऊन दुसऱ्या बाजूनं "कशावरून माओवाद्यांनी ही हत्या केली नसावी', असं संशयाचं वातावरण तयार केलं गेलं. या दोहोंसाठी सोशल मीडियाचं हत्यार वापरलं गेलं अन्‌ या गदारोळात आठवडा उलटायला आला तरी गौरी लंकेश यांचे मारेकरी सापडलेले नाहीत, किंबहुना, त्या दिशेने पोलिसांनी ठोस अशी काही कामगिरी केलेली नाही, ही बाब पद्धतशीरपणे विस्मरणात गेली. 

शक्‍तिमान सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्यांचे, पुरोगामी विचारांचा प्रसार करणाऱ्यांचे एका पाठोपाठ एक खून होताहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्यानंतर त्या मालिकेत गौरी लंकेश यांचंही नाव जोडलं गेलं. परिणामी, हे प्रकरण चर्चेत राहणं स्वाभाविक आहे. तथापि, गेला आठवडाभर सोशल मीडियावर त्या चर्चेला मिळालेलं वळण केवळ निषेधार्हच नव्हे, तर चिंताजनकही आहे. गौरी लंकेश विरोधी विचारधारेच्या होत्या, म्हणजे त्यांची हत्या झाली ते बरंच झालं, अशी मतं जाहीरपणे "ट्विटर', "फेसबुक' किंवा "व्हॉट्‌सऍप'वर व्यक्‍त करणारे तसे पाहता आहेत मोजकेच. परंतु त्यांचा संबंध थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्‌ सत्ताधारी वर्तुळातल्या वरिष्ठ नेत्यांशी जोडला गेल्याने या डाव्या-उजव्या वादानं ओंगळवाणं स्वरूप धारण केलं आहे. त्यातही त्या हत्येबद्दल आनंद व्यक्‍त करणाऱ्या व हळहळणाऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्यांपैकी काहींना थेट पंतप्रधान "ट्विटर'वर फॉलो करतात, मोदी ज्यांना फॉलो करतात, अशा मोजक्‍या 1779 लोकांपैकी आपण एक आहोत, अशी शेखी ती मंडळी त्यांच्या हॅंडलवरच मिरवतात, हे अत्यंत धक्‍कादायक आहे. मुळात ही सगळी मंडळी भाजपनं व खुद्द मोदींनी विनाकारण प्रतिष्ठा दिलेले ट्रोल म्हणजे सोशल मीडियावरचे टवाळखोर आहेत. विरोधकांवर तुटून पडण्यासाठी वापरली जाणारी ही फौज आहे. निखिल दधिच हा असाच एक उन्मादी मोदीसमर्थक आहे. त्याने गौरी लंकेश व त्यांच्या हत्येबद्दल धक्‍का बसलेल्यांविषयी अश्‍लाघ्य भाषा वापरली.

नंतर ते "ट्विट' त्यानं डिलिट केलं. पण तोपर्यंत मोदींच्या प्रतिमेला धक्‍का लागून गेला होता. केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा सल्लागार असलेल्या आशिष मिश्रा याच्याही "ट्विट'ने असाच धक्‍का मोदींच्या प्रतिमेला बसला. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना "ती भावना निंदनीय आहे', असं "ट्विट' करावं लागलं. या दोन्ही प्रसंगांसह अन्य काही प्रकार समोर आल्यानं अखेर एखाद्याला फॉलो करणं म्हणजे त्याच्या विचाराशी सहमत असणं नव्हे, असा खुलासा भाजपला करावा लागला. 

"ब्लॉक नरेंद्र मोदी' ट्रेंड 
"ट्विटर'वर हा ट्रोल्सचा धुमाकूळ असह्य झाल्यानं पंतप्रधानांच्या विरोधकांनी, टीकाकारांनी "ब्लॉकनरेंद्रमोदी' हा ट्रेंड चालवला. त्याची दखल मुख्य प्रवाहातल्या जगभरच्या माध्यमांनी घेतली. अर्थात, या मोहिमेमुळं मोदींचे फॉलोअर्स कमी झाले असं नाही. किंबहुना, तो ट्रेंड चालवला जाऊनही प्रत्यक्षात फॉलोअर्स वाढलेच, असा दावा केला जात आहे. "ट्विटर'वरील फॉलोअर्स म्हणजे अनुसारकांची संख्या विचारात घेतली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन कोटी 40 लाखांसह जगातले तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. पोप फ्रान्सीस पहिल्या, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानावर आहेत. पोप यांचा राजकारणाशी थेट संबंध नाही. म्हणजे केवळ डोनाल्ड ट्रम्प हेच तसे पाहता मोदींच्या पुढे आहेत. "ब्लॉकनरेंद्रमोदी' ट्विटर ट्रेंड होऊनही मोदींचे फॉलोअर्स वाढताहेत, हे गृहीत धरले तर लवकरच ट्रम्प यांना ते मागे टाकतील, असे समजायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com