साप, उंदीर अन्‌ मानवी कवट्या...! (वुई द सोशल)

श्रीमंत माने shrimant.mane@esakal.com 
सोमवार, 3 एप्रिल 2017

गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर गोवंशाचे रक्षण करायलाच हवं'', असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी म्हणाले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी, "गोहत्या करणाऱ्याला फासावर लटकवू', अशी घोषणा केली.

गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर गोवंशाचे रक्षण करायलाच हवं'', असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी म्हणाले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी, "गोहत्या करणाऱ्याला फासावर लटकवू', अशी घोषणा केली. जनतेचे लाडके शिवराजमामा म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मॉं नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने पर्यावरण तसेच समाजाच्या नैतिकतेवर बोलताहेत. पशुपालन हा खरंतर शेतीला आधार देणारा व्यवसाय. गाई किंवा म्हशीबद्दल शेतकऱ्यांना जिव्हाळाही त्यामुळंच. गोहत्येचा तसा संबंध शेतीवाडीशी, शेतकऱ्याच्या बारदान्याशी. सध्या मात्र हा मुद्दा कृषीविषयक कमी व धार्मिक अधिक बनलाय. या गदारोळात सरकारदरबारी शेतीचे प्रश्‍न दुर्लक्षित असले, तरी सोशल मीडियावर "व्हायरल' आहेत. विशेषकरून तमिळी शेतकऱ्यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाचा भडका उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात विरोधकांची शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रा सुरू आहे. आजीमाजी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही कॉंग्रेसचे बडे नेते उन्हातान्हात फिरताहेत. त्यांच्या वातानुकुलित बसमधून प्रवासावर टीका सुरू आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या अशाच जुन्या संघर्षयात्रेची छायाचित्रं, "याला म्हणतात खरी संघर्षयात्रा', असे मथळे देऊन "व्हॉट्‌सऍप'वर फिरताहेत. 
तमिळनाडूतला यंदाचा दुष्काळ अलीकडच्या काळातला सर्वाधिक भीषण आहे. भारताच्या बहुतेक भागात नैर्ऋृत्य मोसमी पाऊस पडतो, तर तमिळनाडूची शेती मात्र प्रामुख्याने ऑक्‍टोबर ते डिसेंबरदरम्यान पडणाऱ्या परतीच्या ईशान्य मोसमी पावसावर अवलंबून आहे. कावेरी नदीखोऱ्यात या तीन महिन्यांची पर्जन्यसरासरी आहे, 438.2 मिलीमीटर अन्‌ यंदा पाऊस झाला केवळ 168.4 मि.मी. यापेक्षा कमी पावसाची नोंद एकशे चाळीस वर्षांपूर्वी, 1876 मध्ये 163.5 मि.मी. इतकी आहे. आपल्याकडचा खरिप हंगाम म्हणजे तिकडे "कुरूवई' तर रब्बीला म्हणतात "सांबा'! पर्जन्यसरासरीत 62 टक्‍के व काही भागात 80 टक्‍के तुटीमुळे सांबा हंगाम पार बुडाला. जवळपास 140 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तेव्हा, आत्मघाताचे प्रतीक म्हणून मानवी कवट्या घेऊन तमिळ शेतकरी दिल्लीत जंतरमंतरवर पोचले. या दुष्काळात शेतकरी वाचवण्यासाठी किमान चाळीस हजार कोटींची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांची उपासमार सरकारपुढे मांडण्यासाठी आंदोलकांनी कधी उंदीर, तर कधी सापाचे मांस खाण्याचे प्रतीकात्मक आंदोलन केले. तशी छायाचित्रे सर्वत्र फिरली. अखेर शनिवारी केंद्र सरकारने तमिळनाडूला 1712 कोटींची मदत जाहीर केली खरी. पण ती खूपच तुटपुंजी आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

औरंगजेब नावाचं आग्यामोहोळ 
कट्टर मुस्लिम सम्राट, धर्मांध अन्‌ जुलमी शासक अशी ओळख असलेला अबू अल मुझफ्फर मही-उद-दिन मुहम्मद म्हणजेच औरंगजेब ऊर्फ आलमगीर आता चर्चेत येण्याचं खरंतर तसं काही कारण नाही; पण, परवा "यो औरंगजेब सो नोबेल' नावाचा "हॅशटॅग' ट्विटरवर "टॉप ट्रेडिंग'मध्ये होता. मुघल साम्राज्याच्या अभ्यासक अन्‌ अमेरिकेतल्या नेवार्क इथल्या रूटगर्स विद्यापीठात दक्षिण आशियाई इतिहासाच्या सहायक प्रोफेसर श्रीमती ऑड्रे ट्रुश्‍के यांच्या औरंगजेबावरील पुस्तकावर अनेक जण तुटून पडले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठाशीही श्रीमती ट्रुश्‍के संबंधित आहेत. त्यांनी "औरंगजेब : द मॅन अँड द मिथस्‌' या पुस्तकाद्वारे जणू त्या आग्यामोहोळावर दगड भिरकावला. दक्षिणेत छत्रपती संभाजीराजे, पंजाबमध्ये गुरू तेगबहादूर, ज्यू धर्मगुरू सरमद कशानी व दाउदी बोहरा समाजाचे 32 वे धर्मगुरू सय्यदना कुतुबखान कुतुबुद्दीन इत्यादींना ज्याने केवळ ते गैरमुस्लिम आहेत म्हणून अमानुष छळ करून मारले; ज्याच्या पन्नास वर्षांच्या राजवटीत जवळपास 46 लाख लोक युद्धात मारले गेले, त्या औरंगजेबाचे या विदुषीने पुस्तकात उदात्तीकरण केल्याचा आरोप आहे. "औरंगजेबाने त्याच्या तिन्ही भावांचा काटा काढला, भावाचे मुंडके नजरकैदेत असलेल्या पित्याला, शहाजहानला नजराणा म्हणून पाठवले वगैरे क्रूर कृत्ये तेव्हाच्या मध्ययुगीन चौकटीत पाहायला हवीत. त्याच्या मूल्यमापनासाठी आजच्या फुटपट्ट्या लावता येणार नाहीत', हा ट्रुश्‍के यांचा युक्‍तिवाद भारतात बहुतेकांना पचलेला नाही. त्या भावना हजारो "ट्‌विट'च्या रूपाने व्यक्‍त झाल्या.