सुपर स्लोआनी (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

स्लोआनीच्या यशाची गोडी वाढण्यास तिची कौटुंबिक पार्श्‍वभूमीही लक्षात घ्यावी लागेल. आई-वडील (जॉन-सिबील) तिच्या लहानपणीच विभक्त झाले. स्लोआनीला पितृप्रेम फारसे मिळू शकले नाही. त्यातच व्यावसायिक टेनिसपटू म्हणून पदार्पण करण्याच्या सुमारास तिचे वडील मोटार अपघातात मृत्युमुखी पडले. तेव्हापासून स्लोआनीला वेगवेगळे अडथळे पार करावे लागले

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हणतात. अपयशातून योग्य बोध घेतल्यास वेगवेगळ्या अडथळ्यांवर मात करण्याची जिद्द निर्माण होते. त्यानंतर मिळणारे यश अपयशाच्या कटू आठवणी धुऊन काढते आणि विजयाची गोडी जास्त वाढविते. नुकत्याच झालेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकलेल्या रॅफेल नदाल आणि स्लोआनी स्टीफन्स यांच्याबाबतीत हेच म्हणता येईल. "क्‍ले कोर्ट स्पेशालिस्ट' अशी ओळख असलेल्या नदालने आपल्या आवडत्या फ्रेंच ओपनमध्ये विक्रमी दहावे विजेतेपद मिळविल्यानंतर "हार्ड कोर्ट हिरो' हे बिरुदही सार्थ ठरविले. स्लोआनीची कामगिरी त्याहून सनसनाटी ठरली. गेल्या दीड दशकात महिला टेनिस नव्या चॅंपियनच्या प्रतीक्षेत आहे. सेरेना विल्यम्सचा अपवाद सोडल्यास इतरांना सातत्य राखता आलेले नाही. याचे मुख्य कारण "टॉप टेन'मधील अनेक महिला स्पर्धक ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवू शकल्या नाहीत, तर काहींना जेमतेम एकदा असे यश मिळाले. या पार्श्‍वभूमीवर सेरेनाच्या अनुपस्थितीत अमेरिकन तरुणीच विजेती ठरणे, अंतिम फेरीतील दोघी अमेरिकी असणे आणि त्यात सेरेनाची मोठी बहीण व्हिनस नसणे असे सारेच अनपेक्षित ठरले.

याहून आश्‍चर्याची बाब ही की सेरेना नसली तरी महिला एकेरी अंतिम सामन्याचे आकर्षण कमी झाले नाही. टीव्हीवरील प्रक्षेपणाला गेल्या वर्षीच्या तुलनेत 36 टक्के जास्त प्रतिसाद मिळाला. हा विक्रमी प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला. याचे मुख्य कारण स्लोआनी आणि मॅडिसन किज या दोघी मैत्रिणी अंतिम फेरीत आमनेसामने आल्याने उत्कंठा वाढली. यात जागतिक क्रमवारीच्या निकषावर मॅडिसनचे पारडे जड वाटत होते, पण स्लोआनीच्या खात्यात व्हीनसवरील विजय होता. व्हीनस, मारिया शारापोवा, गतविजेती अँजेलिक केर्बर, फ्रेंच विजेती गार्बीन मुगुरुझा, अव्वल स्थानावरील कॅरोलिना प्लिस्कोवा अशा अनेक "हॉट फेव्हरीट' बाजी मारू शकल्या नाहीत.

स्लोआनीच्या यशाची गोडी वाढण्यास तिची कौटुंबिक पार्श्‍वभूमीही लक्षात घ्यावी लागेल. आई-वडील (जॉन-सिबील) तिच्या लहानपणीच विभक्त झाले. स्लोआनीला पितृप्रेम फारसे मिळू शकले नाही. त्यातच व्यावसायिक टेनिसपटू म्हणून पदार्पण करण्याच्या सुमारास तिचे वडील मोटार अपघातात मृत्युमुखी पडले. तेव्हापासून स्लोआनीला वेगवेगळे अडथळे पार करावे लागले. अगदी यंदाच्या मोसमाच्या प्रारंभी पायाच्या दुखापतीपर्यंत अडथळ्यांची मालिका खंडित झाली नव्हती. या यशानंतर आता स्लोआनीचा उल्लेख "नवी सेरेना' असा केला जात आहे. स्वतः स्लोआनीला मात्र ही केवळ सुरवात असल्याची जाणीव आहे. यामुळेच ती हे बिरुद सार्थ ठरवेल, असा विश्‍वास तिच्या चाहत्यांना वाटतो.