श्रीकांतचा 'श्रीगणेशा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

ऑलिंपिक आणि त्या खालोखाल दर्जा असलेल्या स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळण्यासाठी देशात त्याला पूरक वातावरण तयार करावे लागेल. बॅडमिंटनमधील श्रीकांतच्या देदीप्यमान यशाने पुन्हा एकदा या आव्हानाची जाणीव करून दिली आहे. 

देशाच्या क्रीडा क्षेत्राचा कानोसा घेतला, तर गेले काही दिवस तमाम क्रीडाप्रेमींचे पाकिस्तानकडून क्रिकेट सामन्यात झालेल्या पराभवाचे उसासेच प्रकर्षाने ऐकू येतील. जणू काही त्याव्यतिरिक्त काही घडतच नव्हते. वास्तविक किदांबी श्रीकांतसारखा खेळाडू एका पाठोपाठ एक सामने जिंकत बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणारी कामगिरी करीत होता आणि रविवारी तर ऑलिंपिकविजेत्याला नामोहरम करून त्याने अजिंक्‍यपदही पटकावले. पण किती प्रमाणात देशाने याचा जल्लोष साजरा केला?

आपल्या देशातील क्रिकेटवेड इतर खेळातील यशही झाकोळून टाकते ते असे. गेल्या आठवड्यातील समाजमाध्यमांतील सर्वाधिक हिट्‌स आणि कॉमेंट्‌स, मग त्या नकारात्मक असल्या, तरी क्रिकेटलाच होत्या; पण किदांबी श्रीकांतचा 'श्रीगणेशा' मात्र नव्या युगाची चाहूल देत होता. गरज आहे ती या नव्या युगाची हाक ऐकण्याची. 
आठवडाभरात सलग दुसरे सुपर सीरिज विजेतेपद श्रीकांतने रविवारी मिळवले.

बॅडमिंटन म्हटले, की अगोदर पुल्लेला गोपीचंद, त्यानंतर साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू एवढीच नावे सर्वसाधारपणे चर्चिली जात होती. पण आता साईना-सिंधूच्या साथीत पुरुषांच्याही बॅडमिंटनमध्ये आपल्याकडे चॅंपियन खेळाडू आहे. एखाद्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले म्हणून कौतुक करायचे, यापेक्षाही मोठी कामगिरी त्याने केली आहे.

ऑस्ट्रेलियातील सुपर सिरीज जिंकताना त्याने विश्‍व आणि ऑलिंपिक विजेत्याला लीलया हरवले. सीरिज म्हणजे मालिका आणि मालिका म्हणजे सातत्य. श्रीकांतचे हेच वैशिष्ट्य आहे. सलग तीन सुपर सीरिजच्या अंतिम फेरीत धडक मारणे हेच मुळात त्याच्यातील गुणवत्तेची चमक दाखविणारे आहे. पुरुषांमध्ये अशी कामगिरी आतापर्यंत चार आणि त्याही प्रामुख्याने चिनी खेळाडूंनी केली आहे. म्हणजेच बॅटमिंटनमधील 'चायना वॉल' पार करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे श्रीकांतने सिद्ध केले. 

पुल्लेला गोपीचंद यांच्या गुरुकुलमधील हा हिरा! कोणत्याही सरकारी मदतीशिवाय चालविली जाणारी ही संस्था. 'सरकारी मदतीशिवाय' हा उल्लेख करण्याचा हेतू म्हणजे तत्कालीन अखंड आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गोपीचंद यांना अकादमीसाठी जमीन दिली; पण त्यावर गुरुकुल उभारण्यासाठी गोपीला स्वतःचे घर गहाण ठेवावे लागले. याच गुरुकुलमधून साईना-सिंधू या ऑलिंपिक पदकविजेत्या घडल्या त्या केवळ गुणवत्तेमुळेच नव्हे, तर त्यातील शिस्तीच्या परिपाठामुळे. पहाटे चारपासून सुरू होणारा खेळाडूंचा दिवस व्यायाम-कसरत आणि अथक सरावानंतर संपतो, त्या वेळी पालकांनाही भेटण्याची संधी मुलांना मिळत नसते. अशा प्रकारे तावून सुलाखून तयार झालेला श्रीकांत धावण्याच्या कसरतीत टंगळमंगळ करणारा होता; पण सर्व प्रकारच्या कसरतीशिवाय पर्याय नसल्याची जाणीव झाल्यांतर आता भल्याभल्यांना गारद करताना त्याचे पदलालित्य हरणाच्या चपळाईचे होते. थोडक्‍यात काय तर गुणवत्ता, सातत्य आणि मेहनत ही चँपियन बनण्याची त्रिसूत्री आहे, हेसुद्धा श्रीकांतच्या यशातून अधोरेखित होते. रिओ ऑलिंपिक झाल्यानंतर त्याच्या गुडघ्याला स्ट्रेस फ्रॅक्‍चर झाले होते. डिसेंबरपर्यंत तो खेळत नव्हता, ही सर्व कसर भरून काढताना त्याने घेतलेली भरारी थक्क करणारी आहे. 

क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळातील यशाचे कौतुक होतच नाही, असे नाही. पण ते प्रतीकात्मक स्वरूपाचे असते. इंडोनेशिया आणि आता ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर श्रीकांत मायदेशी परतेल, तेव्हा त्याचे जंगी स्वागत करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर सेल्फीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत शर्यत लागेल. त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होईल. कोण जास्त पैसे देतो, याची स्पर्धा लागेल. हाच प्रकार ऑलिंपिक पदके जिंकल्यानंतर साक्षी मलिक आणि सिंधूच्या बाबतीत घडला होता. त्यांना सत्कार-सोहळ्यांमधून वेळ मिळत नव्हता. अनन्यसाधारण यशाचे शिखर गाठले, की हे सगळे होते; पण घडणीच्या काळात मात्र हाच खेळाडू बऱ्याच प्रमाणात एकाकी असतो. त्या वेळी त्याला जो संघर्ष करावा लागतो, त्याविषयीची त्यांची 'मन की बात' ऐकायला कोणाला वेळ नसतो.

चार वर्षांनी ऑलिंपिक आले आणि त्यात जेमतेम यश मिळाले, की मात्र भरभरून चर्चा होते. जो तो सल्ले द्यायला उत्सुक असतो. त्यामुळेच या प्रश्‍नांचा श्रीकांतच्या विजयाच्या निमित्ताने खोल विचार व्हायला हवा. वैयक्तिक गुणवत्तेच्या हिऱ्यांची खाण आपल्याकडे आहे; परंतु या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम नीट होत नाही. ऑलिंपिक आणि त्या खालोखाल दर्जा असलेल्या स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळण्यासाठी देशात त्याला पूरक असे वातावरण तयार करावे लागेल. चीन किंवा अमेरिका हे देश जे पायाभूत प्रयत्न करतात, त्यामुळेच पदकांची लयलूट करणे त्यांना शक्‍य होते. 'टार्गेट ऑलिंपिक पोडियम' (टॉप) या नावाखाली केंद्र सरकारने ऑलिंपिक खेळाडूंसाठी निधी उपलब्ध केला होता; पण असे साह्य खेळाडूंना लहान वयातच मिळाले तर खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होईल. ऑलिंपिकनंतर झालेली चर्चा लगेचच मागे पडली आणि पुन्हा क्रिकेटमय वातावरण तयार झाले होते. पण श्रीकांतने आपल्या यशाच्या रूपाने पुन्हा नवा मार्ग आणि विचार तयार केला आहे. त्याने घालून दिलेल्या या वाटेवरून अनेक खेळाडू मार्गक्रमण करतील आणि त्यांना पुढे जाण्यासाठी उपकारक ठरणारी एक नवी क्रीडासंस्कृती देशात तयार होईल, अशी आशा करायला हरकत नाही.