भारतीय युवतींची क्रिकेटदौड!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

महाराष्ट्रातातील क्रिकेटप्रेमींसाठी तर ही स्पर्धा कायमची लक्षात राहील; कारण सांगलीची स्मृती आणि मुंबईची पूनम या दोघींबरोबर मोना मेश्राम आणि राजेश्‍वरी गायकवाड अशा एकूण चार मराठी युवती या संघात आहेत!

चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय क्रिकेट संघाच्या केलेल्या दारुण पराभवाचा सल अखेर इंग्लंडमध्येच महिला विश्‍चचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाने मिळवलेल्या दणदणीत यशामुळे थोडा तरी भरून यायला हरकत नसावी!

अर्थात, या महिला विश्‍वचषक स्पर्धेचा हा अंतिम सामना नव्हता; तरीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही क्रिकेट सामना हा या दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींसाठी अंतिम सामनाच असतो! खरे तर या स्पर्धेत भारतीय युवतींनी आपल्या पराक्रमाने अवघे विश्‍व दणाणून सोडले आहे.

पहिल्या दोन सामन्यांत आपण इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांची धूळधाण उडवली होती ती तुफानी फलंदाजीच्या जोरावर. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना आधीच्या दोन्ही सामन्यांत आपल्या बॅटचे पाणी पाजणारी स्मृती मंधाना अवघ्या दोन धावांवर बाद झाली आणि क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र, त्यानंतर पूनम राऊतने खंबीरपणे खेळपट्टीवर उभे राहून 47 धावा काढल्या. तिला दीप्ती शर्माने मोलाची साथ दिली. तरीही भारताची 169 धावसंख्या पाकिस्तानच्या आवाक्‍यातीलच होती. मात्र, या सामन्यात आपल्या गोलंदाजांनी कमाल केली आणि त्यातही एकता बिश्‍तने अवघ्या 18 धावांत पाकच्या पाच युवतींना तंबूत धाडत भारताला विजयश्री मिळवून दिली. 

महाराष्ट्रातातील क्रिकेटप्रेमींसाठी तर ही स्पर्धा कायमची लक्षात राहील; कारण सांगलीची स्मृती आणि मुंबईची पूनम या दोघींबरोबर मोना मेश्राम आणि राजेश्‍वरी गायकवाड अशा एकूण चार मराठी युवती या संघात आहेत! कोणे एके काळी आपल्या पुरुष क्रिकेट संघावर मुंबई आणि महाराष्ट्राचे वर्चस्व असे. ते दिवस बघता बघता काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्रातील युवतींनी ती कसरही भरून काढली आहे. त्यातही विशेष कौतुक करायला हवे ते स्मृतीचे! इंग्लंडविरुद्ध 90 धावा ठोकणाऱ्या स्मृतीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यांत चक्‍क शतकच झळकवले. अर्थात, तिला संघातील अन्य सहकाऱ्यांचीही मोलाची साथ लाभली होतीच.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मात्र आपल्या या रणरागिणींना बॅटीचा सूर गवसला नाही तरी गोलंदाजांचेच वर्चस्व असलेल्या या सामन्यात भारतीय युवतींचीच गोलंदाजी वरचढ ठरली. भारतीय युवतींनी असाच नेत्रदीपक खेळ पुढेही सुरू ठेवला तर मिताली राजच्या नेतृत्वाखालील हा संघ विश्‍वचषकावर आपले नाव कोरेल.

संपादकिय

स्वप्नं पशू-पक्ष्यांना पडतात की नाही ठाऊक नाही; पण माणसांना पडतात. स्वप्नं पाहण्याची फार मोठी देणगी निसर्गानं माणसांना बहाल...

10.42 AM

कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरला पुन्हा अटक झाली आहे. एका खंडणीच्या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे...

10.42 AM

स्थळ : मातोश्री महालातील तळघरातील खलबतखाना, वांद्रेगड. वेळ : अर्थात खलबतीची!    प्रसंग : निर्वाणीचा. पात्रे :...

10.42 AM