विश्‍वाचे आर्त... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

विश्‍वाच्या उत्पत्तीत मानवाचा काहीही सहभाग नसला, तरी विश्‍वाचा संहार मात्र मानवाच्या 'कर्तृत्वा'मुळेच होईल, असा धोक्‍याचा इशारा ख्यातकीर्त शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी व्यक्त केला. अर्थात हा सारा प्रकार वेळीच रोखता येणे शक्‍य आहे, अशी आशाही त्यांना वाटते. 

विश्‍वाच्या उत्पत्तीचा हिशेब मांडणारे प्रकांड शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी नुकत्याच एका मुलाखतीत विश्‍वाच्या अंताचा आडाखा सांगून टाकल्याने वैज्ञानिक जगतात पुन्हा एकदा चर्चा झडू लागल्या आहेत. आक्रमकता हा मानवप्राण्याचा निव्वळ स्वभावधर्म नसून डार्विनच्या सिद्धान्तानुसार तो मानवी गुणसूत्रातच बद्ध आहे. या गुणधर्माच्या जोरावरच मानवाने- ताकदीत दुबळे असतानाही- वेगाने उत्क्रांती साधली.

तथापि, प्रगतीचा हाच वेग मानवाच्या मुळावर येण्याची शक्‍यता असून गेल्या कैक शतकात मानवाने आत्मसात केलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान भस्मासुरासारखे मानवाची राखरांगोळी करण्याचा धोका आहे, असे डॉ. हॉकिंग यांचे म्हणणे आहे. अर्थात त्यामागे सखोल चिंतन आणि संशोधन आहे, हे सांगणे न लगे!

भविष्यात एक दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेल्या यंत्रमानवांच्याच हाती मानवाचा संहार होईल, पर्यायाने त्याचे विश्‍वदेखील संपुष्टात येईल, असे डॉ. हॉकिंग यांचे मत आहे. येथे यंत्रमानव या शब्दाचा अर्थ, आपण हॉलिवूडी चित्रपटात पाहतो, तसले विविध आवाज काढणारे, यांत्रिक हालचाली करणारे यंत्रमानव अथवा रोबो असा घ्यायचा नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचे कलम आता अणुबॉंब नेऊन टाकणाऱ्या क्षेपणास्त्रावरही केले जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता एखाद्या संगणकात तर असतेच असते. संगणकच कशाला, अगदी तुमच्या-आमच्या हातातल्या मोबाइल फोनमध्येदेखील ती असू शकते. ही अगोचर बुद्धिमत्ताच पुढेमागे विश्‍वाचा घात करील, असे डॉ. हॉकिंग यांना म्हणायचे आहे. 

वयाची बरीचशी वर्षे चाकाच्या खुर्चीला खिळून असलेल्या डॉ. हॉकिंग यांनी पाऊणशे वयमान गाठल्याप्रीत्यर्थ वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात त्यांनी वरील भाकीत केले आहे. विश्‍वाच्या उत्पत्तीबाबत त्यांनी मांडलेला सिद्धान्त हा आल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या संशोधनाचे पुढचे पाऊल मानला गेला. ज्याचे विश्‍वउत्पत्तीचे चिंतन जवळपास सर्वमान्यपणे स्वीकारले गेले, त्यानेच विश्‍वअंताची कारणमीमांसा केली आहे. त्या दृष्टीने डॉ. हॉकिंग यांच्या चिंतनाला मोल आहे. सिद्धान्तवादी शास्त्रज्ञांच्या मांदियाळीत डॉ. हॉकिंग हे नाव, एव्हाना जितेजागते मिथक बनून राहिले आहे. 'ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम' या पुस्तकात डॉ. हॉकिंग यांनी जनसामान्यांना समजेल, अशा रसाळ भाषेत विश्‍वाच्या उत्पत्तीची चर्चा केली होती.

या उत्पत्तीत मानवाचा काहीही सहभाग नसला, तरी विश्‍वाचा संहार मात्र मानवाच्या कर्तृत्वामुळेच होईल की काय, असे वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे, हे हॉकिंग यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या शक्तीचे अफाट आविष्कार सभोवती दिसताहेत. तिथपर्यंत येण्यात माणसाने जी भरारी घेतली, विश्‍वाची रहस्ये उलगडण्यासाठी जी अपरंपार मेहनत घेतली, त्या कर्तबगारीचे मोल मोठेच आहे. या वाटचालीतच त्याला माणसाला कर्ता-धर्ता होण्याचा आत्मविश्‍वास मिळाला. याची रास्त नोंद घ्यायला हवी, हे जेवढे खरे; तेवढेच नव्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी नवा दृष्टिकोनही लागेल, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यात केवळ वैज्ञानिकच नाही तर मानव्यविद्याशाखांमधील विद्वत्‌जन, प्रशासक, धोरणकर्ते अशा सगळ्यांची भूमिका महत्त्वाची असेल.

महाविनाशक असे अणुयुद्धाचे संकट टाळणे, समाज आणि राष्ट्रांमधील संघर्षाची धार कमी करणे, यात त्यांच्या बुद्धीची कसोटी लागणार आहे. हॉकिंग जेव्हा सगळ्या 'जगाचे सरकार' व्हायला हवे, असे म्हणतात, तेव्हा त्यांना अभिप्रेत आहे ते असे वैश्‍विक सामंजस्य. आपापल्या कोशात जाण्याची अहमहमिका प्रगत राष्ट्रांमध्येही चाललेली दिसताना असा वैश्‍विक विचार हा दिलासा ठरतो. कितीही युटोपियन वाटली तरी ही कल्पना महत्त्वाची आहे. निदान प्रयत्नांची दिशा तरी त्यातून कळते. हवामानबदल, सृष्टीत होणारे धोकादायक जैविक बदल, शस्त्रास्त्रस्पर्धा, पराकोटीची असुरक्षिततेची भावना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिरेक या बाबींचा सारासारविचार करून धोरणात्मक निर्णय घेणारे 'विश्‍वाचे सरकार' स्थापायला हवे, असे ते म्हणतात. अनेक संकटांवर मात करत मानवाने इथवर वाटचाल केली आहे; हे संकटही तो निस्तरेल, अशी त्यांना आशा वाटते. त्यांचा हा आशावाद फोल न ठरो.

Web Title: Stephen Hawking Science technology can wipe out mankind