उत्तेजकाचे विरजण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

उत्तेजक हा क्रीडा क्षेत्रावरील कलंक आहे, यात शंकाच नाही; परंतु त्याचे निमित्त करून नरसिंग यादव याच्याविरुद्ध कट केला गेला असेल, तर ती त्याहीपेक्षा गंभीर बाब आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सर्वांगीण चौकशी झाली पाहिजे.

उत्तेजक हा क्रीडा क्षेत्रावरील कलंक आहे, यात शंकाच नाही; परंतु त्याचे निमित्त करून नरसिंग यादव याच्याविरुद्ध कट केला गेला असेल, तर ती त्याहीपेक्षा गंभीर बाब आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सर्वांगीण चौकशी झाली पाहिजे.

भारताचा नीरज चोप्रा याने 20 वर्षांखालील जागतिक मैदानी स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविल्याच्या बातमीने ऑलिंपिकच्या तयारीत असलेल्या सर्वच भारतीय खेळाडूंचा उत्साह दुणावला म्हणता येईल; परंतु या आनंदाची बेहोषी उतरत नाही, तोच कुस्तीगीर नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे वृत्त येऊन थडकले. ऑलिंपिकसाठी संघ रवाना व्हायची वेळ आलेली असताना अशी काही बातमी येणे, हे नक्कीच चांगले संकेत नाहीत. जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसारख्या कठीण स्पर्धेतून ज्याने ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली, तो मल्ल उत्तेजक चाचणीत दोषी सापडणे, हा केवळ नरसिंग यादवलाच नव्हे, तर आपल्या एकूण क्रीडा क्षेत्रालाच धक्का आहे. 

कांदिवलीत "साई‘च्या कुस्ती केंद्रात धडे गिरवायला सुरवात केल्यापासून नरसिंग आणि त्याचे प्रशिक्षक जगमल सिंग यांची नजर सरावावरून कधीच हलली नाही. केवळ सरावच नाही, तर त्याचं खाणं (डाएट) आणि पूरक आहार या सगळ्यांवर ते बारकाईने लक्ष ठेवून होते. चुकूनही आपल्या हातून काही वेडवाकडे पाऊल पडणार नाही याची दोघेही काळजी घेत होते. म्हणूनच आज 15 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 25 ते 30 वेळा उत्तेजक चाचणी देऊनही नरसिंग कधी दोषी आढळला नव्हता. जागतिक कुस्ती स्पर्धेतही तो निर्दोष होता. इतकेच नाही, तर ऑलिंपिकसाठी निश्‍चित झालेल्या प्रत्येक भारतीय खेळाडूच्या केवळ एकदाच नव्हे तर दोनदा झालेल्या चाचणीतही तो निर्दोष होता. अगदी स्पेनच्या निमंत्रित स्पर्धेपूर्वी म्हणजे 25 जूनला घेण्यात आलेल्या चाचणीतही तो निर्दोष ठरला होता. स्पेनहून परतल्यावर सुरू असलेल्या सरावसत्रानंतर 5 जुलै रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत मात्र, नरसिंग दोषी आढळला. केवळ "अ‘ नाही, तर "ब‘ नमुना चाचणीदेखील लगेच घेण्यात आली. "ब‘ नमुना चाचणी लगेच घेण्याची तत्परता "नाडा‘च्या अधिकाऱ्यांनी एरवी दाखवली होती का? मग आताच पदाधिकारी इतके तत्पर का झाले? नरसिंगच्या चाचणीत सापडलेले मिथेनडाईनोन हे उत्तेजक सहसा शरीरसौष्ठवपटू घेतात. ते उत्तेजक प्रामुख्याने खाण्यातून दिले जाते. राव केंद्रात नरसिंग आपल्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेत होता. त्याचे पूरक खाद्यदेखील तो जवळ बाळगून असायचा. तरी, त्याची नजर हटल्यावर क्षणात कुणी तरी त्याच्या पूरक खाद्यात हे उत्तेजक मिसळले असण्याची शक्‍यता त्याचे प्रशिक्षक जगमलसिंग व्यक्त करत आहेत. त्यांच्यासह प्रत्येकाने नव्याने चाचणी घेण्याची मागणी केली आहे. मात्र, ती मान्य होईलच असे नाही. वास्तविक या सगळ्याची नीट चौकशी व्हायला हवी. याचे कारण मोठ्या कष्टाने मिळविलेला ऑलिंपिक कोटा नरसिंगकडून हिरावून घेतला गेला आहे. जर तो दोषी नसेल तर त्याची ही संधी जाणे, ही त्याला विनाकारण झालेली शिक्षा ठरेल. 

नरसिंगने ऑलिंपिकला जाणे योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे त्याला आव्हान देऊन आपल्या जावयाचे घोडे पुढे रेटणाऱ्या सत्पाल यांना सपशेल माघार घ्यावी लागली होती. तेव्हापासून नरसिंग आणि सुशील हा वाद चिघळला गेला. नरसिंग 74 किलो वजनी गटातील खेळाडू. सुशील 66 किलो वजनी गटातून खेळणारा. मात्र, सुशीलचा गट रद्द केल्यावर त्याने वजनी गट बदलला. नरसिंगने जागतिक स्पर्धेतून ऑलिंपिक कोटा मिळविला. त्यामुळे त्याच्या क्षमतेचे महत्त्व कमी होत नाही. न्यायालयाने देखील हाच धागा पकडून नरसिंगची बाजू घेतली. तेव्हापासून सत्पाल आणि ओघाने सुशील नरसिंग यादवला पाण्यात पाहू लागले, हे कुणी नाकारणार नाही. कारण न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच सीबीआयने नरसिंगच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतरही "साई‘ने त्याचे सरावाचे केंद्र बदलण्यास नकार दिला. त्याला सोनीपत येथेच सराव करणे बंधनकारक केले. या सगळ्याच घटना संशयास्पद आहेत. त्यांच्या मुळाशी जाऊन सत्य हुडकून काढले पाहिजे, याचे कारण देशातील एकूण क्रीडा क्षेत्र आणि संस्कृती यांच्याशीच हा विषय भिडलेला आहे.
ऑलिंपिक तोंडावर आलेले असताना कोणताही खेळाडू उत्तेजक घेण्याचे धाडस करणार नाही. भारतीय तर नाहीच नाही. एक तर त्यांची तेवढी आर्थिक परिस्थितीदेखील नाही. सरकारकडूनही त्यांना मदत लगेच मिळत नाही. खेळाडूंना उत्तेजकाची नावेदेखील माहिती नसतील. त्यामुळे स्वतःहून भारतीय खेळाडू उत्तेजकाच्या आहारी जातील असे वाटत नाही. अनवधानाने ते यात गोवले जातात. नरसिंगही यात गोवला गेलेला असू शकतो. उत्तेजक हा क्रीडा क्षेत्राला लागलेला काळा डाग आहे, यात शंकाच नाही; परंतु प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी नरसिंगविरुद्ध कट केला गेला असेल, तर ती त्याहीपेक्षा गंभीर बाब आहे. त्यामुळेच या प्रकरणातील सत्य बाहेर येणे महत्त्वाचे आहे. सरकारनेच त्यासाठी पुढाकार घ्यावा.