सुगरणीचा सल्ला!

ब्रिटिश नंदी
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

प्रति,
सौ. थेरेसाबाई मेम्याडम,
10, डाऊनिंग स्ट्रीट,
लंडन (बु.) इंग्लंड.

विषय : ‘101 चवदार पाककृती‘ (शुगर फ्री पाकातल्या पुऱ्यांसहित) ग्रंथासंदर्भात.

प्रति,
सौ. थेरेसाबाई मेम्याडम,
10, डाऊनिंग स्ट्रीट,
लंडन (बु.) इंग्लंड.

विषय : ‘101 चवदार पाककृती‘ (शुगर फ्री पाकातल्या पुऱ्यांसहित) ग्रंथासंदर्भात.

प्रिय थेरेसावैनी,
सर्वप्रथम आपल्याला प्रमोशन मिळाल्याबद्दल आणि नव्या घरात गृहप्रवेश केल्याबद्दल अभिनंदन. नव्या घराचे भाडे आपणास तहहयात पर्वडो, ही शुभेच्छा. प्रॉपर लंडनमध्ये घर मिळाले... तुम्ही लक्‍की आहात. धायरीला राहणाऱ्याला अचानक डेक्‍कनवर घर मिळाले, तर त्याला काय वाटेल, हे मी समजू शकत्ये!! नाहीतरी लंडनमध्ये आजकाल जागेचे प्रॉब्लेम फार झाल्याचे सौ. दोंदेवैनी म्हणत होत्या. त्यांच्या चुलत भाच्याच्या आत्त्याची मुलगी तिथे पटेलांकडे दिलेली आहे. (इंटरकाष्ट केले, पैशासाठी लोक काहीही करतात. जाऊ दे!) जे काही असेल ते. आपल्याला काय त्याचे? आपल्याला चांगली हवेशीर जागा मिळाली, आणखी काय हवे? आपल्याला फोन करावा म्हणून जंग जंग पछाडले. तीन वेळा रॉंग नंबर लागला. रॉंग नंबरवर गप्पा मारताना तुमचा नवा पत्ता मिळाला. "10, डाऊनिंग‘ला फोन करा, बाई शिफ्ट होतायत,‘ असे कोणीतरी म्हणाले. तिथेही फोन केला होता, पण कुणीतरी क्‍यामेरॉन नावाचा माणूस म्हणाला, की अहो, मी अजून सामान आवरतो आहे, प्लीज, उद्या फोन करा!‘‘..शेवटी पत्रच लिहायचे ठरवले.
थेरेसावैनी, आपल्याला खास पत्र लिहिण्याचे कारण, की आपण कमालीच्या सुगरण असून, निरनिराळ्या पाककृती करून खायला घालावयाचा आपल्याला छंद आहे, असे कळाले. आपल्या घरातल्या शेल्फावर शंभरेक रेसिपीबुके असून, त्यातील काही रेसिपी आपण वेळात वेळ काढून करून बघता, असेही कळते. ती शंभर पुस्तके आपणच लिहिली आहेत, असा जगभर समज झाला आहे. कृपया एक पत्रक काढून तो दूर करावा. थेरेसावैनी जेव्हा हपिसात नसतात, तेव्हा सैपाकघरातच असतात, असेही टाइम्समध्ये छापून आले आहे, म्हणे! तुम्ची बुवा कम्मॉलच आहे!! आमच्या क्‍लबातल्या काहीजणी सैपाकघरात जायला लागू नये, म्हणून हपिसात जातात. असो.
नुकतेच मी एक पाककृतींचे पुस्तक हातावेगळे केले असून, आपल्याला कुरिअरने धाडत आहे.- 101 चवदार पाककृती!! आपल्या शेल्फावरचे एकशेएकावे पुस्तक म्हणून शोभेल!! बिनअंड्याचा कुकरमधील केकपासून भोपळ्याच्या कच्च्या भरितापर्यंत अनेक पदार्थ त्यात समाविष्ट आहेत. आपण वेळात वेळ काढून करून बघावेत, ही रिक्‍वेष्ट आहे.
तुमच्यामुळे आमच्या नेनेवैनींना उगीचच हुरूप आला आहे. आमच्या धायरीला त्यांचे "त्रिमूर्ती पोळीभाजी केंद्र‘ आहे. (आगाऊ आर्डर नोंदविल्यास डाळिंबी उसळ मिळेल!) बाई जितका वेळ सैपाकघरात, तितके पॉलिटिक्‍समध्ये करिअर उत्तम असा काहीतरी त्यांचा समज झाला असून, औंदा आमच्या वार्डात उभे राहण्याचा त्यांचा इरादा आहे. थेरेसावैनी पंतप्रधान होऊ शकतात, तर मी नगरसेविका का नाही? असे त्यांचे म्हणणे!! मेलीचे डिपॉझिट जाईल, तेव्हा समजेल. मटार उसळीत एवढा मोठा गूळ घालून ठेवते!! जाऊ दे, झाले!! 

बाकी आख्ख्या इंग्लंडाचे अभिनंदन करायला पाहिजे! सुगरण पंतप्रधान मिळाली! आमच्या पंतप्रधानांना चहा फक्‍कड येतो. एकंदरित, सध्या जगभर रेसिपीवाले आणि चहावाल्यांची चलती आहे, असे दिसते. चुलीसमोर सांडशी घेऊन उभे राहणाऱ्याचे पॉलिटिक्‍समध्ये करिअर होते. हे गुपित बाहेर फुटले तर किती बहार येईल!! जो तो पुढारी हातात कालथा घेऊन फिरू लागेल!!
जसा आमच्या पंतप्रधानांच्या हातचा मसाळानी चाय अने उकाळो जगात प्रसिद्ध आहे, तशी तुमची कुठली रेसिपी फेमस आहे? कृपया कळवावे. पुढल्या पुस्तकात समाविष्ट करीन!! पुन्हा अभिनंदन. सदैव आपली सौ. कमळाबाई.
ता. क. : छोले करताना त्यात चहाची पुडी सोडावी. रंग चांगला येतो!! 

टॅग्स