बहुसांस्कृतिक राजधानीकडे

सुशांत सांगवे
रविवार, 1 जानेवारी 2017

येत्या दहा-पंधरा वर्षांत पुण्याचे सांस्कृतिक वर्तुळ कसे राहील? तीन तासांचे नाटक-चित्रपट पाहण्यासाठी वेळ असेल? संगीताच्या मैफलींना आजच्यासारखीच गर्दी होईल? एकूणच ‘सांस्कृतिक राजधानी’ ही पुण्याची ओळख कायम राहील का? या सर्व प्रश्‍नांचा हा वेध.

येत्या दहा-पंधरा वर्षांत पुण्याचे सांस्कृतिक वर्तुळ कसे राहील? तीन तासांचे नाटक-चित्रपट पाहण्यासाठी वेळ असेल? संगीताच्या मैफलींना आजच्यासारखीच गर्दी होईल? एकूणच ‘सांस्कृतिक राजधानी’ ही पुण्याची ओळख कायम राहील का? या सर्व प्रश्‍नांचा हा वेध.

भारतात जागोजागी वेगवेगळे लोक, वेगवेगळे धर्म आहेत. तिथले वातावरण, भाषा, चालीरिती, परंपरा यात वैविध्य आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील हे लोक वेगवेगळ्या निमित्ताने पुण्यात वास्तव्य करतात. त्यामुळे ‘कॉस्मोपॉलिटन सिटी’ हा पुण्याचा चेहरा बनला. तो पुढे कायम राहणार आहे; मात्र या इथल्या प्रत्येकाची सांस्कृतिक गरज भागवताना पुण्याचे सांस्कृतिक क्षितिज त्या वेळी विस्तारत जाईल. इथले विविधांगी उत्सव-महोत्सव, संगीत-नृत्याच्या मनोवेधक मैफली, व्याख्याने, साहित्य-चित्र-शिल्पांचा अभ्यास, त्यावर अधिकारवाणीने बोलणारे अभ्यासक... या गोष्टी पुणेकरांनाच नव्हे, तर जगभरातल्या रसिकांना आकर्षून घेतच राहणार. त्या वेळी पुण्याची ओळख नुसतीच ‘सांस्कृतिक राजधानी’ राहणार नाही, तर ती ‘बहुसांस्कृतिक राजधानी’ झालेली असणार; पण ते सांस्कृतिक क्षेत्र आजच्यासारखे नसेल, हे नक्की...

नाटक होईल तासाभराचे
नाटक, शास्त्रीय संगीत, नृत्य या जिवंत कला आहेत.त्या पुढच्या दहा-पंधरा वर्षांतील सामाजिक बदलांमुळे मरतील, त्यांचे अस्तित्व कमी होईल, असे अजिबात नाही. उलट या कला बहरलेल्या आणि काळानुरूप बदललेल्या पाहायला मिळतील. मागच्या काही वर्षांत रंगभूमीची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. प्रेक्षकांनी नाटकांकडे पाठच फिरवायला सुरू केली आहे; पण सध्या रंगभूमीवर तरुणाईकडून ज्या प्रकारचे प्रयत्न होत आहेत, त्यावरून रंगभूमीला येत्या काही वर्षांत चांगले दिवस येणार, असेच दिसत आहे; पण प्रेक्षकांकडे नाटक पाहण्यासाठी तीन तासांचा वेळ राहीलच, असे नाही. त्यामुळे नाटकात पहिला बदल पुढच्या दहा वर्षांत जाणवेल, तो म्हणजे वेळेचा. नाटक तासाभराचे, फार तर फार दीड तासाचे होईल. एखाद्या इंग्रजी चित्रपटाच्या लांबीएवढे. दुसरा बदल जाणवेल तो नाटकांच्या विषयांचा. समकालीन वास्तवावर भाष्य करणे, ही परंपरा नाटकांनी कायमच जपली आहे. त्यामुळे त्या वेळचे नवे विषय नाटकात दिसतील. त्यावर कधी विनोदी अंगाने, तर कधी गांभीर्याने भाष्य झाल्याचेच पाहायला मिळेल. तांत्रिक अंगानेही नाटक बदलेल. परदेशातील रंगभूमीवर ज्या पद्धतीचे तंत्रज्ञान वापरले जाते, ते मराठी नाटकातही पुढे दिसेल. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्याही नाटके ‘श्रीमंत’ झालेली असतील. केवळ नाटकांच्या सादरीकरणातच नव्हे, तर नाट्यगृहातसुद्धा पुढे बदल होतील. नाटकांचा प्रेक्षक मर्यादित राहणार आहे; त्यामुळे नाट्यनिर्मात्यांकडून छोट्या नाट्यगृहांची मागणी असेल. तशी नाट्यगृहे पालिकेला पुढे उपलब्ध करून द्यावीत लागतील. खर तर आत्तापासूनच ‘छोटीच नाट्यगृहे बांधा’, असा आग्रह धरला जात आहे. एकाच ठिकाणी दोन छोटी नाट्यगृहे, तेथेच कॉफी शॉप, कलाविषयक ग्रंथालय, कार्यशाळा, खुला मंच अशा ॲक्‍टििव्हटीतून नाट्यगृहाला कलासंकुलाचे स्वरूप पुढे येईल. अशा कलासंकुलात केवळ मराठी नव्हे इंग्रजी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांतील नाटके पाहायला मिळतील. ती काळाची गरजच राहील; पण या बदलामुळे रंगभूमीसुद्धा बहुभाषिक होईल.

गुरुकुलांचे रूपांतर कॉलेजमध्ये
शास्त्रीय संगीतात पारंपरिक घराणी पुढे अस्तित्वात राहणार नाहीत, नवी घराणी जन्माला येतील... हा वादाचा मुद्दा आहे; पण शास्त्रीय संगीत राहणार, हे सत्य नाकारता येणार नाही. पुण्यात ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’च नव्हे, तर ‘वसंतोत्सव’, ‘गानसरस्वती’, ‘तालयात्रा’, ‘स्वरझंकार’, ‘स्वरभास्कर’ अशा वेगवेगळ्या संगीत महोत्सवांना श्रोत्यांची प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीत तरुण चेहरे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे त्यांच्यात शास्त्रीय संगीताबाबत विशेष रुची आहे, ती वाढत आहे, हे दिसते. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा श्रोता कमी झालेला दिसणार नाही. पुणे हे नेहमीच शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्याचे केंद्र राहिलेले आहे. पुण्याची ही ओळख कायम राहील; पण शास्त्रीय संगीताच्या मैफलीत पुढे बराच बदल होईल. त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला राहील. नव्या पिढीचा संगीत, नृत्य शिकण्याकडे आणि त्यातच ‘करिअर’ करण्याचा कल आणखी वाढलेला दिसेल. त्यामुळे छोट्या-छोट्या गुरुकुलांचे रूपांतर कला महाविद्यालयांत झालेले असेल. कलेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र कला विद्यापीठाची स्थापनाही राज्यात होऊ शकते. त्या वेळी भारतीय-पाश्‍चिमात्य शैलीसुद्धा अधिक जवळ आलेली, विकसित झालेली पाहायला मिळेल. संगीत बहुप्रांतीय होईल.

ग्रंथ प्रदर्शने होतील कालबाह्य
एकाच ठिकाणी नानाविध विषयांवरील हजारो पुस्तके पाहायला मिळतात, ती ग्रंथ प्रदर्शनात. त्यामुळे ग्रंथ प्रदर्शन कायमच वाचकांच्या गर्दीने फुललेले पाहायला मिळते. वाचकांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या २५-३० वर्षांत ग्रंथ प्रदर्शनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे; पण साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शने सोडली, तर इतर ठिकाणच्या सर्व प्रदर्शनांत आता वाचकांचा प्रतिसाद खूपच खालावला आहे. ‘ॲमेझॉन’, ‘स्नॅपडील’वर आत्तापासूनच वाचकांना घरपोच पुस्तके मिळू लागली आहेत. इतकेच नव्हे मोबाईलवर पुस्तक डाउनलोड करून स्वत:ची ‘मोबाईल लायब्ररी’ करण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. पुढच्या दहा वर्षांत तंत्रज्ञानात आणखी बदल होतील. त्यामुळे पुस्तक मिळवणे आणि हाताळणे ही प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. अशा काळात ग्रंथ प्रदर्शन ही कल्पना कालबाह्य होण्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षे ग्रंथ प्रदर्शन भरविणारे ‘अक्षरधारा’सुद्धा याला सहमत आहे. ग्रंथ प्रदर्शन पुढे होणार नसले तरी पुस्तकांची दुकाने कायम राहतील; पण अशा दुकानांना तंत्रस्नेही असलेल्या नव्या वाचकांचा प्रतिसाद कमीच राहील. तो वाढावा, यासाठी पुस्तकांची दुकानेही आत्ताच्यासारखी नसतील, ती बदललेलीच असतील.

वाचक होणार प्रेक्षक
पारंपरिक पठडीतील बहुतांश लेखक तंत्रस्नेही नाहीत. नव्या माध्यमांची त्यांना फारशी माहिती नाही. पण पुढे हे चित्र बदललेले असेल. नवा वाचक तंत्रस्नेही असेल, तर लेखकांना या विषयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परिघाबाहेर जावेच लागेल. केवळ लेखनातच नव्हे, तर ग्रंथ व्यवहारातही पुढे तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला दिसेल. पुस्तक प्रकाशित होण्याआधी पुस्तकाचे ‘ट्रेलर’ वाचकांपर्यंत येतील. त्यातून वाचकांचे लक्ष पुस्तकाकडे वेधून घेण्याचे प्रमाण वाढेल. वाचकही पुस्तकाला प्रतिसाद देतील; पण छापील पुस्तकापेक्षा ते ‘ई-बुक’ला महत्त्व देतील. बोलणारी पुस्तके मोठ्या प्रमाणात पुढे तयार होतील. त्यामुळे वाचक हा प्रेक्षकाच्या भूमिकेत जाईल. सध्या याचे प्रमाण फारच कमी आहे. या बदलांमुळे छापील पुस्तकांच्या पानांचा गंध ही गोष्ट दुर्मिळ होऊन जाईल. तसे सूतोवाच खूद्द भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केले आहे. त्यामुळे पुण्यातील प्रकाशकांना स्वत:च्या कामकाजात बदल करावा लागणार आहे. वर्तमानपत्रांनी ई-आवृत्यांकडे आत्तापासूनच गांभीर्याने लक्ष द्यायला सुरवात केली आहे. ट्‌विटर, फेसबुक, व्हॉट्‌सॲप या माध्यमांतून ते बातम्या वाचकांपर्यंत पोचवत आहेत आणि नवा वाचक जोडून घेत आहेत. तसे प्रकाशकांनी नवनव्या माध्यमातून लेखकांचे शब्द वाचकांपर्यंत पोचवायला हवेत आणि नवा वाचक जोडून घ्यायला हवा. पुढे हे होईलही. त्याला पर्याय नाही.

‘सिंगल स्क्रीन’ काळाच्या पडद्याआड
पुण्यात १५ एकपडदा चित्रपटगृह (सिंगल स्क्रीन) आहेत. त्यातील काही चालू स्थितीत, तर काही बंद आहेत; पण पुढच्या दहा वर्षांत सर्वच एक पडदा चित्रपटगृहे बंद झालेली पाहायला मिळतील. त्याची सुरवात आत्तापासूनच झालेली आहे. भल्या मोठ्या जागेत चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा एकच व्यवसाय पुढे परवडणारा नाही. त्यामुळे एक पडदा चित्रपटगृहांच्या जागेत बहुमजली शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मॉल उभारलेले दिसतील. तेथे एखाद्या मजल्यावर मल्टिप्लेक्स असेल. मल्टिप्लेक्स ही प्रेक्षकांची गरज राहणार आहे. सध्या पुणे आणि परिसरात २४ मल्टिप्लेक्‍स आहेत. म्हणजे चित्रपटगृहांपेक्षा मल्टिप्लेक्‍सची संख्या जास्त अशी स्थिती आहे. दरवर्षी यात दोन ते चार मल्टिप्लेक्सची भर पडत जाणार आहे; पण या पुढची मल्टिप्लेक्‍स आकारानी छोटी असतील. परदेशात वापरले जाणारे तंत्रज्ञान आपल्याकडील मल्टिप्लेक्‍समध्येही येत राहणार. मल्टिप्लेक्‍समध्ये न जाणारा मोठा वर्गही असणार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डाउनलोड करून तो मोबाईलवर किंवा घरातल्या घरात बघण्याचे प्रमाणही पुढे प्रचंड वाढलेले असेल.

Web Title: Sushant Sangwe writes about future of Pune city in Arts and Entertainment