एक टिकाऊ समीक्षा (पहाटपावलं)

आनंद अंतरकर
सोमवार, 23 जानेवारी 2017

एखाद्या कचरा डेपोच्या जवळ राहणाऱ्या नियतकालिकाच्या संपादकाकडे साहित्यही तशाच प्रकारचं येत राहणं हा दैवदुर्विलास म्हणावा, की योगायोग? की तो त्याच्या अटळ नियतीचा जन्मशाप असावा?

संपादकाकडे किती सीमेचं रटाळ नि टुकार साहित्य येत असतं याची वाचकाला कुठून कल्पना असणार? त्यासाठी, "आपण एखादा रटाळ साहित्य विशेषांक काढूया' अशी माझ्या वडिलांची एक व्रात्य इच्छा होती. स्वीकारार्ह साहित्य अत्यल्प आणि "साभार परतीय' उदंड अशी कायमच इथली अवस्था. चांगल्या साहित्याची नेहमीच मोदींच्या पाचशे रुपयांच्या नोटेसारखी चणचण. कधी कधी वाटतं, नोटाबंदीऐवजी अपात्रांसाठी लेखनबंदी आली असती, तर किती संपादक (आणि पर्यायानं वाचकही) आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाले असते.

यंदाच्या दिवाळी-अंकासाठी माझ्याकडे एक अनाहूत कविता आली. तिचा मगदूर म्या पामरानं काय वर्णावा? मी काही कोण्या वाङ्‌मयीन (!) मासिकाचा संपादक नाही, की (पुस्तक न वाचता) परीक्षण करणारा साक्षेपी समीक्षकही नाही.
कवितेचा आविष्कार असा :
तुम्ही
हृदयामधल्या शुभ्र फुलांचा भाव तुम्ही केला
निर्मल, कोमल प्राणावरी ह्या घाव तुम्ही केला

नव्हते माहीत मजला, तुम्ही वस्त्र-विरहित बसले!
राब-राबलोय मी अन्‌ अपुला गाव तुम्ही केला

मध-माशीचे धोरण माझे, फोल ठरविले तुम्ही!
विजय आपुला होईल, ऐसा डाव तुम्ही केला

तुमचे वर्तन, "तुमच्यासाठी' आदर्शांचे पाठ!
मळ-भरल्या कपट्यास कोरा, ताव तुम्ही केला

"देशासाठी झटूया' - पोचट, आवाहन ते तुमचे!
दौलतीच्याही निर्मोहाचा... आव तुम्ही केला

मी, मूल्यांच्या आचरणास्तव जीव ठेवला सोलून!
पुरणाच्या पोळीचा माझ्या, पाव तुम्ही केला

पोपट-पंची ऐकून तुमची बुडले कित्येक भोळे!
जखमांचाही पैशास्तव त्या लिलाव तुम्ही केला

मी स्वप्नांना शब्द देऊनी, बसलो आहे निष्ठत!
स्वप्नांमधल्या, सत्यांचा पाडाव तुम्ही केला

स्वतःशी मनसोक्त हा हसतोय, तेवढ्यात माझा समीक्षक मित्र घटोत्कच बिंबिसार माझ्याकडे आला. "टाकाऊ मराठी-साहित्यातील टिकाऊ वैश्‍विक मूल्ये आणि अनुलेपनाधिष्टित परिवर्तनवादी अभिव्यक्ती' या विषयात त्यानं पीएच.डी. केली आहे. त्याच्या तज्ज्ञ दृष्टीखालून जावी अशा हेतूनं ती कविता त्याच्या हाती सुपूर्त केली. दोन-तीनदा कविता वाचून झाल्यावर तो घनघोर गांभीर्यानं निरूपण करू लागला.

"काय जबरदस्त आविष्कार आहे रे हा! ही कविता दुहेरी अंगानं बोलते. आपला बाप आणि नालायक, नतद्रष्ट, राजकारणी आणि कष्टार्जित स्वातंत्र्याचा ऱ्हास चालवणारे पुढारी यांना उद्देशून हा कवी विद्रोहाची आग ओकतो आहे. स्वजनांविषयीची सात्त्विक चीड त्यातून व्यक्त होते. त्याचा निरर्गल बाप, त्याची शिंदळकी, त्याची श्रेयासक्ती आणि राजकारण्यांची निर्लज्ज वक्तव्यं, त्यांचा अमर्याद भ्रष्टाचार, दांभिक देशबुडवं आचरण; आणि गरीब बिचाऱ्या असाह्य, अगतिक, अन्यायपीडित, शोषणग्रस्त सामान्यजनांचा दुःखोद्‌गार हे सारं समर्थपणे आणि पर्दाफाश पद्धतीने या कवितेतून प्रत्ययास येतं! हा कवी खरोखर युगप्रवर्तक ठरणार बघ...!''
बिंबिसारची समीक्षा चांगलीच फॉर्मात आली होती; आणि इकडे एखाद्याच्या पुरणपोळीचा पाव होणं म्हणजे काय हे एव्हाना मला पुरतेपणी समजून चुकलं होतं.

Web Title: a sustaining analysis