फ्रीडम, फ्रेंड्‌स, फन, फॅशन

फ्रीडम, फ्रेंड्‌स, फन, फॅशन

‘कोट्यधीश’ पुण्यातली तरुणाई असेल तरी कशी? त्यांच्या ॲस्पिरेशन्स काय असतील? त्यांचं शिक्षण, त्यांच्या नोकरी-धंदा-व्यवसायाच्या कल्पना काय असतील? ही भविष्यातली महानगरीय तरुणाई आपल्या मुळांशी घट्ट जोडलेली असेल की तुटलेली? अशा अनेक प्रश्नांचा घेतलेला धांडोळा.

मुंबई, दिल्ली, कोलकाता ही नावं घेताच डोळ्यांपुढे पहिल्यांदा उभं राहतं ते त्यांच्यातलं ‘महानगर’ असण्याचं साम्यस्थळ. भारतातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी ही पहिली तीन. प्रत्येकाची लोकसंख्या १ कोटीच्या वर कधीच गेलेली! आज पुण्याचा एक कोटीचं शहर म्हणून विचार करताना म्हणूनच या तीन शहरांचा विचार आपसूक मनांत येऊन जातो. मेट्रोपॉलिटन, कॉस्मोपॉलिटन, जगङ्व्याळ असे शब्द समानार्थी व्हावेत, अशा दिशेने प्रवास होत असणाऱ्या पुण्यात ते १ कोटीचं झाल्यावर जे अनेक बदल होतील, त्यात सर्वाधिक प्रकर्षाने जाणवून जाणारा बदल असेल तो तरुणांच्या बाबतीत...

एरवी उत्फुल्ल, बिनधास्त, रिस्क-टेकिंग, खेळकर, खूपशा प्रमाणात नवनवोन्मेषी आणि कधीही स्वस्थ न बसणाऱ्या तरुणांसाठी पुणे ओळखलं जातं. ‘आमचं हे असं आहे बुवा’ आणि ‘पुणे तेथे काय उणे’ म्हणत युगानुयुगं जात्याच एक ‘अतिआरामदायी’ वृत्ती आपल्यात रुजवून असणाऱ्या पुण्याच्या सोबतीने इथे पाहायला मिळणारं हे अतिउत्साहाचं अजून एक व्यवच्छेदक लक्षण!... तशात अनेक वर्षांच्या सामाजिक-राजकीय चळवळी, कला-संस्कृतीत दिवसागणिक भर घालणाऱ्या असंख्य अस्सल कलावंतांची या शहराशी जुळलेली नाळ, शिक्षणाच्या उज्ज्वल वाटा आणि बुद्धिवाद्यांनी केलेली अनेकानेक क्षेत्रांची मशागत, याची साथ मिळाल्यामुळे तरुणांसाठी पुणे हे ‘जहाँ बसने का मन करता हो’ असं इप्सित स्थळ असल्यास त्यात नवल ते काय! कदाचित हेच कारण असेल की, आकाराने हे शहर जेव्हा आपलंच एक कोटी लोकसंख्येला भिडलेलं विश्वरूप बघत असेल, तेव्हा त्या रूपात ज्याच्यावर गर्व वाटावा, असं एक देखणं कोंदण या तरुणाईचं असेल...

दहा-पंधरा वर्षांत जर पुणे हे ‘पुणे महानगर’ म्हणून स्थित्यंतरित होणार असेल, तर कितीतरी वेगळ्या ‘चेहऱ्याचे’ तरुण या पुण्याचं प्रतिनिधित्व करत असतील. भूतकाळाच्या आधारावर आणि वर्तमानाच्या चष्म्यातून भविष्याचा वेधच घ्यायचा झाला, तर पुण्यातल्या पुण्यातच या शहराची अनेक बटूरूपं अर्थात, अनेक ‘तरुण पुणे’ (पक्षी : अनेकवचन) पाहायला मिळतील, असं म्हणायला पुरेशी जागा आहे.

मग काय असेल या विविध बटुरूपांचा पोत?... तर, आज जे कमीअधिक प्रमाणात एत्तदेशीय पुणेकरांच्या सोबतीने पुण्याबाहेरच्या स्थलांतरित तरुणांचं प्रमाण एव्हाना बरंच दिसू लागलंय, तेच अधिक जास्त; खरंतर काही पटींनी अधिक असं येत्या दशकभरात पाहायला मिळालं तर आश्‍चर्य वाटायची गरज नाही. अगदी आजच्या पुण्याची नवमध्यमवर्गीय, नवश्रीमंत आणि नवमाध्यमी म्हणून भाषा विकसित होत चालली आहे, तिच्यात; अर्थात इंग्रजीत सांगायचं झाल्यास भविष्यातल्या पुण्याची डेमोग्राफीक प्रोफाईल ही या शहराच्या आजवरच्या जातकुळीला ऑलमोस्ट फाटा देणारी आणि ‘लेस पर्सनल, मोअर युनिव्हर्सल’ अशी काहीशी असणार आहे. पुण्याची म्हणून जी काही खास अशी ‘एक्‍सक्‍लुझिव्ह’ बिरुदं असतील, तीही कदाचित या महानगरीय प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने धूसर होत जातील. आजच्या परिभाषेतलं ‘पुणं’ सोडून बाकी काहीही त्या पुण्यात उणं नसेल, असंही म्हणता येईल...

‘प्राईम प्रॉडक्‍टिव्ह इयर्स’ महत्त्वाची
आपल्या देशाचं म्हणून जे काही लोकसंख्येतलं वैविध्य आणि प्रमाणशास्त्र (डेमोग्राफी) येत्या काळात बदलत गेलेलं असेल, तेच अधिक फरकाने पुण्यात पाहायला मिळेल. अर्थातच, आधीच मोठ्या संख्येने असणाऱ्या तरुणांची वाढती संख्याही त्यामुळे पुण्यात गुणाकाराच्या पटीत पाहायला मिळाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. इंग्रजीतली ‘प्राईम प्रॉडक्‍टिव्ह इयर्स’ अर्थात, सर्वाधिक क्षमतेने आणि गुणवत्तेने काम करता येण्याची वर्षं- ही संकल्पना लक्षात घ्यायची झाल्यास, काही वर्षांपूर्वी ज्या टप्प्यातून जपान आणि चीनसारखी राष्ट्र गेली, त्याच टप्प्यावर भारत आज आहे. त्यामुळे १६ ते ३५ या वयोगटाच्या एफिशियंट तरुणाईचं देशातलं नेतृत्व पुण्याकडे आल्यास नवल नाही.

म्हणून हवं पुणे!
शिक्षण, आयटी-कल्चर, सुरक्षित आणि शांत जगण्याची हमी, महत्त्वाच्या ठिकाणांना जोडलेलं असण्याची उत्तम क्षमता, चांगलं हवामान, सर्वांना सामावून घेण्याची तयारी आणि महत्त्वाचं म्हणजे झपाट्याने आकार घेत असलेला भविष्यवेधी कॉस्मोपॉलिटन तोंडवळा, यामुळे तरुणांचं ‘मोहोळ’ पुण्याला नेहमीच लगडलेलं असेल. बहुदा या शहराचं नेतृत्व तरुण नसेलही; पण त्याचे वाहक अर्थातच तरुण असतील.

हे असेल ‘बृहन्‌पुणे’
स्वप्न घेत पुण्यात आलेल्या साहित्य-कला-विज्ञान अशा अनेक क्षेत्रांतल्या कितीतरी दिग्गजांची नावं घेताही येतील. हा वर्षानुवर्षांचा ट्रेंड भविष्यातल्या पुण्यातही तसाच चालू राहील यात शंका नाही. फक्त त्याचा परीघ मात्र कैक पटींनी विस्तारला असेल... पुण्याबाहेरचे मराठी तरुण इथे जेवढे येतील, तेवढेच पराराज्यांतील आणि आजच्या न्यूयॉर्क-लंडन-सिडनी आदी ठिकाणी पाहायला मिळतात, तसे परदेशांतील तरुणही इथलेच असल्यासारखे इथे वावरताना दिसू शकतील. या बदलांच्या प्रवाहात आपलं मूळचं मराठमोळं रूप टिकवतानाच पुणे एक वैश्विक रूपही मिरवू लागलेलं असेल. इथे स्थायिक झालेल्यांच हे ‘बृहन्‌पुणे’ असेल.

शहर, उपनगर आणि स्थलांतरित तरुणाई
कर्वेनगर, गोखलेनगर अशा भागांत मोठ्या प्रमाणावर वसलेले ईशान्य भारतीय विद्यार्थी, विविध भागांत पाहायला मिळणारे विदर्भ-मराठवड्यातले तरुण, औंध-बाणेर-हिंजवडी आणि हडपसर-खराडी या भागांत स्थायिक झालेले आयटी प्रोफेशनल्स, नोकऱ्या आणि रोजंदारीसाठी होत असणारं स्थलांतर, शिरवळ-रांजणगाव-भोसरी-पिरंगुटमधल्या लघुद्योगांसाठी येणारी तरुणाई आणि पुण्याजवळील भागांतले आणि उपनगरांत रोजगार आणि शिक्षण घेणारे तरुण; असे वेगवेगळ्या भागांत पुण्यातले तरुण पाहायला मिळतात. त्यांचं प्रमाण वाढेल हे तर खरंच. त्यामुळे बाजीराव रस्ता ते लकडी पूल हे पारंपरिक पुण्याचं केंद्र म्हणून एकीकडे राहिलं, तरी त्याचा विस्तार हा असा झालेला असेल. अशात, मूळच्या अनेकांना कदाचित बरंचसं अपरिचित वाटणारं; पण स्वतःचं नवं एक्‍स्टेंशन निर्माण केलेलं हे शहर बनलेलं असेल.

तरुणांना आकर्षण वाटावं अशी असंख्य व्यवधानं इथे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शहर तरुणांना चटकन ॲडॉप्ट करतं, जे त्याचं वैशिष्ट्यच आहे. एकाच वाक्‍यात सांगायचं तर- फ्रीडम, फ्रेंड्‌स, फन, फॅशन, फिल्म्स, फूड, फेसबुक ही ‘एफ’ची परिभाषा म्हणजे भविष्यातल्या पुण्यातल्या तरुणांची भाषा असणार आहे.
- प्रा. विश्राम ढोले, माध्यम, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक

पेन्शनर्स ते प्रोफेशनल्स पॅराडाईज, असं स्थित्यंतर पुण्याने पाहिलंय. बहुआयामी आणि बहुसांस्कृतिक तरुणाईच्या आगमनामुळे सांस्कृतिक सरमिसळ होणं हे पुण्यात अर्थातच पाहायला मिळेल. येत्या दशकभरात तंत्रकौशल्य, मल्टिटास्किंग स्किल्स आणि कामांतला स्मार्टनेस ही या शहराची वैशिष्ट्य असणार आहेत.
- दीपक शिकारपूर, संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com