याला जीवन ऐसे नाव (अग्रलेख)

Thailand cave rescue over
Thailand cave rescue over

थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांच्या सुटकेसाठी जगभरातून तज्ज्ञांची अनेक पथके पुढे आली; पण असा एकोपा आपण केवळ संकटांच्या वेळीच दाखविणार काय?  सारे काही अालबेल असतानाही अशीच मित्रत्वाची भावना दाखवली पाहिजे.

जीवन-मरणाचा संघर्ष अनुभवत, कमालीच्या अनिश्‍चिततेला तोंड देत तब्बल दोन आठवडे काळ्याकभिन्न गुहेत अडकून पडलेली मुले अखेर सुखरूप बाहेर पडली, तेव्हा केवळ थायलंडमधीलच नव्हे तर जगभरातील लाखो लोकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. सध्या रशियात सुरू असलेल्या विश्‍वचकरंडक फुटबॉल स्पर्धेत जशी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढते आहे, तशीच या वेगळ्या प्रकारच्या संघर्षाच्या बाबतीतही निर्माण झाली होती. त्यातून सुखरूप बाहेर पडलेल्या संघाचे यश एखादा विश्‍वकरंडक मिळविण्याइतकेच मोलाचे म्हणावे लागेल.

थायलंडमधील ‘वाइल्ड बोअर’ या १२-१४ वर्षांच्या चिमुकल्यांच्या संघाच्या प्रशिक्षकाने त्यांचा नित्याचा सराव आटोपल्यावर त्यांच्या ‘टीम स्पिरिट’ला प्रोत्साहन देण्यासाठी निवांत जागी बैठक घेण्याचे ठरविले आणि त्यासाठी ते एका गुहेत शिरले. एका अर्थाने आजच्या भाषेतील ही ‘चिंतन बैठक’च होती! मात्र, त्या गुहेत शिरताना आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, याची ना त्या चिमुकल्यांना कल्पना होती, ना त्यांच्या प्रशिक्षकाला पुढच्या १४ दिवसांच्या जीवघेण्या यातनाप्रवासाची जाणीव होती. ही बैठक सुरू असतानाच पावसाचा जोर वाढला आणि बघता बघता त्या गुहेत पाणी शिरले आणि त्यांचा परतीचा मार्गच बंद झाला. त्यानंतर सुरू झाला तो तब्बल ४३२ तासांचा जीवघेणा खेळ. मात्र, ‘नेव्ही सील’ आणि जागतिक कीर्तीच्या अनेक पाणबुड्यांच्या अथक परिश्रमांना यश आले आणि टप्प्याटप्प्याने हे सगळे खेळाडू त्यांच्या प्रशिक्षकासह सुखरूप बाहेर आले! रशियातील ‘फिफा’ स्पर्धेचा निकाल काहीही लागो, या चिमुकल्यांनी दाखवलेला धीर आणि बाळगलेला संयम हा भल्याभल्यांना अंगी बाळगता येणे कठीण. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने त्यांना अंतिम सामना बघण्याचे खास आमंत्रण दिले आहे. ‘याला जीवन ऐसे नाव!’ हे या मुलांनी दाखवून दिले. एकीकडे संघर्षाचे नवनवे उद्रेक जगभर अनुभवायला येत आहेत. आपापली दारे-खिडक्‍या बंद करून संकुचित अस्मिता गोंजारण्याची अहमहमिका लागलेली आहे. इतरांचा विचार करणं, दुसऱ्यासाठी मदतीचा हात देणं, व्यापक भूमिका घेणं हे सगळं दूर्मिळ होत असल्याच्या काळात घडलेली ही घटना आशेचा किरण दाखवते.

सुटकेच्या या मोहिमेत दोघा ब्रिटिश पाणबुड्यांच्या कौशल्याची कमाल प्रत्ययाला आली. त्या काजळमायी गुंफेच्या परिसरात या लहानग्यांची पादत्राणे आणि बॅकपॅक्‍स त्यांना सापडल्या आणि जणू अलिबाबाची गुहाच सापडल्याचा आनंद सर्वांना झाला. आता फक्‍त ‘तिळा दार उघड!’ एवढेच म्हणणे बाकी होते, असे सर्वांना वाटू लागले. मात्र, त्या काळाची करणी भलत्याच मार्गाने जात होती. अखेर दहा चौरस मीटरच्या तुकड्यावर अडकून पडलेल्या या मुलांशी कसाबसा संपर्क झाला. मात्र, तरीही त्यांना काळाच्या त्या अक्राळविक्राळ दाढेतून बाहेर काढण्यास पुढचा आणखी एक आठवडा जावा लागला आणि जगभरातील अनेकांचा टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. आता प्रश्‍न एवढाच आहे की हे जे काही झाले, त्यापासून आपण शिकणार काय? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या चिमुकल्यांच्या अंगावर कोसळलेल्या या संकटाचे वृत्त सर्वत्र पसरताच, जगभरातून तज्ज्ञांची अनेक पथके स्वयंस्फूर्तीने पुढे आली. तांत्रिक, आर्थिक आणि आनुषंगिक सर्व प्रकारची मदत विविध राष्ट्रांनी देऊ केली; पण असा एकोपा आपण साऱ्यांनी केवळ संकटांच्या वेळीच दाखवायचा काय? -की सारे काही आनंदाने आणि गुण्यागोविंदाने सुरू असतानादेखील सर्वांनी अशीच मित्रत्वाची भावना दाखवायची, हा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला आहे. त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

या मुलांच्या सुटकेसाठी जे काही शर्थीचे प्रयत्न गेले १४ दिवस झाले, त्या पथकात काही भारतीय आणि मुख्य म्हणजे मराठी हातही होते. महाराष्ट्रातून ‘किर्लोस्कर पंप’ थायलंडला पाठविले गेले आणि काही मराठी तरुणांनी या गुहेतील पाणी उपसून काढण्यास हातभार लावला. ही अर्थातच अभिमानाची बाब आहे. या संकटातून सुखरूप बाहेर पडलेली टीम जीवनाच्या मैदानावर इतरही अनेक पराक्रम गाजवेलच; पण खऱ्याखुऱ्या ‘टीम स्पिरिट’ची चालतीबोलती उदाहरणे बनून इतरांनाही प्रेरणा देत राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com