तीन पालकांचे आरोग्यसंपन्न बाळ !

तीन पालकांचे आरोग्यसंपन्न बाळ !

पेशीमधील अतिसूक्ष्म "पॉवर हाउस‘ असलेल्या मायटोकॉंड्रियाची जडण-घडण करणारी जनुके आईकडूनच बालकाला मिळतात. या जनुकांमध्ये दोष असेल, तर तो बालकातही उद्‌भवतो. त्यावर उपाय म्हणून मायटोकॉंड्रिया निकोप असलेल्या "डोनर‘ महिलेची मदत घेण्याच्या तंत्रावर संशोधन सुरू आहे.

ऊर्जा डोळ्यांना दिसत नाही; पण ती असते एवढे मात्र खरे. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. जीवन मजेत जगायचे असेल, तर आपल्या शरीरात भरपूर ऊर्जा असली पाहिजे. शरीरात ऊर्जेचे उगमस्थान आहे तरी कोठे? ते आहे आपल्या विविध पेशींमध्ये. पेशीच्या आत केंद्रक, सायटोप्लाझम आणि मायटोकॉंड्रिया हे महत्त्वाचे घटक आहेत. केंद्रकामध्ये गुणसूत्रे असतात आणि मायटोकॉंड्रिया म्हणजे पेशीमधील अतिसूक्ष्म "पॉवर हाउस‘ (बॅटरी) आहे. पेशींमधील हजारो मायटोकॉंड्रियामध्ये ग्लुकोजपासून एटीपी नामक ऊर्जाधारित रसायनांची निर्मिती होते. एटीपीमधील रासायनिक बंधनात म्हणजे केमिकल बॉंडमध्ये आपण वापरतो ती ऊर्जा सामावलेली असते. एटीपीमधील रासायनिक बंधन सुटताना ऊर्जा मुक्त होते. ती ऊर्जा आपल्या पेशी कार्य करताना वापरतात आणि जगतात. पैसे खर्च करून आपण वस्तू किंवा सेवा पदरी पाडून घेतो. एटीपी म्हणजे शरीरातील "चलन‘ आहे. इतर अनेक कामे मायटोकॉंड्रियामार्फत होतात. त्याच्याकडे कॅल्शियम राखून ठेवण्याचे कार्य आहे. धोक्‍याच्या वेळी ते "सिग्नल‘ (इशारा) द्यायला अत्यावश्‍यक असते. आश्‍चर्य म्हणजे मायटोकॉंड्रियाची जडण-घडण करणारी जनुके केवळ आईकडूनच बालकाला मिळतात. या जनुकांमध्ये किरकोळ दोष असेल, तर अर्थातच तो दोष बालकातही उद्‌भवणार. याचा अर्थ त्या बालकामधील मायटोकॉंड्रिया सदोष असणार. ऊर्जानिर्मितीचे केंद्रच सदोष असल्यावर त्या बालकाचे हृदय, मेंदू, यकृत आणि मूत्रपिंड पूर्ण क्षमतेने कार्य करत नाही. कारण ही इंद्रिये सर्वांत जास्त ऊर्जा वापरतात. परिणामी असे नवजात बालक अल्पायुषी असते.
ब्रिटनमधील न्यू कॅसल युनिव्हर्सिटीमध्ये डॉ. डग टर्नबुल यांना या व्याधीवर संशोधन करताना एक महत्त्वाचे रहस्य गवसले. आई-वडिलांकडून आलेली सुमारे 2300 जनुके जरी "नॉर्मल‘ असली तरी फक्त आईकडूनच बालकाकडे सुपूर्त केल्या जाणाऱ्या 37 जनुकांपैकी काही सदोष आहेत. या दोषाला "लेहाय डिसिज‘ म्हणतात. एकूण 37 जनुकांपैकी केवळ 13 जनुके मायटोकॉंड्रियाची "बांधणी‘ करतात. याचा अर्थ संभाव्य जन्माला येणाऱ्या बालकाला फक्त सक्षम मायटोकॉंड्रियाची गरज होती. एवढी साधी; पण तरीही "जीवन‘दायी गरज भागली, तर संततीसाठी व्याकूळ असणाऱ्या दांपत्याला आरोग्यसंपन्न बाळ मिळू शकेल.
संभाव्य आई-वडिलांच्या ठणठणीत गुणसूत्रांना सक्षम मिटोकॉंड्रिया असणाऱ्या पेशी मिळवून द्यायच्या, हे संशोधकांचे उद्दिष्ट होते. याकरिता त्यांनी काही खास पद्धतींचा विचार केला. त्याला नाव दिले "मायटोकॉंड्रियल रिप्लेसमेंट‘. त्यापैकी एक पद्धत म्हणजे "प्रोन्यूक्‍लिअर ट्रान्फर‘. यात फलित गर्भाची दुरुस्ती केली जाते. ती साध्य होण्यासाठी जिचा मायटोकॉंड्रिया सुदृढ-निकोप आहे, अशा "डोनर‘(दात्या) महिलेची मदत घेण्यात येते. एकूण पद्धत पुढीलप्रमाणे आहे. 1) ज्यांना बाळ हवे आहे अशा आईचे स्त्रीबीज आणि वडिलांचे पुंबीज यांचे मिलन प्रयोगशाळेतील परीक्षानळीत केले जाते. स्त्रीबीज फलित झाल्यावर त्यातील मायटोकॉंड्रियल जनुके कमकुवत आहेत म्हणून फलित झालेले (संयुक्त) बीज वेगळे केले जाईल. याला "प्रोन्यूक्‍लिआय‘ म्हणतात. 2) डोनर महिलेच्या स्त्रीबीजातील केंद्रक (गुणसूत्रे) काढले जाईल आणि 3) संभाव्य आईचा "प्रोन्यूक्‍लिआय‘ डोनर (दात्या) महिलेच्या स्त्रीबीजामध्ये स्थापित केला जाईल. तिथे सुदृढ मायटोकॉंड्रिया लाभलेला "जीव‘ वाढू लागेल. या सर्व प्रक्रियेमध्ये मायटोकॉंड्रियाशी संबंधित काही जनुके डोनर महिलेकडून संभाव्य आईकडे जाऊ शकतात. मात्र त्याचा काहीही दृश्‍य परिणाम नवबालकावर होत नसतो. कारण पेशीतील मायटोकॉंड्रियाच्या संबंधीचा डीएनए फक्त एक टक्का असतो. म्हणजेच 99 टक्के डीएनए आई-वडिलांकडून आलेला असतो. प्रत्यक्षात मायटोकॉंड्रियाशी संबंधित असलेल्या डीएनएचा बालकाच्या वर्ण, रूप, उंची, डोळ्यांचा रंग, स्वभाव, कला-क्रीडा गुण किंवा अन्य व्यक्तिमत्त्वाच्या गुणविशेषाशी काहीही संबंध नसतो! ज्या महिलेने फक्त मायटोकॉंड्रियाचे दान केले आहे, ते जणू एकप्रकारे रक्तदान केल्यासारखेच आहे. ती गर्भाशयात गर्भ वाढवत नसल्यामुळे "सरोगेटेड‘ मातादेखील नाही. अडचणीत सापडलेल्या नवजात बालकाला जीवदान देण्याइतपतच या प्रयोगांच्या मर्यादा आहेत, तरीही या तंत्राला विरोध होतोय.
विरोधकांच्या मते "गर्भा‘शी घालमेल करण्याचा किंवा "खेळ‘ करण्याचा हा प्रकार आहे. अजून बरेच प्रयोग करणे आवश्‍यक आहेत, असे धर्मरक्षकांना वाटतेय. (मात्र तत्त्वत: विरोध नाही). बालक मोठे झाल्यावर "आपण तीन पालकांमुळे तयार झालेलो आहोत‘ हे समजल्यावर त्याची मानसिक अवस्था काय होईल या बाबतही मानसशास्त्रज्ञ साशंक आहेत. ही भीती निराधार आहे. कारण प्रत्येक व्यक्तीने आईच्या आणि वडिलांच्या खापर पणजोबांचेदेखील डीएनए घेतलेले असतात. "डिझाइनर्स बेबी‘साठीचा मार्ग हळूहळू खुला करण्याचा हा एक भाग आहे, अशी पुराणमतवादी लोकांची ठाम समजूत झाली आहे. या तंत्रात जन्माला येणारे बालक दोन आईंपासून आणि एका वडिलांकडून आवश्‍यक ती जनुके स्वीकारेल आणि जन्माला येईल. "तीन पालकां‘मुळे जन्माला आलेली निदान 40 मुले-मुली असून, ती मजेत आहेत! यामुळे प्रतिवर्षी किमान 150 नि:संतान राहू शकणाऱ्या पालकांना दिलासा मिळू शकतो. हे लक्षात घेऊन ब्रिटनमधील "हाउस ऑफ कॉमन्स‘ने तीन पालक असलेल्या बालकाला कायद्याचे छत्र प्राप्त करून देण्यासाठी शास्त्रज्ञांच्या प्रयोगांना 382 विरुद्ध 182 मतांनी मान्यता दिलेली आहे. अशी मान्यता देणारे अजून 20 देश आहेत. आई आणि वडील या दोन्ही शब्दांना अनेकवचन नाही. भावीकाळात तीन आई-वडिलांची नाही; पण तीन पालकांची मुले-बाळे असू शकतील! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com