पर्यटनावर विरजण (मर्म)

पर्यटनावर विरजण (मर्म)

पर्जन्यधारांनी धरती सुखावली की, तरारून येणारी रोपे हिरव्या सृष्टिगानात सहभागी होण्यासाठी रसिकजनांना साद घालतात. चराचराला परस्परांशी जोडणारे हे निसर्गायन अरसिकालाही घराबाहेर काढते. हिरव्या हाकेकडे पाठ फिरवणे या काळात शक्‍यच नसते. जागतिकीकरणाने हाती खेळू लागलेल्या पैशामुळे, दळणवळणाची साधने वाढल्याने अशा पावसाळी पर्यटनाला चांगलीच तेजी आली आहे. सह्याद्रीच्या विशाल पार्श्‍वभूमीवर, सुंदर सागरकिनारा लाभलेल्या महाराष्ट्रात भ्रमंतीला निघणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शनिवार-रविवारी सलग सुट्या आल्या की, पाठीवर सॅक टाकून भटकायला निघणाऱ्यांची संख्या राज्यात बरीच आहे. पण उत्साहाला खीळ बसली आहे ती सध्याच्या अपघातप्रवण स्थितीमुळे. प्रशासनाने डोळेझाक केले झाल्यामुळे महाडनजीकचा सावित्रीवरचा पूल कोसळला आणि पर्यटनासाठी निघणाऱ्या हौशी मंडळींच्या उत्साहाला लगाम लागला. अस्मानी आपत्तीला सरकारी यंत्रणांच्या गलथान कारभारामुळे सुल्तानी गालबोट लावले आहे. चैन करायला बाहेर पडणाऱ्या मंडळींनी हॉटेलांचे आरक्षण रद्द केले आहे, घरी बसण्याचा मार्ग पसंत केला आहे. 

दोन तीन वर्षांच्या मध्यंतरानंतर पावसाने महाराष्ट्राला चिंब भिजवला असताना सुट्याही लागून आल्या होत्या. त्यामुळे सुबत्तेचे प्रतीक झालेल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक टापूतल्या प्रत्येक पर्यटनगृहाचे आरक्षण कित्येक महिन्यांपूर्वी झाले होते. भारतीयांनी पर्यटनाला बाहेर पडावे, त्यांच्या खिशात जमा होणारी रक्‍कम बाहेर पडावी आणि ती अर्थव्यवस्थेत खेळती राहून अनेक नव्या हातांना रोजगार देणारी ठरावी, यावर सरकारही भर देत आहे. पण महाडजवळ घडलेल्या दुर्घटनेने भयाचे ढग गोळा झाले. अशा दुर्घटना किती दूरगामी परिणाम घडवितात, याचे हे उदाहरण आहे. त्यामुळेच पर्यटवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्याला केवळ निसर्गसुंदर आणि ऐतिहासिक स्थळांच्या जाहिराती करणे, ब्रॅंड ऍम्बेसिडर नेमणे, उत्तम हॉटेल्स बांधणे एवढेच करून भागत नाही. एकूण पायाभूत-संरचनात्मक सुविधा, त्यातील दुरुस्ती-देखभाल, कायदा-सुव्यवस्था, सुशासन या सर्वच घटकांवर लक्ष केंद्रित करावे लागते. महाडच्या दुर्घटनेने त्याचीच जाणीव करून दिली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com