गजाआडचे भीषण वास्तव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

आता गजाआडच्या असंख्य कहाण्या चव्हाट्यावर येऊ लागल्या असून, केवळ संशयापोटी कारागृहात डांबलेल्या कथित गुन्हेगारांवर कसे अमानुष अत्याचार केले जातात, हे उजेडात येत आहे. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असली तरी केवळ दखल घेऊन वा एक-दोन अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने या विषयावर पडदा टाकता कामा नये

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील एका तुरुंगात महिलांनीच एका महिला कैद्यावर अमानुष अत्याचार करून तिला ठार मारल्यामुळे, कारागृहांच्या पोलादी पडद्याआड नेमके काय चालते, यावर प्रकाश पडला आहे. मंजुळा शेट्ये हे त्या दुर्दैवी महिलेचे नाव. भावजयीच्या खूनप्रकरणी आपल्या आईसह कारावास भोगणारी ही महिला चांगल्या वर्तनामुळे भायखळा या महिलांच्या तुरुंगात सजा भोगत "वॉर्डन' म्हणून काम करीत होती. याचा अर्थ ती तुरुंगातील व्यवस्थेचाच एक भाग होती. मात्र, तेथील क्रूर आणि अमानुष व्यवस्थेनेच तिचा बळी घेतला आहे.

कैद्यांची व्यवस्था बघणे, त्यांना खाद्यपदार्थ नियमित मिळतात की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे काम तिच्याकडे होते. एके दिवशी खाद्यपदार्थांमध्ये दोन अंडी आणि पाच पाव यांचा हिशेब न लागल्याने तुरुंगातील महिला कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण करताना, तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले. हे अत्याचार इतके क्रूर होते की दिल्लीतील "निर्भया' प्रकरणाची आठवण व्हावी. साहजिकच तिच्या मृत्यूनंतर महिला कैद्यांनी बंड पुकारले आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आले. अन्यथा, बदमाश आणि निर्ढावलेल्या व्यवस्थेने ते सहज दाबून टाकले असते. या प्रकरणी पाच कर्मचारी व थेट तुरुंग अधीक्षकांवरही गुन्हा दाखल झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात यावे.

पुढे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले ते शीना बोरा या आपल्या कन्येच्या खुनाच्या आरोपावरून याच तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी या "हायप्रोफाइल' कैद्याच्या जबानीमुळे. मंजुळावर झालेल्या अत्याचारास आपण साक्ष आहोत, असे तिचे म्हणणे असून त्याविरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्यालाही मारहाण झाल्याचा तिचा दावा आहे. यामुळे आता गजाआडच्या असंख्य कहाण्या चव्हाट्यावर येऊ लागल्या असून, केवळ संशयापोटी कारागृहात डांबलेल्या कथित गुन्हेगारांवर कसे अमानुष अत्याचार केले जातात, हे उजेडात येत आहे. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असली तरी केवळ दखल घेऊन वा एक-दोन अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने या विषयावर पडदा टाकता कामा नये. "वॉर्डन' झाल्यामुळे व्यवस्थेचाच एक भाग बनलेली मंजुळा व्यवस्थेतील गैरकारभाराला वाचा फोडत होती. त्यामुळे तिच्यावर वरिष्ठांचा राग होता आणि त्यामुळेच तिने आपल्याला कल्याणच्या तुरुंगात हलवावे, अशीही मागणी केली होती. याचा अर्थ हे प्रकरण "दोन अंडी आणि पाच पाव' यापुरते मर्यादित नाही. त्यामुळे आता गृहखात्याची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकूणातच गजाआडचे वातावरण कसे सुधारेल, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.