छोटा पडदा आणखी छोटा होणार?

TV
TV

दिवाणखान्यात एक टीव्ही, सोफासेट आणि त्याचा सामुदायिक आस्वाद घेत असलेलं मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्र जगातील बहुतांश देशांत अनेक वर्षं पाहायला मिळत होतं. पुढं कुटुंब ही संकल्पना हळूहळू बदलली, आर्थिक स्तर बदलले आणि
घरातला एकमेव टीव्ही वैयक्तिक खासगीपण जपत एकाचा दोन झाला. संगणक, मोबाईल क्रांतीनं हेही चित्र आता पुसायचं ठरवलेलं दिसतं. दूरचित्रवाणी प्रेक्षकांच्या संदर्भात "गुगल'नं केलेलं संशोधन सध्या प्रसारमाध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमात गाजतं आहे. त्यातील आकडे पारंपरिक टीव्ही माध्यमाला भविष्यातील आव्हानांचा विचार करायला लावणारे आहेत.

अठरा ते चोवीस वर्षे वयोगटातील मुलांचा, त्यांच्या दूरचित्रवाणी कार्यक्रम पाहण्याच्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर असं आढळलं, की या वयोगटातील निम्मी मुलं ही गेल्या पाच वर्षांत टीव्हीचे कार्यक्रम नेहमीच्या संचावर पाहत नाहीत. पूर्वीच्या सरासरीपेक्षा नऊ टक्‍क्‍यांनी यात घट झाल्याचं आढळून आलं. संगणकावर कार्यक्रम पाहण्याचे प्रमाण 57 टक्‍क्‍यांनी, टॅबलेटवरचे 68 टक्‍क्‍यांनी, तर स्मार्टफोनवरचे प्रमाण शंभर टक्‍क्‍यांनी वाढलं आहे. टीव्ही नावाचा झंझावात आता हळूहळू संपणार, असे हा अहवाल सुचवू इच्छितो.

गेल्या वर्षीचं हे संशोधन मुख्यत्वे समाजमाध्यमातून उपलब्ध अशा "यू-ट्यूब'चे वापरकर्ते आणि पारंपरिक टीव्हीचे प्रेक्षक यांच्या संदर्भात आहे. 2025पर्यंत माध्यम उद्योगात काय चित्र असेल हे ते सांगते. "यू-ट्यूब'चे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यांचा विस्तारही आता वेगानं होत असल्याचं यात म्हटलं आहे. "नेटफ्लिक्‍स'सारख्या सोयीमुळे हवा तो चित्रपट हव्या त्या वेळेत उपलब्ध होत आहे. याचाही परिणाम टीव्ही वाहिन्या पाहणाऱ्या प्रेक्षकांवर होत असल्याचं या संशोधनातून समोर येतं. परंतु, "निल्सन' या जगविख्यात संशोधन संस्थेनं पारंपरिक टीव्ही आजही आघाडीवर असल्याचं आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे.

"गुगल'चा अहवाल भारताला जसाच्या तसा लागू होईल काय याचे उत्तर "नाही' असे आहे. कारण हे संशोधन मुख्यतः अमेरिकेतील प्रेक्षक यांच्या संदर्भात केलेलं आहे. सर्व जग आता जवळ आलेलं असलं, तरी आपल्या आणि त्यांच्या जीवनशैलीत आजही मोठी तफावत आहे. अर्थात आता टीव्हीशिवाय अनेक पर्याय प्रेक्षकांना दृकश्राव्य कार्यक्रम पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, याची गंभीर नोंद टीव्ही वाहिन्यांना घ्यावी लागेल. कारण त्यांचे बहुतांश उत्पन्न हे जाहिरातींच्या माध्यमातून येतं. इथले प्रेक्षक कमी झालेले दिसले तर जाहिरातदार ऑनलाइन माध्यमाला पसंती देतील हे नक्की. हे टाळायचं असेल तर कार्यक्रमाच्या निर्मितीचा आणि आशयसंपन्नतेचा दर्जा उंचावण्याची आणि गुंतवून ठेवणारा आशय देण्याची जबाबदारी वाहिन्यांना घ्यावी लागेल.

एक अभिरुचीसंपन्न प्रेक्षक या नात्याने आपल्यालाही यात सहभाग द्यावा लागेल. फुकटेपणाची सवय आपल्याला इतकी लागली आहे, की पैसे भरून एखादी वाहिनी बघण्याची वृत्ती तुरळक दिसते. केबल आणि डिश या माध्यमासाठी महिना तीन-साडेतीनशे रुपये भरून शंभराहून अधिक वाहिन्यांनी आपल्याला दर्जेदार कार्यक्रम दाखवावेत ही अपेक्षाच मुळी चुकीची आहे. कारण हे पैसे आपण सेवा पुरवठादारांना वाहिनी आपल्या टीव्ही संचापर्यंत पोहोचवण्यासाठी देत असतो. वाहिन्यांच्या खर्चातील कोणताच वाटा आपण देत नाही. हे चित्र बदलले आणि आपण "पे चॅनेल' पद्धत मोठ्या प्रमाणात स्वीकारली तर वाहिन्यांना निर्मिती खर्चासाठी जाहिरातींवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागणार नाही.

इंटरनेट टीव्ही आणि "व्हिडिओ ऑन डिमांड' या सेवा ही अधिक सक्षमपणे उपलब्ध झाल्यास ग्राहकांना जाहिरातशरण कार्यक्रम पाहायला लागणार नाहीत.
टीव्ही अस्तंगत होईल अशी परिस्थिती आजतरी आपल्या देशात नाही. याचे कारण असे की मोबाईल आणि संगणकावरून उपलब्ध होणाऱ्या कार्यक्रमांना मर्यादा आहेत. विनाअडथळा ती सेवा मिळण्यात आज मोठ्या शहरांतही अनेक समस्यांचा
आपण सामना करत असतो. हे संशोधन "गुगल' या नवमाध्यमातील एका तगड्या संस्थेनं केलं आहे. "यू-ट्यूब'ची मालकीही त्यांच्याकडं आहे. अशा परिस्थितीत हे संशोधन त्यांच्या व्यवसायाला पूरक होऊन समोर आणलं जात असेल असं मानायला वाव आहे.

टीव्ही आला तेव्हा रेडिओ मागे पडेल, असंही भाकीत वर्तवण्यात आलं होतं; पण हा अंदाज चुकीचा निघाला. हे ध्वनिमाध्यम मोठ्या दिमाखात अनेक वाहिन्यांसह कार्यरत आहे आणि चांगला महसूलही मिळवत आहे. इंटरनेटवर वृत्तपत्र मिळू लागल्यावर छापील वृत्तपत्रांवर गदा येईल, असे पत्रपंडित म्हणत होते, पण तसं झालं नाही. आजही माध्यम उद्योगात वृत्तपत्र उद्योगाचा 25 टक्के वाटा आहे. 2021पर्यंत तो 18 टक्‍क्‍यांपर्यंत खाली जाईल, असं अनुमान आहे; पण तरीही या माध्यमाला धोका नाही हे निश्‍चित.

टीव्ही स्थिरस्थावर होताना टेलिव्हिजन या माध्यमाबद्दलही "ट्‌वेंटी एथ सेंचुरी फॉक्‍स' या जगविख्यात सिनेनिर्मिती संस्थेचे अधिकारी डॅरील झानुक म्हणाले होते, की हे माध्यम फारतर सहा महिने टिकाव धरेल. लोक लाकडी खोक्‍याकडं पाहायला लवकरच कंटाळतील. हे विधान त्यांनी 1946मध्ये केलं होतं आणि तेही साफ खोटं ठरलं.

अर्थात "गुगल'ने मांडलेले निष्कर्ष हे टीव्ही माध्यमांनी गांभीर्याने घ्यायला हवेत याबद्दल वाद नाही. उत्तम आणि सातत्यपूर्ण असा आशय मोठ्या प्रमाणात वाढवून कार्यक्रम देणं हे शिवधनुष्य आता वाहिन्यांना उचलावं लागणार आहे. "एपिक'सारख्या वाहिन्या असा प्रयत्न करताना दिसतही आहेत. नवी आव्हानं ही नेहमीच सकारात्मक बदलांची मशागत करतात. टीव्ही उद्योगातही ते घडावे आणि छोटा पडदा उजळावा अशी अपेक्षा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com