दृष्टिपथात ‘ट्विट’चे एडिट बटण

दृष्टिपथात ‘ट्विट’चे एडिट बटण

तोंडातून निघालेला शब्द, बंदुकीतून निघालेली गोळी परत घेता येत नाही, तसेच काहीसे सोशल मीडियामधील ‘ट्विटस्‌’बाबत होते. एकदा पोस्ट केलेले ‘ट्विट’ केवळ डिलिट करता येते. ‘ट्विटर’ ही बातम्या व सोशल नेटवर्किंगसाठी वापरली जाणारी लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइट. तिचा उपयोग प्रामुख्याने ताज्या घडामोडींची माहिती इतरांना देण्यासाठी, राजकीय-सामाजिक वगैरे विषयांवरील मते मांडण्यासाठी होतो. बहुतेक बड्या मंडळींच्या ट्‌विटर हॅंडल्सवर माध्यमांच्या प्रतिनिधींचा जागता पहारा असतो. त्यांनी एखादे ‘ट्‌विट’ केले की त्याची बातमी होते; पण अशा एखाद्या ‘ट्विट’मध्ये दुरुस्ती, सुधारणा करण्याची सध्या कसलीही सोय नाही. परिणामी, व्याकरणाच्या किंवा इंग्रजी स्पेलिंग्जमधील चुकांसह ‘ट्विट’ एकदा केले की केले. एकतर ते काढून टाकणे किंवा येतील त्या प्रतिक्रिया गपगुमान सहन करणे, एवढेच हाती राहते. 

म्हणूनच ‘ट्‌विट’मध्ये सुधारणा करता यावी, ती एडिट करण्याची सुविधा असावी, अशी मागणी होत होती. ‘फेसबुक’वर अशी सुविधा आहे. त्यामुळे पोस्ट हव्या तेव्हा दुरुस्त करता येतात. एखादी पोस्ट म्हणजे ‘ट्विट’ अथवा मजकूर बुकमार्क करण्याची सुविधा असावी, जेणेकरून गरज पडेल तेव्हा ती पटकन उपलब्ध होईल, अशी आणखी एक मागणी आहे. यापैकी एडिट बटणाच्या सुधारणेचे संकेत ‘ट्‌विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी दिले आहेत. अर्थात, ही सुविधा उपलब्ध करण्यात काही अडचणी आहेत. एकतर ‘ट्‌विटर’च्या मायाजालातील ३८ टक्‍के भाग संवादांचा आहे. तुमची पोस्ट अनेकांनी ‘रिट्‌विट‘ किंवा ‘एम्बेड’ केलेली असते. मूळ ‘ट्‌विट’ संपादित केल्यानंतर ‘रिट्‌विट’चे काय होणार किंवा त्यावर आलेल्या प्रतिक्रियांचा आशय बदलेल त्याचे काय, हा तिढा अजूनही सुटलेला नाही. 
अर्थात, ‘ट्‌विट’मध्ये सुधारणा करण्याची सुविधा आल्यानंतर बऱ्याच जणांची सोय होणार आहे. विशेषत: राजकीय नेत्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांची उजळणी केल्याने जी पंचाईत होते, तिच्यापासून सुटकेचा एक मार्ग त्यांना मिळेल. विरोधी बाकावर असताना बोलायचे एक आणि सत्तेवर आल्यानंतर करायचे एक, त्याचे जोरदार समर्थनही करायचे, अशा वृत्तीचे बहुतेक सगळे नेते या सुविधेचा प्रारंभ होताच सर्वप्रथम आपले जुने ‘ट्‌विट’ दुरुस्त करून घेतील. अन्य मंडळीही चूकभूल देणे-घेणे करण्याऐवजी हव्या त्या दुरुस्त्या करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com