‘शत-प्रतिशत’ डरकाळी (अग्रलेख)

uddhav thackeray
uddhav thackeray

सरकारमध्ये सामील झाल्यापासून भाजपशी खडाखडीच्या पवित्र्यात असलेल्या शिवसेनेने स्वबळाची रणनीती लोकसभा निवडणुकांना सव्वा वर्ष असताना जाहीर केली.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रारंभी विरोधी बाकांवर बसणाऱ्या आणि नंतरच्या महिनाभरातच तेथून थेट सरकारात सामील होणाऱ्या शिवसेनेने आपले पत्ते उघड केले असून, आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढविण्याची घोषणा केली आहे. शिवाय, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला आणि निव्वळ ‘बोलघेवडे नेतृत्व’ अशी त्यांची संभावना केली ! प्रस्थापिताला विरोध करण्यातूनच ताकद उभी राहू शकते, या सूत्रावर शिवसेना कायम असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. पण थेट मोदी यांचे वाभाडे काढणाऱ्या या इतक्‍या तिखट हल्ल्यानंतर शिवसेनेची केंद्र; तसेच राज्यातील सरकारातून भाजप हकालपट्टी करणार काय, याबाबत कुतूहल निर्माण होणे स्वाभाविकच. मात्र मुख्यमंत्र्यांनी लगेचच सरकार पाच वर्षे चालेल असे सांगून ‘भांडू; पण सत्तेत एकत्र नांदू’ याच नाट्याचा पुढचा अंक सुरू राहील, असे संकेत दिले आहेत. सरकारमध्ये सामील झाल्यापासून भाजपशी खडाखडीच्या पवित्र्यात असलेल्या शिवसेनेने आपली रणनीती लोकसभा निवडणुकांना सव्वा वर्ष राहिले असताना जाहीर केली. २०१४मध्ये लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या गळ्यात गळे घालून लढविणाऱ्या भाजपने नंतरच्या चारच महिन्यांत शिवसेनेबरोबरची युती तोडली. त्यात पुन्हा त्या विधानसभेत भाजपने शिवसेनेपेक्षा जवळपास दामदुपटीने जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली होती आणि ‘युती’त आजवर थोरल्या भावाच्या पवित्र्यात वावरणाऱ्या शिवसेनेला धाकट्या भावाची भूमिका घ्यावी लागली होती. पुढे सरकारात सामील झाल्यावरही शिवसेनेला हेटाळणीची वागणूक देण्याचे धोरण भाजपने अवलंबिले आणि त्याचीच परिणती प्रदीर्घ काळ चाललेल्या या खडाखडीनंतरच्या पेचात झाली आहे. याचा भाजपला पुढच्या लोकसभा निवडणुकीत फटका बसेल काय, हा खरा मुद्दा आहे. मोदी यांना पंतप्रधानपदावर विराजमान करणाऱ्या गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे २३ खासदार निवडून आले होते. मात्र तेव्हा शिवसेना त्यांच्या साथीला होती. त्यामुळे केंद्रात आपले सरकार आणण्यासाठी भाजपने शिवसेनेला बरोबर ठेवले होते आणि केंद्रात दणदणीत विजय मिळाल्याबरोबर भाजपच्या अंगी बारा हत्तींचे बळ आले आणि त्यांनी ‘युती’च्या रौप्यमहोत्सवी वर्षातच ती तोडून स्वबळाचा डाव टाकला होता, हे शिवसेना विसरू शकत नव्हती. तरीही उद्धव यांनी भाजपशी एकहाती झुंजार लढत देऊन एकट्याच्या जोरावर ६३ आमदार निवडून आणून आपली शक्‍ती दाखवून दिली होती. या साऱ्याची परिणती आता उद्धव यांनी ‘शतप्रतिशत शिवसेना !’ अशी घोषणा करण्यात झाली आहे. शिवसेनेच्या या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. लोकसभेत भाजपला फटका बसू शकतो; शिवाय या दोन ‘हिंदुत्ववादी’ विचारांच्या पक्षातील लढत आणि त्याच वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी आघाडी केल्यास चित्र एकदम पालटू शकते. गुजरातमध्ये बसलेल्या फटक्‍यानंतर भाजपची तीन वर्षांपूर्वीची झळाळी कमी झाल्याचे दिसत आहे. त्याशिवाय आणखी काही प्रश्‍न आहेत. पण शिवसेना आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार की अन्य कोणा पक्षाशी; उदा. जुना मित्र काँग्रेस वा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याशी उघड वा छुपी आघाडी करणार काय, याची उत्तरे अद्याप गुलदस्तात आहेत. ती यथावकाश मिळतील !

‘हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू नये म्हणून आपण अन्य राज्यांत आतापावेतो निवडणुका लढवत नव्हतो; मात्र आता त्या लढवणार !’ अशी घोषणाही उद्धव यांनी या वेळी केली. मात्र त्यात तथ्य नाही. अलीकडेच गुजरात विधानसभेतही भाजपचे उमेदवार रिंगणात होतेच आणि त्याआधी बिहारमध्येही शिवसेना मैदानात होती. अर्थात, आता काय आणि पूर्वी उत्तर प्रदेशातही शिवसेनेने ताकद अजमावली तेव्हा त्यांची डिपॉझिट जप्त झाली होती! शिवसेनेच्या मंगळवारच्या कार्यकारिणी बैठकीत उद्धव यांनी जाहीर केलेल्या स्वबळाच्या निर्णयापलीकडे फार काही विशेष नव्हते. आदित्य ठाकरे यांची नेतेपदी झालेली निवड ही अपेक्षित होती. मुळात नेतेपद नसतानाही आदित्यच अनेक महत्त्वाचे निर्णय घेत होते ! ‘ही घराणेशाही नाही ! घराणेशाही आहे ती फक्‍त काँग्रेसमध्ये,’असे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच आदित्यला ‘लाँच’ करताना सांगून ठेवलेच आहे ! नेतेपदी झालेली एकनाथ शिंदे यांची निवड मात्र भुवया उंचावणारी आहे. अर्थात, त्याचे रहस्य त्यांच्यासमवेत असलेल्या २०-२५ आमदारांमध्ये आहे. त्यामुळे स्वबळाचा निर्णय झाल्यावर एकनाथ शिंदे यांना राजी राखणे भागच होते. बाकी मनोहर आणि सुधीर जोशी तसेच लीलाधर डाके यांचे नेतेपद कायम राहिले. त्याचे कारण बहुधा त्यांचे उपद्रवमूल्य संपले असल्यामुळे त्यांना ‘मार्गदर्शक मंडळा’त बसवून उगाच प्रसारमाध्यमांना खाद्य का द्या, हा विचार झालेला दिसतो. एकंदरीत, शिवसेनेने प्रदीर्घ काळच्या खडाखडीनंतर का होईना घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी निवडणुका रंगतदार होणार, एवढे मात्र नक्‍की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com