टेनिस कोर्टातील कज्जा! (अग्रलेख)

serena williams
serena williams

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत सेरेना विल्यम्स अचानक संतापण्यामागे कारणही तितकेच सयुक्‍तिक असू शकते. परंतु, सेरेनाने हा प्रकार शांतपणे हाताळायला हवा होता. तसे झाले असते तर नेओमीचे लक्षणीय यशही झाकोळले गेले नसते.

म हिला टेनिसविश्‍वात आदराने जिचे नाव घेतले जाते, त्या सेरेना विल्यम्सने अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार पत्करताना दाखवलेला फणकारा वादग्रस्त ठरला नसता तरच नवल होते. न्यूयॉर्कमधल्या सुप्रसिद्ध ‘फ्लशिंग मिडोज’च्या आर्थर ॲश टेनिस कोर्टवर तिला पराभवाचा धक्‍का दिला तोही तुलनेने खूपच नवख्या जपानच्या नेओमी ओसाकाने. नेओमी ही जपानची पहिलीच ग्रॅंड स्लॅम टेनिस विजेती ठरली आहे. सेरेनाने तिच्या आयुष्यातले पहिले ग्रॅंड स्लॅम जेतेपद पटकावले, तेव्हा नेओमी अवघी तीन वर्षांची होती. छत्तीस वर्षांची सेरेना यंदा जिंकली असती, तर ते तिचे सातवे अमेरिकी खुले जेतेपद ठरले असते. पण नेओमीने हे घडू दिले नाही. पण या ऐतिहासिक विजयाने नेओमीला आनंदाऐवजी काहीसे दु:खच झाले असेल. कारण ही स्पर्धा फार चुकीच्या कारणासाठी टेनिसप्रेमींच्या लक्षात राहणार आहे. त्याला कारणीभूत आहे सेरेनाचे कोर्टातील वर्तन! आपल्या सडेतोड सर्व्हिसदेखील नीट होत नाहीत, हे लक्षात आल्यामुळे अस्वस्थ झालेल्या सेरेनाला पंच कार्लोस रॅमोस यांनी पहिल्या सेटमध्येच पहिली तंबी दिली. ‘नेटजवळ येऊन खेळ’ असा सल्ला ‘बॉक्‍स’मध्ये बसून तिचे प्रशिक्षक पॅट्रिक मुरातोग्लू हे तिला खुणा करून देत होते. अर्थात त्याकडे सेरेनाचे लक्ष होते असे नव्हे, पण पंच कार्लोस यांनी नियमावर बोट ठेवून तिला संकेतभंगाबद्दल सुनावले. त्यावर भडकलेल्या सेरेनाने ‘मी चीटिंग करत नाही, त्यापेक्षा मी हरणं पसंत करेन,’ असे त्यांना उलट ऐकवले. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तिने स्वत:वर संतापून रॅकेट आपटून तोडली. तेव्हाही कार्लोस यांनी तिला दंडास पात्र असल्याचा इशारा दिला. तिसऱ्यांदा असे घडले, तेव्हा पंचांनी तिला धारेवर धरत सरळ गेम नेओमीला बहाल केला. इथे सेरेनाचा तोल साफ गेला आणि ताड ताड वाक्‍ताडन करीत तिने पंच कार्लोस रॅमोस यांना ‘तुम्ही चोर आणि खोटारडे आहात, इतकंच नाही तर तुम्ही लिंगभेद मानणारे आहात. तुम्ही माझी माफी मागायला हवी,’ असे बोल लावले. या वर्तणुकीखातर सेरेनाला जवळपास १७ हजार डॉलर इतका दंडही ठोठावण्यात आला आहे. या सगळ्या भानगडीत बिचाऱ्या नेओमी ओसाकाचे घवघवीत यश मात्र पुरते काळवंडले गेले.

सेरेनाचे वाक्‍ताडन जगभरातील टेनिस चाहत्यांमध्ये खळबळ माजवतेच आहे, पण त्याने अनेक अन्य क्रीडाबाह्य वादांना जन्म दिला आहे. टेनिस लढतींमध्ये पंचांशी होणाऱ्या खेळाडूंच्या हुज्जती नव्या नाहीत. म्हणूनच सेरेनाने केलेले ‘गुन्हे‘(?) पुरुष खेळाडूंनी केले असते, तर त्यांना दंड झाला असता काय? असा सवाल केला जात आहे आणि त्यात तथ्यदेखील आहे. तसेच कोर्टाच्या बाहेर बसून खेळाडूंना सूचना करणारे प्रशिक्षक जवळपास सर्वच लहान-मोठ्या लढतींच्या वेळी दिसून येतात. हा संकेताचा भंग असला तरी याकडे बहुतेक पंचमंडळी दुर्लक्ष करतात. पण पंच कार्लोस रॅमोस कडक शिस्तीचे आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारे पंच म्हणून ख्यात आहेत. सेरेनाच्या समर्थनार्थ धावून आलेल्या माजी जगज्जेत्या बिली जीन किंगने उपरोधाने म्हटले, की ‘महिला खेळाडू वाद घालतात, तेव्हा त्या उर्मट आणि उद्दाम असतात, पुरुष खेळाडू मात्र नेहमीच स्पष्टवक्‍ते किंवा परखड असतात!’ अन्य अनेक आजी-माजी खेळाडूंनी सेरेनाचा संताप अनाठायी नसल्याचे मत व्यक्‍त केले. सेरेना विल्यम्स ही अमेरिकेत एक आदर्शवत व्यक्‍ती मानली जाते. लिंगभेद, वर्णभेद, वर्गभेद अशा साऱ्या अडथळ्यांवर मात करत स्वकर्तृत्वाने तिने आंतरराष्ट्रीय कीर्ती कमावली. मूलबाळ झाल्यानंतरही जिद्दीने कोर्टात उतरून वयाच्या पस्तिशीत आपली खेळातली चमक कायम ठेवली. शालेय मुलामुलींना प्रेरित करण्यासाठी जिचे उदाहरण हमखास दिले जाते, अशी ही सेरेना. त्यामुळे तिचे हे वर्तन जास्तच खटकते. स्पर्धांमध्ये सतत नव्यानव्या खेळाडूंनी पराक्रम गाजवावा आणि प्रस्थापितांना हरवावे, यातच खरे म्हणजे खेळाचे सार्थक असते. ते स्वीकारण्यात खिलाडू वृत्ती असते. सुरवातीला सेरेना अचानक संतापली त्यामागे सयुक्‍तिक कारण असू शकते, हे खरेच. तरीही भर कोर्टातला हा कज्जा शोभनीय नव्हता. कारकिर्दीच्या उतरणीवर असलेल्या सेरेनाने सारा प्रकार शांतपणे हाताळला असता, तर तिचेच व्यक्‍तिमत्त्व झळाळून उठले असते आणि तिचा आदर्श मानून लहानपणी हातात टेनिसची रॅकेट घेणाऱ्या नेओमी ओसाकाचे लक्षणीय यशही झाकोळले गेले नसते. असे कज्जे चुकीचे पायंडे पाडतात आणि अंतिमत: खेळाचेच नुकसान करतात. त्यामुळेच अमेरिकी ओपनमधील महिलांच्या अंतिम एकेरीतील सेरेनेचा हा ‘दुहेरी’ पराभव जास्त दुःख देऊन गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com