वेदना बनलेलं सौंदर्य 

Firasti by Uttam Kamble
Firasti by Uttam Kamble

एखादी अनमोल चीज आपल्याकडं जन्मजात मिळालेली असेल आणि ती चीजच जर आपलं जगणं अवघड करून ठेवत असेल तर...? आता या गोष्टीवर काही उपाय आहे की नाही ठाऊक नाही; पण जन्मापासून लाभलेल्या सुंदर गोष्टी विशिष्ट समाजातल्या माणसांकरिता वरदानाऐवजी शापच होऊन बसतात! आणि हा शाप त्यांना पावलापावलावर भोगावा लागतो. गुन्हेगार जातीत जन्मून ऐन तारुण्यात पाऊल ठेवलेल्या त्या सुंदर, देखण्या नवतरुणीच्या बाबतीत असंच काहीसं घडलं होतं...घडत आहे. त्या तरुणीचं, तिच्या सौंदर्याचं संरक्षण कसं करायचं, हाच एक घोर तिच्या आई-वडिलांना पडला आहे. 

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आणि मी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो होतो. भाईंबरोबर समारंभ करणं खूप आनंददायी असतं. एकतर ते खूप सुंदर बोलतात. याही वयात त्यांच्या बोलण्यात विसंगती असत नाही. चुकीचा मुद्दा येत नाही. घड्याळ कधी त्यांच्या विस्मरणात जात नाही. विशेष म्हणजे, आपलंही प्रशिक्षण होतं. ...तर ते भाषण करायला उभे राहिले. फोटोग्राफर त्यांचे फोटो काढू लागले. आता अलीकडं कॅमेरे जवळपास गायबच झाले आहेत. त्यांची जागा मोबाईलमधल्या कॅमेऱ्यांनी घेतली आहे. छोट्या जागेत हे मोठे पराक्रमी कॅमेरे असतात. अनेक जण फोटो घेत होते. त्यात एक छोटी मुलगीही होती. वेगवेगळ्या अँगलमधून ती भाईंना टिपण्याचा प्रयत्न करत होती. बाकीचे फोटोग्राफर थकले; पण ही थकत नव्हती. फोटो घ्यायची. कोपऱ्यात थांबायची. पुन्हा भाईंचा फोटो काढण्यासाठी यायची. तिच्या हालचालींत आत्मविश्‍वास होता. चेहऱ्यावर निर्भयता दिसत होती. विशेष म्हणजे, गालातल्या गालात ती सुंदर हसायची. मोबाईल उभा-आडवा करायची. स्क्रीनवर बोट ठेवून फोटो घ्यायची. मोबाईलमधून प्रखर फ्लॅश उडायचा. आता एकटीच ती स्टेजसमोर होती. आपल्यामुळं श्रोत्यांना कसलाही अडथळा होणार नाही, याचीही काळजी घेत होती. काही जण उत्सुकतेनं तिच्याकडं बघत होते. काही जण मनातल्या मनात तिचं कौतुकही करत असावेत. अतिशय छोट्या खेड्यात असं दृश्‍य सहसा दिसत नाही. भाई भाषण करून बसले. माझा नंबर आला. मग ती माझे फोटो टिपण्यासाठी हालचाली करू लागली. तासभर मी बोलत होतो. एवढ्या काळात ती अनेकदा बेडरपणे समोर उभी राहिली. 

भाषण संपलं. कार्यक्रमही संपला. ती पुन्हा समोर आली. आता तिच्याबरोबर तिचे दोन-तीन नातेवाईक होते. तिनं त्यांचा परिचय करून दिला. ते तिचे वडील, काका व आई होती. या सर्वांबरोबर सेल्फी घ्यायचा होता. मधेच थांबत तिनं आदेश दिला :''सर, या इथं पाहा... चांगला सेल्फी येईल.'' आज्ञापालन केलं. मग तिनं स्वत:बरोबर सेल्फी घेतला. तिचे वडील समोर येत म्हणाले : ''सर, ही माझी एकुलती मुलगी आहे. तिला आशीर्वाद द्या.'' 

मी आशीर्वाद दिला. तिचे वडील नम्रपणे म्हणाले: ''सर, समोर टपरीवर चहा घेऊ या का? नाहीतरी तुम्ही आम्हाला कुठं भेटणार...!'' 

एकीकडं संयोजक मला गर्दीबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, तर हा अनामिक माणूस चहाचा आग्रह धरत होता. मी संयोजकांना विनंती केली आणि चहासाठी त्याच्या लवाजम्यासह निघालो. हॉटेल बंद होण्याच्या बेतात होतं. यानं मालकाला विनंती केली. चहाची ऑर्डर दिली. दरम्यान, ही मुलगी हॉटेलमध्ये न येताच समोरच्या लिंबाखाली थांबली. पुन्हा मोबाईलबरोबर खेळू लागली. 

काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो : ''तुझी मुलगी खूप निर्भय आहे. सुंदर आहे. निष्पाप दिसतेय. चपळ आहे.'' 

माझं ऐकतच त्यानं एक दीर्घ श्‍वास घेतला. आता तो काय सांगणार, हे त्याच्या भावानं आणि बायकोनं ओळखलं असावं. त्यांचे चेहरे एकाएकी गंभीर झाले. 

हा म्हणाला : ''तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे; पण यामुळंच एक खूप गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. आता ती इथं नाही आपल्याबरोबर म्हणून सारं काही विस्कटून सांगतो. आता बघा, आम्ही गुन्हेगारी जमातीमधले. हातावर पोट आहे आमचं. काय काय तरी करत राहतो. जगत राहतो. आम्हाला एकच मुलगी झाली. ती ही. इतकी सुंदर मुलगी आमच्या जमातीत अपवादानाचं असते...आपल्यापोटी एक सुंदर परीच जन्माला आल्याचा आम्हाला खूप आनंद... माझी बायको रोज हिची दोन वेळा नजर उतरवायची...दृष्ट काढायची... पोरगी मोठी व्हायला लागली आणि टेन्शन वाढायला लागलं. एकतर आमच्या जातीत आठवी-नववीपर्यंत पोचलेली बहुधा ही पहिलीच पोरगी असावी. एवढी देखणी पोरगी आमच्या जमातीत पूर्वी कधी जन्माला आल्याचं मला आठवत नाही आणि याचमुळं खरंतर माझं टेन्शन वाढत चाललं...'' 

हा सारखं सारखं टेन्शन का म्हणतोय, याविषयी मी त्याला थेट विचारलंच. 

पुन्हा गंभीर होत तो म्हणाला : ''अहो सर, आता कसं सांगणार...? सातवीपर्यंत हिला बसनं पाठवायचो... बसमध्ये आणि बाहेरही अनेक नजरा हिला डसू लागल्या. काय काय टॉन्टिंग करतात पोरं... मोठ्या वर्गातली पोरं 'पिक्‍चरला येतेस का?' 'फिरायला येतेय का?' असं बेधडक विचारतात... गुन्हेगार जातीतली पोरगी... कोण विचारणार? अनेकदा आमचे लोक यांच्या दारावर भीक मागायला जातात... एकदा-दोनदा तर काही उद्धट पोरांनी हिचा हात ओढला. गाल ओढला. दप्तरात चिठ्ठ्या टाकल्या. कसले कसले निरोप धाडले. शाळेत जाऊन हिनं सांगितलं. 'लक्ष द्या,' अशी विनंती केली. शाळेतले लोक म्हणाले : 'अरे, भिकाऱ्याच्या पोरीची छेड कोण कशाला काढेल?' मग आम्ही बस बंद केली. हिला शाळेत सोडायला आणि घ्यायला आमच्यापैकी कुणी तरी जातं... काय करणार...? घरातले लोक 'शाळा बंद कर' म्हणतात...पण तसं करून कसं चालंल? रात्रंदिवस हिचीच काळजी आणि त्याचं कारण ही सुंदर आहे... आता तुम्ही सांगा देवानंच तिला सुंदर करून धाडलंय, आम्ही काही गुन्हा केला की काय? सुंदर असण्यात हिचा काय दोष...? काय करावं कळत नाही... काही जण म्हणतात : 'खूप झालं शिक्षण आता. लग्नाला उभं करा हिला...' काहीच सुचत नाही. एकच प्रश्‍न घेरतोय...सुंदर होणं गुन्हा आहे काय..? त्यात ही इतकी निरागस वागते, की कुणी काहीही गैरसमज करून घेऊ शकतं...त्यातही शाळेच्या बाहेर थांबणारी गुंड पोरं तर काय विचारायला नकोत... भलतेसलते विचार मनात येतात...काय करावं...?'' 

याचं बोलणं सुरू असतानाच चहा आला. याच्या बोलण्याला त्याचे नातेवाईक मान हलवून, भुवया हलवून प्रतिसाद देत होते. 

'काहीही करून मुलीचं शिक्षण बंद करू नये. दहावीनंतर तिला चांगल्या वसतिगृहात किंवा आणखी कुठंतरी चांगल्या ठिकाणी ठेव,' असं मी त्याला सांगत होतो. 'लग्न हा काही इलाज नाही,' हेही पुन: पुन्हा सांगितलं. सुंदर स्त्रीचं लग्न होवो किंवा न होवो, हे सगळं जग नीटच समजून घ्यावं लागतं... 

माझं कोणतंच उत्तर त्याला पटत नाहीय, असं वाटत होतं. त्याचं एकच पालुपद : ''सर गरिबांनी जगायचं की नाही?... देखण्या लेकरांनी कसं जगायचं?... इतके घाणेरडे शब्द, इतके विषारी डोळे तिला झेलायला लागतात...कधी कधी ती खूपच नाराज होते... शाळा नको म्हणते... बाहेर पडायला नको म्हणते...'' 

बोलता बोलता सगळ्यांचाच चहा संपला. कार्यक्रमाचे संयोजकही हॉटेलच्या दारात उभे राहिले. मी त्याच्याशी बोलतच होतो; पण अनेक घटनांची उदाहरणं देऊन 'सौंदर्य शाप कसं ठरतं,' हेच तो सांगत होता. विधायक बाजू समजून घेण्याच्या मानसिकतेत तो नव्हता. 'आम्हा गुन्हेगार जातीला कशासाठी देव देतो सौंदर्य..? त्याच्याऐवजी भाकरी द्यायची... इज्जत द्यायची,' असं जेव्हा तो म्हणाला, तेव्हा कुणीतरी थोबाड फोडून काढतंय, असं वाटायला लागलं. स्थिर समाजात आपण जन्माला आलो, ही आपली चूक तर झाली नाही ना, असं एक अपराधी मनही तयार होऊ लागलं. त्याचे सगळे प्रश्‍न निरुत्तर करणारे आणि पडलंच उत्तर बाहेर, तर ते त्याला न पटणारं...! 

आम्ही बाहेर पडलो. पोरगी पुन्हा धावत आली. ती पुन्हा सेल्फीचा आग्रह धरणार तोच मी म्हणालो :''हे बघ बेटा, मोबाईल खूप वापर; पण सीक होऊ नको. फोटोसीकही होऊ नको.'' 

मी संयोजकांबरोबर चालू लागलो. पुढं गाव सोडतानाही ते कुटुंब नजरेसमोर उभं राहू लागलं. 'डोळे मोडीत राधा चाले' या अण्णा भाऊंच्या कादंबरीत असाच काहीसा प्रसंग आहे. रस्त्यावर तारेवर नाचणाऱ्या, चौफुलीवर नाचणाऱ्या अनेक देखण्या बायांच्या बाबतीत असे कटू प्रसंग आल्याचं मी अनेकदा ऐकलं होतं. वाचलं होतं. कोल्हापूरजवळ दारावर भिकेसाठी गेलेल्या एका देखण्या मुलीवर बलात्कार करून तिला थेट गाडून टाकण्यात आलं होतं. मुलीच्या नातेवाइकांना घेऊन एका मोठ्या पोलिस अधिकाऱ्याकडं न्याय मागायला गेलो होतो. त्यानं आमचा कागद हसतमुखानं घेतला आणि म्हणाला : ''आपापल्या पोरींना नीट वागायला शिकवा. नखरे करायला लावू नका.'' 

अधिकाऱ्याचं उत्तर ऐकून आश्‍चर्य वाटलं होतं. भीक मागणारी पोरगी नखरे कशी करत असेल, हे काही कळायला मार्ग नव्हता. 'घराबाहेर पडायचं नाही, तर भीक कशी मागणार?' हा पोरीच्या वडिलांसमोर प्रश्‍न... शाळेत असताना शिक्षक 'सौंदर्य : शाप की वरदान?' यावर निबंध लिहायला सांगायचे... वाद-विवाद घडवत राहायचे... आम्ही काही जण कुरूप, काळे होतो... सौंदर्याच्या बाजूनं बोलायचो... आणि आता हे समोर चक्रव्यूहात सापडलेलं सौंदर्य... पालकाच्या आणि स्वत:च्याही काळजाचे ठोके वाढवणारं... वेदना निर्माण करणारं सौंदर्य...ही वेदना संपवणारं पेनकिलर कुठं आलंय अजून... 

अजूनही बऱ्याच जाती भटकं जीवन जगतात. त्यांना गाव-घर नाही. त्यांच्यासाठी सुरक्षितता, प्रतिष्ठा काहीच नाही. सगळी व्यवस्था जणू काही गुलाम असल्यासारखी वागते. त्यांच्या स्त्रियांसाठी असुरक्षितता तयार होणं, हीसुद्धा काही नवी गोष्ट नाही. ज्ञानाच्या, स्थैर्याच्या जगात येण्यासाठी छोटं-मोठं पाऊल टाकणाऱ्यांना व्यवस्था पाठिंबा देणार की नाही...व्यवस्थेत येणाऱ्याला ती सुरक्षित बनवणार की असुरक्षित...? सौंदर्याला आनंद बनवणार की जोखीम...? असे अनेक प्रश्‍न चहा घेता घेता निर्माण झाले. आपली व्यवस्था सुरूप असेल तरच तिथं कुणालाही निर्भयपणे जगता येतं...अगदी गुन्हेगार जातीत परी म्हणून जन्माला आलेल्या पोरीलासुद्धा. मात्र, हे आपल्यालाच सिद्ध करावं लागेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com