पैशाचे मोल

dr datta kohinkar
मंगळवार, 12 जुलै 2016

अमेरिकेहून मुलगा व सून भारतात आले व आपल्याबरोबर आई-वडिलांनी अमेरिकेतच स्थायिक व्हावे म्हणून प्रेमाने, गोडीगुलाबीने बोलत त्यांना त्यांचा बंगला विकावयास लावला. त्याचे सगळे पैसे स्वतःच्या बॅंकखात्यात भरले व विमानतळावर आई-वडिलांना नेऊन त्यांना तेथेच सोडून दोघेही अमेरिकेला निघून गेले. एका समाजसेवकाच्या मदतीने हे वृद्ध जोडपे आज अनाथाश्रमात दिवस काढत आहे. दुसरी घटना - केतकी वेळ घेऊन भेटायला आली होती. ‘पैसे कमव. तुला जे करायचं ते कर; पण पैसे आण,’ असे म्हणून तिचा नवरा त्रास देत होता. हे सांगताना तिचे डोळे पाणावले होते.

अमेरिकेहून मुलगा व सून भारतात आले व आपल्याबरोबर आई-वडिलांनी अमेरिकेतच स्थायिक व्हावे म्हणून प्रेमाने, गोडीगुलाबीने बोलत त्यांना त्यांचा बंगला विकावयास लावला. त्याचे सगळे पैसे स्वतःच्या बॅंकखात्यात भरले व विमानतळावर आई-वडिलांना नेऊन त्यांना तेथेच सोडून दोघेही अमेरिकेला निघून गेले. एका समाजसेवकाच्या मदतीने हे वृद्ध जोडपे आज अनाथाश्रमात दिवस काढत आहे. दुसरी घटना - केतकी वेळ घेऊन भेटायला आली होती. ‘पैसे कमव. तुला जे करायचं ते कर; पण पैसे आण,’ असे म्हणून तिचा नवरा त्रास देत होता. हे सांगताना तिचे डोळे पाणावले होते. अजून एक घटना - रूपेशला घटस्फोट देण्यासाठी त्याच्या पत्नीने लाखो रुपयांची मागणी करून त्याला बेजार केले होते. या सर्व उदाहरणांवरून पैशासाठी आई-वडील, पत्नी-पती या पवित्र नात्यांना काळिमा फासला गेल्याचे स्पष्ट होते. काही लोक म्हणतात - ‘‘काय पैसा पैसा करतोस? मेल्यानंतर वर नेणार काय?’’ पण हेही तितकेच खरे आहे. जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो, तोपर्यंत त्याच्याजवळचा पैसा त्याला प्रत्येक क्षेत्रात वर नेत असतो. गरीब माणसाला समाज दूर ठेवतो. श्रीमंत माणसाला समाजात लौकिक असतो. गोवर्धनदास म्हणाले होते, ‘‘मी जन्म कुठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते, त्यामुळे मी गरीब घरात जन्म घेतला; तरी मी गरीब म्हणून मरणार नाही.’’ 

खरोखर मित्रांनो, शेवटी सगळ्या गोष्टी पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे अर्थतज्ज्ञ म्हणतात- ‘‘रुपयाचा हिशेब ठेवाल काटेकोर, तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्‍वर.’’ त्यामुळे आयुष्याचे गणित सहज सोडविण्यासाठी पैशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या जगात सगळ्या गोष्टी भरलेल्या पोटानेच होतात; पण खरोखर सगळ्याच गोष्टी पैशाने मिळवता येतात काय, यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे. पैशासाठी लोक जात-धर्म सोडतात, स्वकियांना धोका देतात, आत्मसन्मान गहाण ठेवतात. खोट्याला खरे म्हणतात, गुन्हा करतात, जीव घेतात, नाती सोडतात, वाट्टेल ते करतात. येथूनच दुःखचक्राला सुरवात होते.

मित्रांनो, पैसा महत्त्वाचा आहेच; पण पैशाने आपण घर घेऊ शकतो; पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशाने औषध आणू शकतो; पण आपण आपले वय वाढवू शकत नाही. पैशाने घड्याळ मिळते; पण गेलेली वेळ मिळविता येत नाही. पैशाने मोठे पद मिळते; पण मनापासूनचा आदर मिळविता येत नाही. पैशाने आपण मखमली गादी घेऊ शकतो; पण शांत झोप मिळत नाही. पैशाने आपण पुस्तके विकत घेऊ शकतो; पण विद्या नाही. पैशाने रक्तही विकत मिळते; पण कोमजून गेलेले जीवन नाही. तेव्हा पैसा अवश्‍य कमवा; पण चांगल्या मार्गाने कमावलेल्या पैशापैकी दहा टक्के रक्कम दानधर्मासाठी खर्च करा व नाती-मैत्री व धन यांचा सुरेख संगम साधा.

Web Title: the value of money