विरोधकांनी राखले; सत्ताधाऱ्यांनी गमावले (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल तसे अपेक्षेप्रमाणे लागले असले, तरी कोकण शिक्षक मतदारसंघात सत्तारूढ भाजपला पराभव चाखावा लागणे अनपेक्षित म्हणावे लागेल. भाजपने विधान परिषदेत जनसंघाच्या काळापासून शिक्षक संघटनांना पाठिंबा देण्याचा परिपाठ आखला. तो आजतागायत कायम ठेवला. परंतु मोते गुरुजींना उमेदवारी नाकारून भाजपप्रणीत आघाडीने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला. परिवारातील वादाचा लाभ घेत शेतकरी कामगार पक्षाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत उमेदवार बाळाराम पाटील विजयी झाले.

कोकणातील अलिबाग टापूत पाय पसरलेल्या शेकापची परिषदेतील संख्या वाढल्याचा भाई जयंत पाटील यांना नक्‍कीच आनंद झाला असणार. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या निर्णयांचा विरोध केल्याने ही जागा गमवावी लागली काय, याचा आता भाजप परिवार विचार करेल हे निश्‍चित. बाकी चारही जागांचे निकाल अपेक्षेप्रमाणेच लागले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने परस्परांना साथ देत नाशिक पदवीधर येथे सुधीर तांबे (कॉंग्रेस) आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांना निवडून आणले. हे दोघेही सदस्य परिषदेच्या कामकाजात मोलाची भर टाकू शकतील.

शतप्रतिशत भाजपचे स्वप्न सध्या ताकदीनिशी अमलात आणण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात सुरू असले तरी संघटनात्मक बांधणी असलेल्या जागात अद्याप पक्षाचा शिरकाव झालेला नाही. नागपूर शिक्षक मतदारसंघात तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण झाल्या होत्या; मात्र शांत निरलस कार्यकर्त्याच्या भूमिकेत असलेल्या गाणार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. या पाच निकालातला सर्वाधिक महत्त्वाचा विजय आहे तो गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा. व्यवसायाने शल्यविशारद असलेले पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यांची खात्यावरील पकड लक्षणीय आहे. मात्र मतदारक्षेत्रातील नाराज मंडळी त्यांच्यावर सातत्याने आरोप करत असत. संजय खोडके या जुन्या कार्यकर्त्यावर हजारोंच्या फरकाने मात करून निवडून आलेले पाटील आता खात्यावर लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा..

Web Title: vidhan parishad polls : marm article