विघ्नहर्ता आणि विघ्नकर्ते!

विघ्नहर्ता आणि विघ्नकर्ते!

जीविकेला आवश्‍यक ठरणारे यच्चयावत घटक गणरायाच्या दैवमत्वात स्थापित आहेत. त्याचे हे वैशिष्ट्यपूर्ण रूपच जगात असंख्य लोकांना भावते. हा उत्सव अधिकाधिक सर्जनशील आणि कलात्मक कसा होईल, हे पाहणे ही त्या दैवताची आराधनाच होय.

परमेश्‍वरी शक्‍तीने सर्वारंभी जे पहिले रूप घेतले तो नादात्मक ॐकार होता, असे पुराणांत तरी म्हटले आहे. हे ॐकारस्वरूप गणेशाचे हे प्रकटणे म्हणजे दैवी शक्‍तीचे साकाररूप. अथर्वशीर्षात ह्याच दैवताला "त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि‘ असेच म्हटले आहे. म्हणजेच गणपती हा आदिदेव आहे. तो बुद्धिदाता आहे. तो शिष्य आहे आणि गुरूदेखील. तो ज्ञानमय आहे, विज्ञानमयदेखील आहे. म्हणूनच की काय, दूरस्थ अमेरिकेत एखाद्या माहिती तंत्रज्ञानास वाहिलेल्या कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याच्या मेजावरील संगणकावरचा स्क्रीनसेव्हर गणराय असतो. जागतिक पातळीवर आवडून गेलेले हे एक भारतीय दैवत. शिवाय इतके "अपडेटेड‘, कालानुरूप बदल स्वीकारणारे दैवत अवघ्या पृथ्वीतलावर अस्तित्वात नसेल. कालानुरूप त्याचेही रूप बदलते. म्हटला तर देव, नाहीतर कलात्मक रचनाकृती. तो चित्रदेखील आहे आणि अक्षरही. अवघ्या एका रेषेतही तो दृग्गोचर होऊ शकतो आणि रत्नजडित सुवर्णलंकारांसहित तपशीलासह समूर्त होतो. मुळात गणेश हाच एक अमूर्त घाटाचा आकार. कलावंताच्या प्रतिभेची स्पंदने तो सहजी स्वत:मध्ये सामावून घेतो. असा हा अमूर्त देव चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी आहे. तो नृत्यनिपुण आहे. चित्रकर्ता आहे. संगीतसाधक आहे आणि मुख्य म्हणजे लेखकही आहे. थोडक्‍यात, जीविकेला आवश्‍यक ठरणारे यच्चयावत सर्व घटक गणरायाच्या दैवमत्वात स्थापित आहेत. भक्‍तांकडून कोडकौतिक करून घेणे त्याला आवडते. त्याला आवडणाऱ्या प्रसादाचे नावही मोदक, म्हणजे बघा! म्हणूनच या आदिदेवाच्या उत्सवासाठी कुठलीही कमतरता राहणे मराठीजनांना बिलकुल रुचत नाही. गणपतीचे आगमन, त्याची तयारी, त्याची साग्रसंगीत पूजाअर्चना, आरत्यांची माळ, ढोल-ताशांचा गजर आणि ज्याच्यात्याच्या घरच्या परंपरेनुसार श्रीगणेशाचे विसर्जन, हे ठरल्याप्रमाणे पार पडलेच पाहिजे. दहा-अकरा दिवसांचा हा भारलेला काळ सुरू झालेला आहे. रक्‍तगंधाने अनुलिप्त असलेल्या या लोभस दैवताचे मांगल्यच इतके संसर्गजन्य आहे की, त्याचा थोडाफार उत्सवी शेंदूर सर्वांना बोटभर तरी लागतोच. 

 
ज्येष्ठ-आषाढात मेघांनी पाऊसपाण्याच्या पखाली ओतून धरित्रीला तुष्ट-पुष्ट केले की लागलीच श्रावणाचा झिम्मडझिम्मा सुरू होतो. श्रावण तसा व्रतवैकल्यांनी गजबजलेला महिना; पण त्याच सुमारास मराठी भाविक मनाला वेध लागलेले असतात भाद्रपदात येणाऱ्या गणरायाच्या आगमनाचे. नभाने भुईला दान दिले की भुई तेच भरभरून सहस्रहस्तांनी आपल्या लेकरांना वाटून टाकते. अशा वाटावाटीच्या उदार काळात गणराय येतात. युगानुयुगे हे असेच चक्र चालू आहे. अवकाळ असो, दुष्काळ असो, गणरायाच्या उत्सवाला नख लागत नाही. आपण ते लागू देत नाही. दीड दिवसांसाठी का होईना, गणपतीबाप्पांनी यावे, घरदार आशीर्वचनांनी भरून जावे. इडापीडेचा समूळ नाश होऊन वांकुडे झालेले सारे बैजवार व्हावे, ही मनोमनींची प्रार्थना असते. दोन वर्षे ओढ दिल्यानंतर औंदा पाऊसपाणी ठीक झाले आहे; पण महागाईच्या दुष्टचक्रातून अद्याप सुटका झालेली नाही; पण पाचवीला पुजलेली ही सवयीची विघ्ने सोडली तर सुदैवाने यंदा समाजमन दुखवणाऱ्या विशेष खोल जखमा तरी झालेल्या नाहीत; पण अशाच काळात लाडक्‍या दैवताचे यजमान म्हणून आपल्यावर काही विशेष जबाबदाऱ्या येतात.
इतक्‍या सुरेल दैवताचे आतिथ्य दणदणाटी कर्णकटू गाण्यांनी करणे, हा मानभंग झाला! उत्सवाचा उत्साह समजून घेण्यासारखा असला तरी, या उत्साहाने अतिउत्साहात मर्यादाभंग केला की त्याचे उपद्रवात रूपांतर होते. बाप्पाचे आगमन आणि त्याचा मुक्‍काम सुरेल संगीताने व्हावा, एवढे पथ्य पाळू या. बऱ्याच सार्वजनिक मंडळांनी सामाजिक, प्रबोधनपर उपक्रम पार पाडून उत्सवाची शान वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तरीही काही गोष्टींचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. कानाचे पडदे फाडणारे दणदणाटी ध्वनिक्षेपक, फिल्मी गाण्यांचा तुफानी मारा आणि मिरवणुकीच्या निमित्ताने वाढणारे समाजा-समाजातले प्रदूषण अशा समस्यांनी वातावरण उगीचच तापते. लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा घालून दिली, तेव्हा समाजातील विस्कळित घटकांना एकत्र आणण्याची संधी म्हणून त्याकडे पाहिले जात होते. तेव्हा अर्थात लाउडस्पीकर आणि वाहतूक अडवणारे मांडव किंवा वर्गणीची झूल पांघरून उकळलेली खंडणी, असले प्रकार नव्हते. गेल्या काही वर्षांतच झालेले हे स्थित्यंतर आहे. कोटी-कोटींची माया जमवणारे नवसाचे गणपती व्हीआयपी लोकांसाठी वेगळे प्रवेशद्वार आणि आतिथ्य दाखवतात, तेव्हा त्याच मांडवातला तो गणनायक हतबल ठरतो. तेव्हा आपण साऱ्यांनी मिळून सुसंस्कृतपणे या दैवताची आराधना केली तर त्यात भले आपलेच आहे. सार्वजनिक मांडवांबरोबरच, घरोघरी गणेशमूर्ती विराजमान होतील. दीड दिवस ते पार अनंत चतुर्दशीपर्यंत त्यांचा मुक्‍काम असेल. मूर्त शक्‍यतो पर्यावरणप्रेमी असू द्या, नाहीतरी पुराणांत मृत्तिका प्रतिमेचे पूजनच शास्त्रोक्‍त मानले गेले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस नव्हे. मूर्तींचे विसर्जन सार्वजनिक जलाशयांमध्ये करणे निक्षून टाळू या. विघ्नहर्त्या वरदविनायकाचे आपणच स्वागत करायचे आणि आपणच त्याच्यासमोर विघ्न म्हणून उभे ठाकायचे, हे आणखी किती वर्षे चालणार? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com