पहाटपक्षी

पहाटपक्षी

उन्हाळ्याच्या सुटीत २-३ दिवसांसाठी बहिणीच्या घरी यवतमाळला गेलो. सुटी, उन्हाळा, रजेचा आनंद सर्व मिळून एकत्र परिणाम झाला. तसेही कामाची जागा नसली, उठून ऑफिसला जायचे नसले... जेवणाखाण्याची चिंता नसली, की थोडे लोळूया. आराम करूया... असा मूड येतो. उन्हाळ्यात सूर्योदय लवकर होतो. सात वाजता उठतो, तेव्हा बाहेर लख्ख प्रकाश पडला होता. बहिणीची घरची कामे सुरू होती. मेव्हणे चहा घेत पेपर वाचत होते. मला जरा संकोचल्यागत झाले. ‘‘अरे वा! तुम्ही उठून आवरलेलं दिसतंय,’’ मी म्हणालो. तर ते म्हणाले, ‘‘नुसतं आवरलं नाही, तर फिरूनसुद्धा आलो.’’ ‘‘म्हणजे... उठता किती वाजता तुम्ही?’’ मी विचारले. ‘‘पक्ष्यांबरोबर’’ ते म्हणाले. पहाटे पाचपूर्वी पक्षी उठतात. त्यांचे गुंजन-कुजन सुरू होते. नैसर्गिक जीवन जगणारे निसर्गाबरोबर उठतात. निसर्ग पहाटे जागा होतो. पृथ्वीला सूर्याची चाहूल लागते. त्याच्या आगमनाची प्रतीक्षा तिच्या मनात हुरहूर आणि चेहऱ्यावर आरक्तपणे आणते. कळ्या उमलतात. पहाटेचा गारवा वाऱ्याबरोबर जाणवतो. पूर्व दिशा लालसर होते. याला तांबडं फुटणं म्हणतात. बाहेर येऊन खोलवर श्‍वास घ्यावासा वाटतो. रात्र आणि दिवस यांना जोडणारी वेळ म्हणजे संध्याकाळ. हा काळ ध्यानासाठी, अध्ययनासाठी, साधनेसाठी, व्यायामासाठी उत्तम समजला गेला आहे.

बहिणीकडे ते दोघेही पहाटे उठतात. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची सुदर्शनक्रिया करतात. मग पाऊण तास चालत फिरून येतात. पक्ष्यांसाठी दाणा-पाणी ठेवतात. खारुताईसाठी वेगळ्या डोलीत अन्न ठेवतात. बगीच्यातला कचरा काढणे, झाडांना पाणी देणे, हे सर्व सकाळी सातपर्यंत आटोपले असते.

‘‘उद्या मला पण उठवाल बरं... मी पण येईन.’’ मी म्हणालो. पक्ष्यांबरोबर उठणारे ‘पहाटपक्षी’ इतर लोकांपेक्षा रोज दोन तास अधिक जगतात. इतर लोक उठण्यापूर्वी त्यांची दिवसभराची योजना झाली असते. त्यांची ‘एनर्जी लेव्हल’ इतरांपेक्षा अधिक असते. कामांचा उरक जलद असतो. स्वभाव उद्यमी, वक्तशीर आणि व्यवस्थित असतो. काम करताना उत्साह व प्रसन्नता असते. मनमोकळेपणा असतो. निसर्गाशी तार जुळवून दिवसाची सुरवात करणारे लोक इतरांच्या तुलनेत स्वभावाने शांत व स्थिर होतात. 

आमचे एक काका सांगायचे, की जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरातून निद्रा-आळस बाहेर पडतो आणि जे लोक झोपलेले असतात, त्यांच्या शरीरात तो घुसतो. काम टाळण्याकडे त्यांचा कल होतो. आयतोबासारखा त्यांचा स्वभाव होतो. पहाटे उठणे याचा अर्थ ‘झोपेचे तास कमी करा’ असा नव्हे, तर लवकर आणि वेळेवर झोपा- पुरेशी झोप घ्या आणि पहाटे उठा, असा आहे. काही लोक म्हणतील, आम्ही रात्री जागतो. उशिरापर्यंत काम करतो अथवा वाचतो. त्यामुळे पहाटे उठणे शक्‍य नसते. त्यांनी हे लक्षात ठेवावे, की आपण सोन्याचे तुकडे देऊन त्याच्या बदल्यात लोखंडाचे तुकडे घेत आहोत. थोडा प्रयत्न करून पहाटपक्षी होऊन पाहा! तुम्हालाच फरक जाणवेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com