सावधगिरी

सावधगिरी

जपानमधील तलवारकला, ज्यूदो, कराटे, तॉयक्वांदो वगैरे विषय मूलतः आध्यात्मिक साधना म्हणून उदयास आले. शरीरसाधना करून शरीरापलीकडे जाणे आणि अंतरात्म्यात शिरून परम तत्त्वांशी संवाद साधणे, यासाठी शरीर विजय म्हणून या कला विकसित झाल्या. मार्शल आर्टवर निघालेल्या सिनेमांनी त्याला मारपीट करण्याची कला म्हणून दाखवले असले, तरी त्यासाठी ही कला नव्हती. सामुराई म्हणजे दुधारी जपानी तलवार... योद्धा तलवार फिरवण्याच्या कलेतून एकाग्रता वाढविणे... त्याच्या अणुकुचीदार पात्याने मायेचे कवच भेदून ध्यानाच्या प्रदेशात प्रवेश करणे यासाठीचे साधन म्हणून सामुराई साधना होती. एक शिष्य सामुराई शिकण्यासाठी गुरूकडे गेला. गुरू म्हणाले, ‘प्रत्यक्ष तलवार हाताळणे नंतर शिकवू... प्रथम तुझी सावधगिरी वाढायला हवी. जेवताना, स्नान करताना, रोजची कामे करताना... अगदी झोपतानासुद्धा आणि झोपेतही तू सावध असायला हवे. ही सावधगिरी तुझ्यात यावी म्हणून आपण असे ठरवू, की मी कधीही मांजरीच्या पावलाने तुझ्याजवळ येऊन तुला रट्टा हाणीन. तू सावध असलास, तुला माझी चाहूल लागली, तर तू ‘‘मी जागा आहे’’ असे म्हणायचे... मग मी निघून जाईन. पण तू असे म्हणाला नाहीस, तर मार खायची तयारी ठेव...’’

तीन-चार वेळा थपडा खाल्ल्यानंतर तो सावध झाला. ‘मी जागा आहे’ म्हणू लागला. गुरू दबकत यायचे, पण ‘मी जागा आहे असे’ वाक्‍य ऐकल्यानंतर ते निघून जायचे. सामुराई योद्‌ध्याची सावधगिरी वाढली. थपडा बंद झाल्या. ‘‘आता तलवारबाजी सुरू करूया,’’ तो गुरूला म्हणाला. गुरू म्हणाले, ‘‘नाही... इतक्‍यात नाही... आता मी दंड घेऊन येणार. दंडाने फटका मारणार. तू सावध हवास... ‘‘थापड मारायला जवळ जावं लागायचं. पावलाची चाहूल लागायची. दंड तर दुरूनही मारता यायचा. सर्रकन वळ उमटायचा. डोक्‍यात झिणझिण्या यायच्या. संताप व्हायचा, पण त्याचे रूपांतर तो सावधगिरीत करीत असे. हळूहळू त्याला गुरू जवळ येताच त्यांचा गंध येई. तो लगेच ‘‘मी जागा आहे,’’ असे म्हणे. गुरू परत जात. झोपेतसुद्धा त्याला चाहूल लागत असे. आपल्या आतली काही सुप्त दालने उघडत असल्याचा त्याला भास होऊ लागला. निरंतर काही दिवस दंड प्रहाराविना काढल्यानंतर तो तलवारीसाठी गुरूला म्हणणार, तेवढ्यात गुरूने हातात तलवार घेतली. म्हणाले, ‘‘साधनेच्या तीव्र टोकावर तुला यायचे आहे.’’ आता मी तलवारीने घाव घालेन. आपला मंत्र तोच आहे, ‘मी जागा आहे’ म्हणालास... तर मी निघून जाईन.’’ सप्पकन्‌ तलवार कापायची. रक्ताची चिळकांडी उडायची. मनात आगडोंब उसळायचा. ‘‘शिकायचे म्हणून सहन करतोय. हा माणूस शिकवत तर नाहीये अन्‌ जखमा घालतोय. जखमा करतोय. कशासाठी सहन करतोय मी हे. हा खरंच योग्य आहे काय? मला इतक्‍या निर्दयपणे फटके देणारा, जखमा देणारा... हा स्वतः इतका सावध आहे काय? याच्या डावाची थोडी मजा यालाही दाखवावी,’’ त्याची नजर गुरूकडे गेली. गुरू निजले होते. त्या अवस्थेत त्यांच्यावर वार करण्याचा विचार त्याच्या मनात आला. तलवारीच्या दिशेने त्याने पाऊल उचलले... आणि लगेच गुरूचा आवाज कानावर आला... ‘‘ए! मी जागा आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com