मुकद्दर का सिकंदर (श्रध्दांजली)

vinod khanna
vinod khanna

सत्तरचे दशक सुरू होण्याच्या आधीच रुपेरी पडद्यावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या विनोद खन्नाने दीर्घकाळ आपला प्रभाव राखला. हे सोपे नव्हते याचे कारण एकापेक्षा एक सरस नायकांची मांदियाळीच चित्रपट क्षितिजावर तळपत होती. "मेरे अपने' या चित्रपटातील एक प्रसंग...कथेचा शाम हा बेरोजगार नायक "आपकी दुआसें सब ठीक ठाक है,' असं सर्व समाजावरच आपला राग काढतो आहे. पुढच्याच प्रसंगात त्याची कॉलेजमधील मैत्रीण आपल्या पतीबरोबर गल्लीतून जाते आणि गंभीर होत हा नायक "कोई होता जिसको अपना, हम अपना कह लेते यारों,' हे गीत गाऊ लागतो...

अभिनयाची ही दोन टोकं तितक्‍याच तन्मयतेने दाखवणारा हा नायक होता. दिग्दर्शक गुलजार यांनी या "खलनायका'तील नायकत्व बरोबर ओळखलं होतं. उमदं व्यक्तिमत्त्व, संथ आणि भारदस्त आवाजातील संवादफेक यांच्या जोरावर त्यांची कारकीर्द बहरास आली. "एक बेचारा', "परिचय' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या व पुढच्या टप्प्यात सुहृद डाकू, इन्स्पेक्‍टर, वकील अशा भूमिकांत त्यांनी अभिनयाची कमाल दाखवली. त्यांच्या कारकिर्दीला पुन्हा एकदा कलाटणी दिली गुलजार यांच्याच "अचानक' या चित्रपटानं. सैन्यदलातील मेजर रणजित खन्ना ही त्यांनी साकारलेली भूमिका दीर्घकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. "परवरीश' या 1977मध्ये प्रदर्शित चित्रपटापासून त्यांची जोडी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जुळली. "अमर अकबर अन्थोनी' व "मुकद्दर का सिकंदर' हे चित्रपट सुपरहिट ठरले. त्या काळात अमिताभ बच्चन यांच्याइतकेच, किंबहुना अधिक फॅन्स विनोद खन्ना यांचे होते. मात्र, कारकीर्द बहरात असताना ते 1980मध्ये पुण्यातील ओशो रजनीश आश्रमात दाखल झाले. त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच होता. 

विनोद खन्ना यांनी पाच वर्षं आश्रमात काढल्यानंतर पुनरागमन केलं व अनेक धडाकेबाज भूमिका साकारल्या. यात फिरोज खान दिग्दर्शित "दयावान' व श्रीदेवीबरोबरचा "चांदनी' गाजले. या टप्प्यावर पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरत त्यांनी 1997मध्ये राजकारणात प्रवेश केला व भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले, मंत्रीही झाले. ध्यानधारणा व व्यायामातून आपलं व्यक्तिमत्त्व रुबाबदार ठेवत ते शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. त्यामुळंच गेल्या महिन्यात दुर्धर आजारपणामुळं कृश झालेले विनोद खन्ना पाहिल्यावर त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले. शेवटी या आजारानंच त्यांचा घास घेतला. "मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटातील शेवटच्या प्रसंगात "मरके जिने की अदा जो दुनिया को सिखलाऐगा, ओ मुकद्दर का सिकंदर कहेलाएगा' हे शब्द त्यांच्या तोंडी आहेत...हेच शब्द त्यांनी आपल्या बहुआयामी जगण्यातून सिद्ध करून दाखवले... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com