अतिरंजन आणि स्मरणरंजन...

vishram dhole
vishram dhole

नवे पर्याय, नावीन्याचा अभाव आणि बदललेल्या सांस्कृतिक वातावरणाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे दूरदर्शनची पीछेहाट झाली. खासगी वाहिन्यांमुळे होणाऱ्या अतिरंजनाच्या पार्श्वभूमीवर ‘सत्यम्‌, शिवम्‌, सुंदरम्‌’ हे उत्तम बोधवाक्‍य मिरविणारे दूरदर्शन आज मुख्यत्वे स्मरणरंजनातच उरावे हे दुःखद आहे.

सा ठी जवळ आली की नोकरी करणाऱ्या व्यक्तीला निवृत्तीचे वेध लागतात. आवराआवर सुरू होते. कामातला उत्साह जातो. जुन्या उमेदीचे दिवस आठवू लागतात. स्मरणरंजनाला सुरवात होते. व्यक्तीच्या बाबतीत हे ठीकही आहे; पण संस्थांच्या बाबतीत साठी हा काही निवृत्तीचा काळ नाही. संस्थांचे आयुष्य मोठे. म्हणून उमेदीचा काळही मोठाच. त्यादृष्टीने खरेतर साठी हा संस्थांसाठी नव्या संकल्पांचा काळ. पण साठीला येत असलेल्या दूरदर्शन या संस्थेची आजची एकूण मनोवस्था बघितली तर तिने मनाने केव्हाच निवृत्ती स्वीकारली असावी, असे वाटते.
दूरदर्शनची स्थापना झाली १५ सप्टेंबर १९५९ रोजी; पण ऐंशीच्या दशकापर्यंत दूरदर्शनचा विस्तार मर्यादित होता आणि प्रभावही किरकोळ. सारे प्रक्षेपण कृष्णधवल. कार्यक्रमही मोजके. माहिती, मनोरंजन, शिक्षण वगैरे मिळून फक्त चार-पाच तासांचा खेळ आणि साऱ्यांवर बऱ्यापैकी सरकारी छाप. ऐंशीच्या दशकात चित्र वेगाने बदलले. म्हणजे सरकारी मालकी आणि तोंडवळा गेला नसला, तरी त्या मर्यादांमध्ये राहूनही दूरदर्शनचा विस्तार होत गेला. ‘एशियाड’च्या निमित्ताने १९८२ मध्ये दूरदर्शन रंगीत झाला आणि मग पुढच्या आठेक वर्षांमध्ये दूरदर्शनने वेगाने आणि कार्यक्षमतेने देशभर छोट्या-मोठ्या प्रक्षेपण केंद्रांचे जाळे विणले. भौगोलिक सीमा आणि प्रेक्षकांची संख्या वाढू लागली, तसे कार्यक्रमांची संख्या आणि स्वरूपही बदलत गेले.

‘हमलोग’च्या रूपाने पहिली भारतीय मनोरंजन मालिका आली. पुढे ‘बुनियाद’ आली. ‘नुक्कड’ आली. ‘रामायण’, ‘महाभारत’ने तर लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. ‘आमची माती आमची माणसं’सारख्या प्रादेशिक भाषेतल्या आणि मातीतल्या कार्यक्रमांपासून ते ‘क्विझ टाइम्स’सारख्या इंग्रजी आणि उच्चभ्रू कार्यक्रमांपर्यंत अनेक वैविध्यपूर्ण व दर्जेदार कार्यक्रमांची मोठी मांदियाळीच प्रेक्षकांनी अनुभवली. मर्यादित स्वरूपात आणि सरकारी पद्धतीने ‘शुचिर्भूत’ असल्या तरी टीव्हीवरच्या बातम्यांची नवलाई आणि ताकदही या काळात अनुभवता आली. त्यादृष्टीने पाहिले तर १९८२ ते ९२ हा काळ म्हणजे दूरदर्शनचा सुवर्णकाळ. खासगीकरण, जागतिकीकरणाचे दरवाजे खुले होण्याच्या आधीच्या काळात शहरांमध्ये उदयाला येत असलेल्या नवमध्यम, मध्यम आणि उच्चमध्यम वर्गांचे मनोविश्व दूरदर्शनने व्यापून टाकले होते. त्या वर्गातून आलेल्या आणि आज चाळीशी पार केलेल्या बहुतेकांचे वैयक्तिक आणि सामाजिक स्मरणरंजन दूरदर्शनच्या मालिका, त्यातली पात्रे, बातम्या, त्यांचे निवेदक, त्या वेळच्या जाहिराती याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.  पण दुर्दैव असे, की साठीला येत असलेले दूरदर्शन आज फक्त या चाळीशीनंतरच्या पिढ्यांच्या स्मरणरंजनातच खऱ्या अर्थाने जिवंत आहे. बाकी दूरदर्शन आज शहरीच नव्हे, तर ग्रामीण प्रेक्षकांच्याही दैनंदिन पाहण्याच्या यादीत उरलेले नाही. टीव्हीच्या प्रेक्षकांचा कल मोजणाऱ्या ‘बार्क’ या संस्थेची रेटिंगची ताजी यादी तपासली; तर कोणत्याही कार्यक्रम प्रकारात दूरदर्शन आज पहिल्या दहातही येत नाही. थोडा अपवाद करायचाच तर रात्री नऊ वाजताच्या इंग्रजी बातम्यांचा. बाकी सारा कोरा पडदा. एखादी कर्तृत्ववान व्यक्ती निवृत्तीनंतर पार विस्मरणात जावी, तसे झालेय दूरदर्शनचे.हे अर्थातच एका रात्रीत घडलेले नाही. दूरदर्शनच्या या स्थितीमागची पाळेमुळे त्याच्या सुवर्णकाळापर्यंतही शोधता येतात. आपली लोकप्रियता मुख्यत्त्वे टीव्ही माध्यमाचे नावीन्य आणि पर्यायांचा अभाव यामुळे आहे, हे दूरदर्शन चालविणारे मंत्रालय आणि ‘मंडी हाउस’च्या बड्यांनी लक्षातच घेतले नाही. नव्वदीच्या सुरवातीपर्यंत ही आत्ममग्नता आणि सरकारी वृत्ती खपूनही गेली. नव्वदीच्या सुरवातीला केबल आणि सॅटेलाइट वाहिन्या दिसू लागल्या. १९९२ मध्ये ‘झी’ आणि ‘सन’च्या रूपाने भारतीय खासगी वाहिन्यांचे युग सुरू झाले.

दूरदर्शनच्या बाहेरही टीव्ही असतो हे प्रेक्षकांना कळले, तशी दूरदर्शनच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. एरवी मध्यमवर्गाच्या निष्ठा तशाही डळमळीत असतात. जरा बरा पर्याय मिळाला की हा वर्ग गेला तिकडे. अनालॉग सिग्नल होते, डीटीएच नव्हते, खासगी वाहिन्या केबल ऑपरेटरवर विसंबून होत्या, तोवर दूरदर्शनने आपल्या भूकेंद्री प्रक्षेपण आणि अँटिनाकेंद्री फुकट वितरण व्यवस्थेवर आघाडी कशीबशी टिकवलीही; पण हे बदलत गेले तसतसे दूरदर्शनचे एकेक बुरूज ढासळत गेले. बातम्यांवरच्या मक्तेदारीला तर आधीच आव्हान मिळाले होते. चोवीस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या आल्या, तेव्हा तर सरकारी संस्कारातील दोन-तीन बातमीपत्रे देणाऱ्या दूरदर्शनची मोठीच पीछेहाट झाली. दूरदर्शनसाठी उत्तम काम केलेले, आतले आणि बाहेरचे निर्माते व कलाकार ‘मंडी हाउस’मधील बजबजपुरीला कंटाळून दूर होत गेले. पुढे ‘सारेगमप’, ‘कौन बनेगा करोडपती’, ‘सास भी कभी बहू थी’सारख्या कार्यक्रमांनी तर दूरदर्शनला मनोरंजनाच्या स्पर्धेत फारच मागे ढकलले. डीटीएच पसरत गेले आणि स्वस्त होत गेले, तसे दूरदर्शन ग्रामीण भागातही तळाला गेले.

पर्यायांची उपलब्धता, नावीन्याचा अभाव आणि जागतिकीकरणानंतर बदललेल्या सांस्कृतिक वातावरणाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे दूरदर्शनची पीछेहाट झाली हे खरेच; पण सार्वजनिक टीव्ही वाहिनी म्हणून आपली नेमकी भूमिका काय, याबाबतच्या गोंधळामुळे आणि सुवर्णयुगातील मानसिकतेतून बाहेर न येण्याच्या वृत्तीमुळे साधनसामग्री आणि सरकारी निधीचा आधार असूनही दूरदर्शन अपयशी ठरत गेले. एकतर दूरदर्शन ही सार्वजनिक क्षेत्राची वाहिनी आहे, सरकारी नाही हे भान १९९७ मध्ये ‘प्रसारभारती’ स्थापन होईपर्यंत कोणत्याच सरकारने ठेवले नाही. त्यामुळे टीव्हीसारख्या गतिमान सांस्कृतिक माध्यमाला सरकारी कळा येत गेली.

‘प्रसारभारती’मुळे कागदोपत्री स्वायत्तता मिळाली; पण व्यवहारामध्ये त्याचा फार फायदा झाला नाही. जुने मनुष्यबळ, जुन्या वृत्ती, आणि जुनी साधनसंपत्ती हे बदलले नाही. उलट त्यांचे ओझेच झाले. खासगी वाहिन्यांच्या व्यापारी आणि नफाकेंद्री व्यवस्थेमध्येही सारेकाही आलबेल होते आणि आहे असे नाही. तिथे कार्यक्रमाच्या दर्जापेक्षा आकर्षकतेला महत्त्व आहे. विश्वासार्हतेपेक्षा वेगाला महत्त्व आहे. उपयुक्ततेपेक्षा उपभोगाला महत्त्व आहे. दर्जा, विश्वासार्हता, उपयुक्तता यांसारख्या मूल्यांचे अवकाश भरून काढणे आणि इतरांना त्यासाठी प्रमाण पुरविणे हे सार्वजनिक क्षेत्रातील वाहिन्यांचे मुख्य प्रयोजन. ‘बीबीसी’ हे त्याचे जिवंत उदाहरण. पण स्पर्धा नव्हती तेव्हा दूरदर्शनने सरकारी किंवा व्यापारी भूमिका घेतली आणि जेव्हा खासगी वाहिन्यांचे आव्हान निर्माण होत गेले, तेव्हा याच भूमिकेतून त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. ही नक्कल अनेकार्थाने भ्रष्ट होत गेली आणि त्याबरोबरच दूरदर्शनची पीछेहाटही होत गेली.

खरेतर आज खासगी वाहिन्यांच्या क्षेत्रात बातम्यांमधील सत्य लोप पावत आहे. मनोरंजनातील सौंदर्य हरवत आहे आणि एकूण टीव्हीच्या अनुभवातील शिवत्व लयाला जात आहे. खासगी वाहिन्यांमुळे होणाऱ्या अशा अतिरंजनाच्या पार्श्वभूमीवर ‘सत्यम्‌, शिवम्‌, सुंदरम्‌’ हे उत्तम बोधवाक्‍य मिरविणारे दूरदर्शन मुख्यत्वे स्मरणरंजनामध्येच उरावे, हे म्हणूनच दुःखद आहे. साठी गाठण्याच्या निमित्ताने एका नव्या उमेदीने दूरदर्शनची त्यादृष्टीने वाटचाल सुरू व्हावी. ते दूरदर्शनच्या हिताचे तर आहेच; पण त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रेक्षकांच्या हिताचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com