कहाणी सकारात्मक बदलाची (अतिथी संपादकीय)

विश्‍वास नांगरे पाटील, (विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र)
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

आजकाल मिरवणुकीतील विद्युतरोषणाई ही रेव्ह पार्ट्यांप्रमाणे लेसर बीमच्या माध्यमातून केली जाते. अमली पदार्थ घेतल्यानंतर असे संगीत कानातून स्पर्श करून आत घुसू लागते. "लेसर बीम'वरून चालण्याचा भास निर्माण होतो. हे सगळे तरुणांना व्यसनाधीन करणारे आहे. 14 विद्या व 64 कलांच्या अधिष्ठात्यासमोर द्विअर्थी आणि बीभत्स गाण्यांवर आम्ही ओंगळ अंगविक्षेप करून नाचणार काय?

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पोलिस खात्यात वार्षिक परीक्षेसारखे वातावरण असते. एकदा का अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन झाले, की आमचाही जीव भांड्यात पडतो. बालपणी बाप्पाचे विसर्जन झाले की अश्रू अनावर व्हायचे. आज हेच निर्विघ्नपणे पार पडले की आनंदाश्रू येतात. या वर्षी तर उच्च न्यायालयात "शांतता क्षेत्रा'वरून जनहित याचिकेची सुनावणी सुरू होती. मंदिरे, प्रार्थनास्थळे, शाळा, रुग्णालये यांच्या शंभर मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्रे निश्‍चित करून तेथे ध्वनिवर्धकांवर बंदी घालायचा विषय ऐरणीवर होता. ध्वनिवर्धकाशिवाय उत्सव साजरे करता येत नाहीत काय, असे कोर्टाने सुनावले होते. कायदा- सुव्यवस्था राखताना हा निर्णय अमलात आणणे पोलिसांसाठी तारेवरची कसरत होती. ती पार पाडताना आलेले अनुभव समाजासमोर मांडणे आवश्‍यक आहे, याचे कारण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून, राजकीय-प्रशासकीय इच्छाशक्तीतून चांगला बदल घडविता येतो, हे कळावे आणि बदलांचे हे वारे सर्वदूर पोचावे.

विहित डेसिबलच्या मर्यादेत मंडळांना ध्वनिवर्धक लावण्यास भाग पाडणे, हेच मुळात "धर्मसंकट'. डॉल्बीच्या भिंती उभ्या करून कर्णकर्कश व कंपने निर्माण करणाऱ्या आवाजावर बीभत्स नृत्य करणे हे अनेक मंडळांसाठी मर्दानगीचा, प्रतिष्ठेचा विषय असतो. पोलिसही तटस्थता पत्करतात; अन्यथा काही मंडळे "बाप्पाला रस्त्यावरच ठेवू', या धमकीने पोलिस प्रशासनाला ब्लॅकमेल करतात. पण यंदा ठरवले, की हे चित्र बदलायचे. पहिला टप्पा समुपदेशनाचा! कार्यकर्त्यांना डॉल्बीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी डॉक्‍टरांची व्याख्याने आयोजिली. रुग्णांना, ज्येष्ठांना, गर्भवतींना, अर्भकांना त्याचा कसा त्रास होतो हे त्यांनी समजावून सांगितले. पण काही मंडळांच्या नेत्यांनी "तुम्ही रुग्णांना 36 तासांसाठी दुसरीकडे का शिफ्ट करत नाही', असे डॉक्‍टरांनाच सुनावले. "तुम्ही डिस्को आणि पबमध्ये आणि मोठ्या कार्यक्रमांत हे का चालू देता?' असले प्रश्‍न उपस्थित झाले. स्वतःहून ऐकणे आणि सक्तीने ऐकावे लागणाऱ्यांची ससेहोलपट यातला फरक मग सांगावा लागला. हे करताना स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमांची मदत घेतली.
मी तीन वेळा "रेव्ह पार्ट्यां'वर छापे टाकले आहेत. RAVE म्हणजे Radical Audio Visual Experience. डॉल्बीवरही अशाच रिपिटेटिव्ह बीट्‌स वाजवल्या जातात. आजकाल मिरवणुकीतील विद्युतरोषणाई ही रेव्ह पार्ट्यांप्रमाणे लेसर बीमच्या माध्यमातून केली जाते. अमली पदार्थ घेतल्यानंतर असे संगीत कानातून स्पर्श करून आत घुसू लागते. "लेसर बीम'वरून चालण्याचा भास निर्माण होतो. हे सगळे तरुणांना व्यसनाधीन करणारे आहे. 14 विद्या व 64 कलांच्या अधिष्ठात्यासमोर द्विअर्थी आणि बीभत्स गाण्यांवर आम्ही ओंगळ अंगविक्षेप करून नाचणार काय? "तुमच्या देशातील तरुणांच्या ओठांवरची गीतं मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचा भविष्यकाळ सांगेन', असे एका तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे. आपण अशी गाणी आपल्या माता-भगिनींसमोर मोठ्याने लावून धांगडधिंगा घालणार असू, तर त्यांच्या सुरक्षिततेचे काय? हा प्रश्‍न आपल्याला पडतो काय?

समुपदेशनानंतर आम्ही कायद्याचा बडगा उगारला. पूर्वी "मुंबई पोलिस कायद्या'खाली जुजबी दंड होईल, असे खटले दाखल केले जात. पण उच्च न्यायालयाने आम्हाला "पर्यावरण संरक्षण कायद्या'अंतर्गत खटले का दाखल करीत नाही, असा जाब विचारला. या कायद्यात पाच वर्षांची शिक्षा व एक लाख दंड अशी तरतूद आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आज प्रत्येक पोलिस ठाण्याला डेसिबल मीटर पुरविण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याशिवाय पर्याय नाही, हे कार्यकर्त्यांना सांगितले. गेल्या वर्षी दाखल केलेल्या प्रकरणांत समन्स व वॉरंटची अंमलबजावणी सुरू केली. शिवाय ज्या वेळी नोकरी, पासपोर्ट, व्हिसासाठी चारित्र्य पडताळणी होते, त्या वेळी असे गुन्हे ज्यांच्याविरुद्ध आहेत त्यांचा अहवाल प्रतिकूल जातो, याविषयीही जागृती केली. ही मात्रा लागू पडली. मोहिमेला जनसमर्थनही लाभले. कोल्हापुरात पाच हजारांचा मूक मोर्चा पोलिसांच्या समर्थनार्थ काढण्यात आला. शिवाय पालकमंत्र्यांनी खंबीर पाठिंबा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये 144 चे प्रतिबंधात्मक आदेश काढले व डॉल्बीला मिरवणुकीत बंदी घातली. कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्यांच्या आवाजात शिस्तबद्ध विसर्जनाच्या मिरवणुका झाल्या. डॉल्बी नाही तर दारू नाही, वादावादी नाही, मारामाऱ्या नाहीत आणि पर्यायाने जातीय तेढ, धार्मिक तणाव व दंगलीही नाहीत. शांततेत उत्सवाची सांगता झाली.

गेल्या वर्षी डॉल्बीमुक्‍तीतून शिल्लक राहिलेल्या 29 लाखांच्या निधीतून दहा बंधारे सांगली पोलिसांच्या पुढाकारातून मंडळांनी बांधले. स्वातंत्र्यपूर्व काळात बाप्पाच्या उत्सवाने स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृतीचे कार्य केले होते. आज खऱ्या अर्थाने लाखोंच्या संख्येने एकत्र येणाऱ्या, ऊर्जेने ओतप्रोत असणाऱ्या तरुणाईला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाले, तर अशा विधायक व सर्जनशील उत्सवाच्या माध्यमातून उद्याचा बलशाली भारत घडेल.