कोडाविषयी गैरसमजच अधिक

कोडाविषयी गैरसमजच अधिक

आपल्या कृष्ण किंवा सावळ्या त्वचेवर एखादा पांढरा ठिपका उमटला, तर जीव धास्तावतो. कोड हा शब्द उच्चारायचा झाला तरी लोकांना अंगावर पांढरी पाल पडल्यासारखे वाटते. कोडाविषयी अजूनही जनमानसात खूप गैरसमज आहेत. कोडाविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेऊन गैरसमज दूर करण्याचा हा प्रयत्न. 

प्रश्‍न- कोड म्हणजे काय आणि ते होण्याची कारणे कोणती? 

उत्तर- कोड ही एक रंगविकृती आहे. त्वचेच्या खालच्या स्तरामध्ये मेलानीन नावाचे रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी असतात. काही कारणांमुळे त्या नष्ट होऊ लागतात. रंगद्रव्याची निर्मिती थांबल्यामुळे त्या ठिकाणची त्वचा फिकट पडू लागते. 

आपल्याच रक्तातल्या काही श्वेतपेशी (CD8) रंगपेशींना परके समजून नष्ट करतात. कोड हा जंतुजन्य विकार नव्हे. आयुर्वेदात त्याला "श्वेतकुष्ठ‘ असे नाव असल्याने, त्याचा कुष्ठरोगाशी विनाकारण संबंध जोडला जातो. 

 कोडाचे डाग शरीरावर साधारणपणे कुठे आढळतात? 

 कोडाचे अनेक प्रकार आहेत. शरीराच्या एकाच बाजूला उमटणाऱ्या कोडास "सेगमेंटल‘ म्हणतात. चेहरा, हाताच्या व पायाच्या पंज्यावरील प्रकारास "अक्रो फेशिअल‘ म्हणतात. फक्त ओठ, जननेंद्रिय यावरील डागांना "म्युकोजल‘ असे म्हणतात. कोपर, गुडघे, पाठ, पोट व्यापणाऱ्या कोडास "व्हिटिलिगो व्हल्गारिस‘ म्हणतात. बऱ्याचदा पांढरे डाग असलेल्या त्वचेवरील केसही पांढरे होऊ शकतात. 

 कोड आनुवंशिक असते काय? 

 कोड आनुवंशिक असते, परंतु पुढच्या पिढीत येईलच असे मधुमेहासारखे ठामपणे सांगणे अवघड आहे. कोडास कारणीभूत असणारी दोन जनुके सापडली आहेत, त्यावर संशोधनही चालू आहे. एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त व्यक्तींना कोड असल्यास, पुढील पिढीमध्ये ते येण्याची शक्‍यता वाढते. 

 कोडावर खात्रीलायक उपचार आहेत काय? असल्यास कोणत्या स्वरूपाचे? किती कालावधीसाठी? 

 चेहरा, किंवा काळे केस असलेल्या त्वचेवर कोडाचे डाग असतील, तर उपचारांमुळे ते लवकर बरे होऊ शकतात. बोटांची अग्रे, ओठ, स्तनाग्रे इ. ठिकाणी कोड असल्यास बरे होण्यास खूप काळ लागतो. तळहात, तळपायावरची त्वचा जाड असल्यामुळे उपचारास प्रतिसाद कमी मिळतो. परंतु, गेल्या दशकात अनेक नवीन औषधे ( कैल्सिन्युरिन इन्हिबिटर्स), तसेच अत्याधुनिक (एक्‍झायमर) किरणोपचार उपलब्ध झाल्यामुळे कोड बरे होण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. वनस्पतींमध्ये क्‍लोरोफिल तयार होण्यासाठी सूर्यकिरणांची आवश्‍यकता असते, त्याचप्रमाणे आपल्या त्वचेमध्ये मेलानीन तयार होण्यासाठी, सूर्यकिरणातील अतिनील (Narrow Band Ultra Violet) किरणांची गरज असते. 

आजच्या धावपळीच्या जीवनात, शाळा कार्यालयीन वेळा सांभाळून सूर्यकिरणे (ऊन) घेणे प्रत्येकास शक्‍य होतेच असे नाही. अशांसाठी NBUVB किंवा EXCIMER किरणोपचार प्रभावी ठरतात. 

 बऱ्याचवेळा कोडाचे काही डाग उपचारास प्रतिसाद देत नाहीत आणि दीर्घकाळ स्थिर राहतात. अशा डागांवर काही शस्त्रक्रिया होऊ शकते काय? 

 उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या व किमान दोन वर्षे स्थिर असणाऱ्या कोडाच्या डागांवर आता रंगपेशीरोपण यशस्वीरीत्या करता येते. रंग असलेल्या ठिकाणची त्वचा काढून, त्यातल्या पेशी विलग करून कोडाच्या डागामध्ये पेरल्यावर अंदाजे सहा महिन्यांत तेथील त्वचेचा रंग पूर्ववत होतो. कोडाचे डाग आकाराने वाढत असतील, अथवा शरीरावर अन्यत्र नवीन डाग उद्भवत असतील, तर मात्र शस्त्रक्रिया करणे योग्य नाही. मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाची तारीख पक्की करून, लग्नपत्रिका छापल्यावर काहीजण शस्त्रक्रियेसाठी त्वचातज्ज्ञाकडे आग्रह धरतात (दुसऱ्या पक्षापासून लपविण्यासाठी); पण इतक्‍या कमी कालावधीत त्वचेला पूर्ववत रंग येणे अशक्‍य असते. 

 डाग आकाराने किंवा संख्येने वाढत असतील तर? 

 तर आपल्या त्वचातज्ज्ञाकडे जाऊन काही तपासण्या व त्यांच्या निष्कर्षानुसार दिलेले उपचार, दिलेल्या कालावधीपर्यंत करून घ्यावेत. 

कोड ही अजूनही आपल्या देशात मोठी व गंभीर सामाजिक समस्या आहे. 

कोड असलेल्या उपवर मुलीचे लग्न होणे कठीण होऊन बसते. कोडाचे डाग दिसू लागताच वेळीच त्वचातज्ज्ञाकडून उपचार करून घेणे कधीही श्रेयस्कर! 

उपचार दीर्घ कालावधीचे असले, तरी मध्येच कंटाळून सोडून देऊ नयेत. 

कोड ही रंगविकृती आहे. त्यामुळे विद्रूपता येत असली, तरी खचून जाऊ नये. 

प्रसिद्ध गायक मायकेल जॅक्‍सन यालाही कोडाने ग्रासले होते. 

पंचवीस जून हा त्याचा स्मृतिदिन आता जागतिक कोड दिन म्हणून पाळला जातो. 

Vitiligo Foundation या मदत गटातर्फे, कोडबाधित लोकांसाठी समुपदेशन, शंकानिरसन, मार्गदर्शन इ. कार्यक्रम जगभर राबवले जातात. भारतातही राष्ट्रीय त्वचातज्ज्ञ संघटनेमार्फत देशभर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com