मताचे "मूल्य' नि जिवाचे मोल! (मर्म )

Voter valu
Voter valu

"एकच प्याला'मध्ये भगीरथाचे स्वगत आहे - "दारूपासून सुख नाही हे खरं; पण दु:खी जिवाला दारू सुखाचं स्वप्न तरी दाखविते खास!' या स्वगताची आठवण झाली ती नगर जिल्ह्यातील पांगरमल या छोट्या गावात गेलेल्या सहा दारूबळींनी. त्यांचा मृत्यू अतिमद्यपानाने झाला की बनावट दारूमुळे, याचा अंतिम निष्कर्ष येणे अजून बाकी असले, तरी कारण दारूच हे निश्‍चित आणि तिचे निमित्त निवडणूकच! या निमित्तानेही राजकारण सुरू झाले. संबंध दिसून येताच शिवसेनेने लगोलग विश्‍वामित्री पवित्रा घेतला. "राज्याला दिशा दाखविणारा आमचा जिल्हा' असे नगरकर अभिमानाने सांगतात. त्या जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात असे काही घडल्याचे अलीकडे तरी "उघडकीस' आले नव्हते. पांगरमलच्या बातमीमुळे आता त्याच्या आगे-मागे झालेल्या अशाच काही प्रकारांची कुठे उघड, कुठे कुजबुजती चर्चा सुरू आहे. दैठणे गुंजाळचा (पारनेर) एक तरुण अतिमद्यसेवनाने मृत्युमुखी पडला व चार जण अस्वस्थ आहेत. हे मद्यसेवन यात्रेच्या निमित्ताने असल्याची चर्चा, तर कुजबूज आहे एका पक्षाने दिलेल्या पार्टीची. अशा पार्ट्यांमधून "तैराट' झालेले "कार्यकर्ते' गावोगावी, हमरस्त्यांवरच्या ढाब्यांवर सध्या पाहायला मिळतात. 
व्याख्येतील "लोकां'शी लोकशाहीचा खरोखर संबंध राहिला आहे काय, याची शंका यावी इतपत आपल्याकडच्या निवडणुकांनी वेगळे वळण घेतले आहे. धनशक्ती आणि मनगटशाही ही निवडणुकांमधील प्रमुख अस्त्रे. त्यालाच "निवडून येण्याची क्षमता' म्हटले जाते. पैसा, दारू, सामिष जेवण आदी आमिषांना मतदार"राजा' सहजपणे बळी का पडतो, याचा विचार आपण करणार आहोत की नाही? नगरमध्ये मंगळवारी या बातमीची चर्चा सुरू होती, तेव्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उत्पादनशुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बनावट दारूच्या बंदोबस्ताबद्दल चर्चा करीत होते. राज्य उत्पादनशुल्क खाते किती जागरूकपणे काम करीत आहे, यावरही या निमित्ताने प्रकाश पडला आहे. समाजमाध्यमातून सध्या कृष्णाजी नारायण आठल्ये यांची 20 कडव्यांची कविता फिरते आहे. त्यातील "कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे।।' ही ओळ राजकारण्यांनी नि मतदारांनी आचरणात आणली, तरी लोकशाहीचे मूल्य टिकण्यास मदत होईल, असे म्हणता येईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com